बाळ समजावतो

(ती माता पुन्हा पुत्राला कवटाळावयास धावते. तो स्वर्गीय पुत्र खुणावतो व दूर होतो. तो तिची पुन्हा समजूत घालतो.)

“आई नाही हृदय मम हे जाहले गे कठोर
आहे माते परि निशिदिनी अंतरी एक घोर
त्वत्प्रेमाची स्मृति विमल ती कैशि जाईल आई
पूज्या मूर्ती तव सतत ह्या अंतरंगात राही।।

आई वाटे तुजसि करुणा फक्त त्वदबाळकाची
दु:खी सारी खितपत परी लेकरे भारताची
वाटे पुत्रे तव कितितली सोशिले हाल कारी
पाही डोळे उघडुन परी बाळके दीन सारी।।

ना खायाला मिळत कळही ना करी पाव आणा
आपदग्रस्ता सकल जनता ना मिळे एक दाणा
राहायाला घर न उरले वस्त्र ना नेसण्याला
आई नाही उरलि मिति गे भारती आज हाल।।

कित्येकांना घरि न मिळते देतसे जे तुरुंग
होती गादी मजसि जननी तेथ लाभे पलंग
होते तेथे नियमित भिषग् औषधे द्यावयाते
केव्हा केव्हा मिळत जननी दूधही प्यावयाते।।

लाभे कोणाप्रति जननि गे तेथे ती पावरोटी
सायंकाळी कधि कधि मिळे ताकही अर्धलोटी
राहे कोणी कधिहि न तिथे एकही तो उपाशी
राहे अन्नाविण जरि कुणी येति ते चौकशीसी।।

बाहेरी ह्या परम जपता, पुत्र कोटी उपाशी
माते देता घृत मधु हधी, ना पुशी कोणि त्यांसी
हिंदुस्थानी हरहर किती जाहलीसे हलाखी
कोणा ये ना हृदयि करुणा, सर्व आई उदासी।।

श्रीमंतांचे सजति उठती बंगले ते महाल
मोटारीही उडति, बघतो बंधुचे कोण हाल
पाषाणाचेहुन अदय हे गांजिती सावकार
हाहा:कार ध्वनि उठतसे, ना दया, ना विचार।।

माझे रात्रंदिन तळमळे चित्त बंध्वापदेने
धुव्वा जावे उडवित गमे भीमसेनी गदेने
सौख्यी नांदे पतसमुख तो नित्य श्रीमंत एक
दारिद्रयी हा मरत दुसरा ना जगी या विवेक।।

एके सौख्यी सतत असणे अन्य लाखो मरावे
एकासाठी झिजुनि झिजुनि बाकीचे दीन व्हावे
श्रीमंताचे घरि झडतसे रोज ती मेजवानी
लाखो अन्नाविण मरति हे बंधु गे दीनवाणी।।

माझ्या नेत्री अविरल जळा घोर वैषम्य आणी
मच्चित्ताने विरघळुनिया आइ हे होइ पाणी
ऐके आर्तस्वर उठतसे अंबरी जाय हाय
आई नाही ह-दय सधना शुद्ध पाणाण काय?।।

आलस्याला मिळती सगळे भोग सारे विलास
कष्टे रात्रंदिन परि तया ना पुरे दोन घास
अन्याया या सहन करिती वेदवेदांतवाले
गीता ओठी परि विषमता घोर ही त्यांस चाले।।

अन्नभावे मरत असता बंधु, जाई घशात
लाडु जिल्बी, हरहर कसे चित्त लागे अशांत
कैसे झाले स्वजन कठीण-स्वांत कारुण्यहीन
बंधू लाखो तळमळती हे मीनसे वारिवीण।।

चित्ती आई लव तुम्हि विवेका करा धर्म काय
मानव्याचे निज मनि बघा उज्ज्वल ध्येय काय
विश्वामाजी किती विषमता दु:खद प्राणघेणी
झाला येथे नरक दुसरा लक्ष देई न कोणी।।

श्रीमंताच्या सदनि भरल्या रम्य गाद्या पलंग
रस्त्यामध्ये श्रमुन पडतो दीन टाकून अंग
श्रीमंताचे घरि झळकती दिव्य विद्युत्प्रदीप
अंधारी तो मजुर मरतो सर्प विंचू समीप।।

श्रीमंताचे ललितभवनी नृत्यसंगीत होत
होत प्राणांतिक कहर त्या चंद्रमौळी घरात
श्रीमंताने किति सुखि शुक श्वान मार्जार मैना
मदबंधूंची हरहर परी काय ही हाय दैना।।

श्रीमंतार्थ श्रमत असता घर्मधारा सुटाव्या
पर्जन्यी त्या जमिनित जशा उपळा हो फुटाव्या
सारा जावा दिन परि घरी काहि ना खावयाते
नाही त्याला मिळत तुकडा ना पुरे ल्यावयाते।।

थंडीवा-यामधि चिमुकली लक्ष बाळे मरावी
आईबाप व्यथितमती तदवृत्ति वेडीच व्हावी
हिंदुस्थानी गरिब विपदे अंत ना पार देखा
श्रीमंताचा तरिहि पुरवी दानवी देव हेका।।

‘गंगे गोदे’ वदुनि जननी अर्पिती बाळकांना
पोटामध्ये तटिनि धरिती दीन त्या अर्भकांना
खाया नाही म्हणुन किति ते आत्महत्या करीत
आई नाही मुळिच उरली भारती न्यायनीत।।

दारिद्रयाने मरत असता पोटाचे गोड गोळे
देवाला हे बघवत कसे त्यास ना काय डोळे
गेला गेला सदय तुमचा देव आई मरून
घ्यावा आम्ही झगडुन निजोद्धार आता करून।।

पाडायाते सकळ असती उद्धाराया न कोणी
मारायाते सकल उठती तारण्या नाहि कोण
साहाय्याला कुणि न, वदती शब्द ना सानुकंप
आई आता अम्हिच करणे स्वोद्धृती ती विकंप।।

राहे पायांवर निज उभा भाग्य त्यालाच लाभे
जो जो आई जगति वरितो स्वावलंबनास शोभे
ऐश्वर्याची कधी न घडते प्राप्ति आशाळभूता
होते प्राप्ति त्वरित परि ती उत्कटोत्साहयुक्तां।।

सूर्याचे ते विभव उसने घेतसे चंद्र मिंधा
अर्धा केव्हा कधि मुळिच ना डागही नित्य बंदा
तारे कैसे मिरवति परी नित्य तेजे स्वतंत्र
स्वोद्धाराते करुनि मिरवू घेउ स्वातंत्रमंत्र।।

अन्नभावे तडफडत हे जोवरी आइ बंधू
मदरक्ताचा पसरिन सडा सांडुनि बिंदु बिंदु
अन्नवस्त्राविण न भुवनी जीव कोणी रहावा
त्याच्यासाठी झिजुनी झिजुनी आई मज्जन्म जावा।।

माझे बंधू अधन अधमी सावकारी पिळावे
तैसे नानाविध कर किती लागती त्यांस द्यावे
बंधूंना ना लवणहि मिळे चाटिती भूमि खरी
आई, ऐशी सुकरुण कथा चित्त माझे विदारी।।

लोकांपाशी कण न उरला तो उरे शोकापूर
बोलायाचे बळ न उरले तो उरे शोकसूर
नाही धंदा उतर उरला मृत्युवाचून आता
त्राता नाही निजजनहि ना देति साहाय्य हाता।।

खेडोपाडी दिसत सगळे लोक बेरोजगार
दारुमध्ये बुडति विपदा वर्णवे ती न घोर
दारुमध्ये धुळिस मिळती खानदानी घराणी
आई ऐशी सुकरुण कथा लोचनी पाणि आणी।।”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा