ती कळी आणि ती साखळी

फुलून हसताच तूला मी दिली नवी कळी
खुडून एक एक तू झुगारलीस पाकळी
कितीतरी जपून मी दुवा दुवाच जोडला
करून घाव तू मधे दुभंगलीस साखळी

सुरंग कोवळी कळी, कशी जुळेल ती पुन्हा?
जुळेल एकदा, तरी कशी फुलेल, सांग ना?
दुवा दुभंगलास तू, कसा मी अभंग करु?
पुन्हा अखंड साखळी कशी जुळेल, साजणा!

विशीर्ण, जीर्ण पाकळ्या तशाच वेचते पिशी
दुभंग साखळी तरी जपून ठेवते अशी
कळी तशीच साखळी विलोकते पुनःपुन्हा
पुसून ऊन आसवे विसावंते कशीबशी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा