खरी प्रीती

हासावी विधुसंगती विधुकला
होते तसे जीवन
मी होता नवरत्न हार रचला
गुंफुन आकाशकण
डोळ्यांना भलतीच भूल पडली
अन धुंद आली मना
मोहाच्या पटलात एक गमली
तू मूर्त देवांगना
प्रीती मागितली खरी, पण खरी प्रीती मिळली कुणा?

आता मात्र पुरा प्रकाश पडला
सारेच हे वेगळे
आहे माळ उभा भकास पिवळा
लोपून गेले मळे
जावा भास जुना म्हणून फिरलो
तो होत नाही कमी
सारे जीवन डावलून बसलो
येऊन खेड्यांत मी
प्रीतीच्या मुलुखांतली मग पुन्हा आता नको बातमी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा