स्वातंत्र दिव्यदर्शन!

अजि घुमघुमली स्वतंत्रतेची भेरी
दुमदुमली दुनिया सारी
अजि राष्ट्राने स्वतंत्रतेची केली
घोषणा धीर या काळी
अजि राष्ट्राने सर्व शृंखला अपुल्या
तोडुनिया फेकुन दिधल्या
अजि राष्ट्राने गुलामगिरिचे पाश
फेकियले दाहि दिशांस
तरि उठा उठा हो सारे
जयनादे गगन भरा रे
निज झोप सर्व झाडा रे
जयघोष करा कोण तुम्हाते वारी
दुमदुमली दुनिया सारी।।

निज राष्ट्राने आज मांडिले ठाण
घ्या हाति सतीचे वाण
व्हा सिद्ध तुम्ही प्राणार्पण करण्याते
त्यागाविण काहि न मिळते
सूं येणा-या बंदुकिच्या गोळ्यांना
सुकुमार फुलांसम माना
निज छातीला निष्कंप करा झेला
तोफेचा तीवर गोळा
डोळ्यांत विजेचे तेज
लखलखो तुमचिया आज
प्राणांचे घाला साज
त्या स्वतंत्रदेवीच्या शुभ शरिरी
दुमदुमली दुनिया सारी।।

बहुधन्य तुम्ही यशस्वी करा काज
देशार्थ मरोनी आज
अजि सुख माना धन्य आपणा माना
की देता येतिल माना
या मातेला मोक्षामृत ते द्याया
अर्पा या अपुली काया
श्रीशिव बाजी तानाजी जनकोजी
तत्त्याग दाखवा आजी
कष्टांची पर्वा न करा
हालांची पर्वा न करा
प्राणांची पर्वा न करा
ही संधी असे आली सोन्यासारी
दुमदुमली दुनिया सारी।।

हे पहा किती करुण तरणि-तेजाळ
हे सजले कोमल बाळ
हे स्वतंत्रतेसाठी सारे उठले
अभिनव-नवतेजे नटले
तुम्ही धन्य खरे धन्या तुमची माय
हर्षेल आज शिवराय
हे तरुणांनो तेजस्वी वीरांनो
बाळांनो सुकुमारांनो
पाहुनी तेज हे तुमचे
मन खचेल त्या काळाचे
ते रविकर फिक्कट साचे
व्हा आज पुढे मोक्ष येतसे दारी
दुमदुमली दुनिया सारी।।

त्या लहरींच्या लहरी पाठोपाठ
सागरात उठति अलोट
त्या ज्वाळांच्या ज्वाळा पाठोपाठ
वणव्यात नाचती दाट
त्यापरि तुम्ही टिप्परघाई खेळा
ही स्वातंत्र्याची वेळा
घरदार अता सारे राहो दूर
भारतभू करणे थोर
मरण्याला उत्सुक व्हा रे
मोक्षास्तव उत्सुक व्हा रे
हालास मिठी मारा रे
भय कोण तुम्हां दवडिल जगि माघारी
दुमदुमली दुनिया सारी।।

या ललनाही मरण्यासाठी आल्या
मर्दानी झाशीवाल्या
अम्हि ना अबला जगता हे कळवाया
देशास्तव उठति मराया
निज बांधिति त्या धैर्ये शौर्ये पदर
करिती ना कुणाची कदर
त्या पहा पहा वीरांपरि हो सजल्या
जगताच्या दृष्टी थिजल्या
पाजावे बाळा ज्यांनी
न्हाणावे बाळा ज्यांनी
प्रेमात रमावे ज्यांनी
त्या मरणाला कवटाळिति ह्या नारी
दुमदुमली दुनिया सारी।।

कवि मरणा ना भारतकन्या डरती
मरणाते मारुन जाती
ती सावित्री मरणासन्मुख ठाके
मनि यत्किंचितहि न धोके
ती असुराशी लढते भास्वर भामा
रामासम लढली रामा
ती संयुक्ता दिव्य पद्मिनीदेवी
खाईत उडी ती घेई
ती उमा लढाया जाई
ती रमा सती हो जाई
ती लक्ष्मी तळपत राही
ही परंपरा राखिति भारतनारी
दुमदुमली दुनिया सारी।।

या मातेच्यासाठी मरण्यासाठी
उठु देत बाळके कोटी
ते धैर्याने मरण मानु दे खळ
मोक्षाची आली वेळ
निज कष्टांनी स्वातंत्र्याते आणू
मोक्ष असे मरणे जाणू
ते मज दिसते दिव्य असे स्वातंत्र्य
तो भारत दिसतो मुक्त
ते दर्शन दिव्य बघा रे
सत्प्रतिभा दाविल सारे
ही दिव्य दृष्टि तुम्हि घ्या रे
ते दृश्य पहा, ऐका ती ललकारी
दुमदुमली दुनिया सारी।।

ते अवनिवरी सुरवर-मुनिवर आले
पुण्यात्मे सारे जमले
ते श्रीराम श्रीकृष्णार्जुन येती
शिबि हरिश्चंद्र ते येती
ते वाल्मीकि व्यास मुनीश्वर आले
सनकादिक ऋषिवर आले
ते बुद्ध पहा महावीरही दिसती
शंकराचार्य लखलखती
ते पृथ्विराज दिसले का
ते प्रताप तरि दिसले का
शिवछत्रपती दिसले का
ते सर्व पहा आले पुण्याकारी
दुमदुमली दुनिया सारी।।

श्रीभारतभू मंगलासनी बसली
ती अपूर्व सुंदर दिसली
रवि कोटि जणू एके ठायी मिळले
तत्तेज तसे लखलखले
किति वाद्ये ती मंगल वाजत गोड
या प्रसंगास ना तोड
किति हार तुरे मोती माणिक-राशी
मातेच्या चरणांपाशी
अभिषेक कराया उठती
स्वातंत्र्यमंत्र ते म्हणती
‘ॐ समानी व आकूति:’
ती अभिषिक्ता जननी शोभे भारी
दुमदुमली दुनिया सारी।।

ते वस्त्र पहा दिव्य अमोलिक दिधले
परिधान जननिने केले
ती रत्नांचे अलंकार ते ल्याली
भारतभू तेजे फुलली
ते सप्तर्षी नक्षत्रांचे हार
अर्पिती अमोलिक फार
त्या दाहि दिशा तत्तेजाने धवल
धवळले विश्व हे सकळ
सर्वांनी भेटी दिधल्या
मेरुपरि राशी पडल्या
सुख-कथा अपूर्वा घडल्या
ती श्रुति तेथे शांतिगीत उच्चारी
दुमदुमली दुनिया सारी।।

त्या पतिव्रता स्वर्गामधुनी येती
श्रीसीता श्रीसावित्री
त्या भारतभूमातेची शुभ भरती
प्रेमाने मंगल ओटी
शुभ शंखादी वाद्ये मंगल झडती
ध्वनी अनंत तेथे उठती
जयघोषाची एकच झाली टाळी
आनंदे सृष्टी भरली
अक्षता स्वपुण्याईची
पिंजर ती पावित्र्याची
घेऊन करी निज साची
त्या थोर सती लाविति भारतभाळी
दुमदुमली दुनिया सारी।।

मग सकळ मुले-मुली आइच्या जवळी
आली त्या प्रेमे कवळी
ती झळंबली प्रेमे मातेलागी
बिलगली आइच्या अंगी
ते देवमुनी मुलांस आशीर्वाद
देतात धन्यतावाद
सत्कन्यांची सत्पुत्रांची आई
शोभते भरतभू माई
आनंदाश्रूंचे लोट
प्रेमाश्रूंचे लोट
खळखळा वाहती तेथ
किति सुख पिकले देव भारता तारी
दुमदुमली दुनिया सारी।।




कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर छात्रालय, १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा