मांडणी

दु:खभोर संधिकाल सूर्यबिम्ब सागरात
रंग केशरातला जळे हवेत, गारव्यात

नभात चांदणी सले हले दिठीत चंद्रही,
वृत्तभार शब्दही फुलातला सुगंधही

गाव चार पाउलेच पार देउळातले,
कृतज्ञ सांजवातीला सुजाण सत्य पावले!

झाड झाड पाखरात, पाखरात दंग झाड,
झर्‍यात विर्घळे जसा सच्छिद्र दूरचा पहाड.

एक हाक एक धाक एक मृत्युचा निनाद
स्वप्न सांधती तुझे जुने नवे तुझे प्रवाद...

राहुटीत या इथे समुद्र सर्व झाकतो,
अलौकिकात सांडतो नि लौकिकात मांडतो...

निळी सुदीर्घ शांतता तुझ्यातलीच आर्तता
तुझ्या कुशीत जन्मते तुझी जुनीच देवता...

शिल्प हेच देखणे तुझ्याच अस्थी तासणे
तुझ्या नभातलेच दे मला विदग्ध चांदणे....


कवी - ग्रेस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा