हुरहूर

मी धरुं धिरावा कसा? वखत हा असा
दे मला जरा भरवसा, हरिणपाडसाऽऽ रे!

हरवला सखा सोबती
हुरहुरू बघावं किती?
थरथरुन किती मी भिले बघून हा ससाऽऽ रे!

ही समदी शेती सुनी
भवताली नाही कुणी
मग फिरुं कशी मी अशी नवी राजसाऽऽ रे!

नवतीत शोक आगळा
बघ, भरुन आला गळा
आतले कुणाला पुसू मुक्या दशदिशाऽऽ रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा