उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या
पानावर्हल्यारे लाटा
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना
देवा,
कसं देलं मन
आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!
देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा