पित्याची स्थिती

(माता शोकाने धरणीवर पडते. जवळच पिता असतो, त्याची स्थिती)

पिता बैसलाहे शोकमग्न खिन्न
पुशीत नयन वारंवार
कालवाकालव हृदयी होतसे
सर्प जणू डसे अंतरंगी
धीर धरी परी पुन्हा येई नीर
डोळ्या लागे धार अनिवार
‘ध्यानी मनी बाळा नव्हते मरण
लौकर सुटून भेटशील
मरावयासाठी बाळ हा चालला
विचार न आला कधी मनी
मेघाची चातक चंद्राची चकोर
घनाची मयूर वाट पाहे
तृषार्तास जल क्षुधार्थास अन्न
तैसे होते मन तुझ्याकडे
तुझ्या वाटेकडे होते सदा डोळे
शतवार आले झाले बाळा
हाती रे माउली दिन ते मोजीत
घास नसे घेत अश्रुवीण
आठवण तिला क्षणाक्षणा यावी
सदगदित व्हावी वृत्ति बाळा
आशावेलीवरी वज्र रे कोसळे
हृदय हे जळे काय करु
कोणाचा आधार संसारी आम्हाला
तुझ्या या मातेला केण बाळा
कोणाला ती प्रेमे हाक मारील
हात फिरविल कोणावरुनी
बाळा कैसा काय गेलास टाकून
दोघांस लोटून दु:खपूरी
तुरुंगात माझ्या नको जाऊ बाळा
सांगितले तुला वारंवार
अश्रु मी ढाळिले पदर पसरीला
दृढनिश्चयाला वरिले तुवा
नाही तू ऐकीले तुरुंगी गेलास
होती परी आस भेटशील
भेटशील आम्हां सुखाचा सोहळा
पाहू आम्ही डोळा होती आशा
आता कसची आशा आकाश फाटले
हृदय दाटले माझ्या बाळा
आशेचे जळून झाले कोळसे
जळावीण मासे तैसे आम्ही
एक माझा बाळ तोही देव नेत
आम्हाला ठेवीत रडावया
आणि लग्न केले नुकते रे थाटाने
अभागी पित्याने बाळा तुझे
मांडोनी सोहळा मानिला आनंद
अभागी मतिमंद ठरलो परी
आठ वरुषांची लहानशी बाळा
जाणे ना मरणाला अजून जी
लग्न म्हणजे वाटे जिला एक खेळ
तोच आली वेळ वैधव्याची
वैधव्य ते काय मरण ते काय
संसार तो काय ना कल्पना
हसावे खेळावे सुखे खावे प्यावे
जनांनी म्हणावे विधवा तिला
मांडीवर जिने प्रेमाने लोळावे
जनांनी म्हणावे विधवा तिला
तिच्या जीवनाची आम्ही केली माती
कल्पना परी ती नाही तिला
तिच्या जीवनाची आम्ही केली राख
नाही ते ठाऊक परी तिला
मांडीवरी मान तिने ठेवियेली
आम्ही मुरगळिली रुढीदासी
रडताना आम्हा पाहुनी रडेल
परी न समजेल गंभीरता
मोडिली हो मान गोड या मैनेची
हृदयास जाची शल्य तीव्र
करोनीया आम्ही विवाहसोहळा
दाबियेला गळा कोकिळेचा
फुटेल जे कंठ गावया स्फुरेल
मैना ना काढील गोड शब्द
बाळ-कोकिळा ही मोठी जै होईल
मनात झुरेल अपरंपार
शोक-गीते सदा बाळा आळवील
टिपे ती गाळील टपटप
घळघळ अश्रुधार ती सोडील
हातांना जोडील जगन्नाथा
जळेल अंतरी जेव्हा का कळेल
मरणाचा खोल अर्थ तिला
जळेल अंतरी जेव्हा तो कळेल
विवाहाचा खोल अर्थ तिला
आग लागो आम्हा आग त्या रूढीला
बळी हो दिधला बाळिकेचा
काय आईबाप तिचे ते करतील
द:खाने जळतील क्षणाक्षणा
नयनांसमोर बाळेला पाहोनी
जातील जळोनी अंतरंगी
घेतील पोटाशी कन्या ती अजाण
अश्रूभरे स्नान घालितील
काय करि देवा कोठे तरी जाऊ
कोठे बाळा पाहू राजसाला
कशाला हा पैसा कशाला व्यापार
एक जो आधार तोही गेला
ज्याच्यासाठी केली आटाआटी
त्याशी ताटातुटी केली देवा
शोक-वन्हि आता जिवंत जाळील
प्राण न घेईल परी माझा
दाही दिशा ओस भरला अंधार
डोळ्यांना ही धार आता सदा
हिचे तरी केवी करु समाधान
देईल ही प्राण शोकवेडी
आम्ही दोघे आता कोणाकडे पाहू
एकमेकां दाउ दीन अश्रु
हाय काय झाले केवढा आकांत
केवढा आघात आम्हावरी’
मनी हे विचार मनी हे उदगार
मनावरी भार फार पडे
असह्य तो झाला वृक्ष उन्मळला
भार फार झाला पिता पडे
माय धरणीला पिता धरणीला
तेथ उचंबळला शोकसिंधु

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा