जिकडेतिकडे पाणीच पाणी

जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे,
झुळझुळणारे गवत पोपटी
लवलवणारे तुरे.

नवी लकाकी झाडांवरती
सुखात पाने-फुले नाहती,
पाऊसवारा झेलित जाती
भिरभिरती पाखरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.

हासत भिजती निळसर डोंगर
उडया त्यांतुनी घेती निर्झर,
कडेकपारी रानोरानी
नाद नाचरा भरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.

मधेच घेता वारा उसळी,
जरी ढगांची तुटे साखळी,
हिरव्या रानी ऊन बागडे
हरिणापरी गोजिरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.


कवि - शंकर वैद्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा