श्रावणमासी - विडंबन


श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे.

भवती बघता भाविक नवरे पत्नी भयाने मौनव्रती
“श्रावण-श्रावण” जपता जपता गलितगात्र हे महारथी

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो आठवे-
“सध्या श्रावण!” हळूच पाउल घराकडे अपुल्याच वळे.

उठती बसती कामे करती, अंगी नाही त्राण पहा
सर्व जगावर हाय! पसरले विषण्णतेचे रुप महा.

“गलास” साधा फुटता भासे, न पिता ही कशी चढे?
श्रावण म्हणूनी त्राण न हाती, हातामधुनी खाली पडे.

बडबड करुनी उगीच आपुले, दिवस जुने ते आठवती
सुंदर साकी, मैफल, मस्ती, मनात अपुल्या साठवती.

“उदास”* गझला पडता कानी, पाउल शोधत वाट फिरे
परि आठवता श्रावणमहिमा, मुकाट मंदिरात शिरे.

वाट असे ही जरी नित्याची कोण बेवडा अडखळला?
दारी आपुल्या अचूक येऊनी कोण नेमका गोंधळला?

पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.

शून्यामध्ये लावून डोळे बसून राहे तासन्‌तास
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावा, भुका-तहाना श्रावणमास.

कवी - (हालकवी) अविनाश ओगले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा