आता तरी धाडा ना धाडा ना माहेरा

सोन्याची दौत मोत्याचा टाक
तिथे आमचे मामंजी लिहीत होते
मामंजी मामंजी मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना माहेरा

मला काय पुसतेस, बरीच दिसतेस
पूस आपल्या सासूला सासूला
सोन्याचा करंडा बाई मोत्याचं झाकण
तिथे आमच्या सासूबाई कुंकू लावीत होत्या
सासूबाई सासूबाई मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या जावेला जावेला
सोन्याची रवी, मोत्याचा दोर
तिथे आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या दिराला दिराला
सोन्याची विटी, मोत्याचा दांडू
तिथे आमचे भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या नणंदेला नणंदेला
सोन्याची सुपली बाई मोत्याने गुंफली
तिथे आमच्या वन्सं पाखडत होत्या
वन्सबाई वन्सबाई मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

मला काय पुसतेस बरीच दिसतेस
पूस आपल्या पतीला पतीला
सोन्याचा पलंग मोत्याचे खूर
तिथे आमचे पतिराज झोपले होते
पतिराज पतिराज मला मूळ आलं
आता तरी धाडा ना धाडा ना

आणा फणी घाला वेणी
जाऊ द्या तिला माहेरा माहेरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा