काचतात का?

पाश जुनेरे काचतात का?
अश्रू नयनी दाटतात का?

व्यक्त व्हावया शब्द सुचेना
मनी भावना साचतात का?

व्यासपिठावर सिंहगर्जना
प्रसंग येता शांत शांत का?

कर्मयोग निष्काम असावा
लोक यशाला मोजतात का?

देव ठेवतो तसे रहावे
तरी उद्याची मनी भ्रांत का?

पाय वाकडा पडेल धास्ती
रस्त्यावर ते चालतात का?

जरी झटकली, आठवणींची
पुन्हा जळमटे लोंबतात का?

देव कृपेने इष्ट जाहले
बळी पशूंचा चढवतात का?

तेजोमय सत्कार्य परंतू
लोक तुतारी फुंकतात का?

"निशिकांता" तू पूस स्वतःला
गजला कोणी वाचतात का?


- निशिकांत देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा