जीणं

जीणं फाटतया तिथेच ओवावा धागा गं
बाई दु:खाच्या कष्टानं लिपाव्या भेगा

द्यावा ऊन्हाला कधी आधार
गाव बुडणारा सोसावा पूर
काटे पायात खुडून ऊन ऊन्हांत झडून
बोरी बाभळीच्या होती बागा गं

इथे नात्यांची लागते झळ
होई जीवाची गा होरपळ
सारं हातचं देऊन,ऊन हातात घेऊन
कोण पराया? कोण सगा गं

माझं घावं ना मायाळू गाव
तुझ्या वेशीत रोज ही धाव
तुझं म्हणून गोड मानून
ठेव ओसरीत थोडी जागा गं


कवि - प्रशांत मोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा