swatantryavir savarkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
swatantryavir savarkar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।


कवी - स्वातंत्र्यवीर सावरकर

सागरा प्राण तळमळला !

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला || ४ ||


कवी      -     स्वा. विनायक दामोदर सावरकर
संगीत   -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर      -     लता मंगेशकर,  उषा मंगेशकर,  मीना मंगेशकर
                    पं. हृदयनाथ मंगेशकर

जयोऽस्तुते

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||

राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||१||

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेचि ।।२।।

मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।


हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे


कवि - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर