मुंबई

वरून दिसते आम्रतरूसम मोहरली मुंबई
हाय! परंतू ऋतू जाणतो पोखरली मुंबई

पोटासाठी अनाथ अगतिक आला आश्रयाला
निवार्‍यास अंथरली त्याने पांघरली मुंबई

लहान होती अल्लड होती एके काळी तीहि
अशी बहकली कुणीच नाही सावरली मुंबई

जशी केतकी बनात चाले सत्ता भुजंगांची
तशी अवस्था बघून इथली घाबरली मुंबई

तिच्या दुधावर उदंड झाली पहा तिची लेकुरे
बॉम्बस्फोट जाहले तेधवा हादरली मुंबई

काय आणखी असे वेगळे मुंग्यांचे वारूळ
अफाट गर्दी मधे बिचारी चेंगरली मुंबई

हात धुराचे सरकत सरकत कंठाशी पोचले
प्रदूषणाने फास अवळला गुदमरली मुंबई

कधी जिवाची होती आता जिवावरीहि उठली
विषकन्येसम मला ‘इलाही‘ जाणवली मुंबई


कवी - इलाही जमादार
कवितासंग्रह – भावनांची वादळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा