aruna dhere लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
aruna dhere लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

अरुणा ढेरे

अरुणा ढेरे (१९५७ - हयात) या मराठी भाषेतील लेखिका, कवयित्री आहेत.


बालपण
अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम.ए. पीएच.डी. पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून एका उच्च दर्जाच्या वाङ्मयीन वातावरणातच त्या मोठ्या झाल्या. अरुणा ढेरेंच्या घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांच्या सहवासात आणि साहित्याने भारावलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले.

कारकीर्द
अरुणा ढेरे यांनी कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इ. विविध विषयांवर विपुल लेखन केले असले तरी त्या मुळात कवयित्री आहेत. सुनीता देशपांडे यांच्याशी जुळलेल्या स्नेहबंधाचे निकट मैत्रीत रूपांतर झालेल्या ढेरे यांना जेव्हा सुनीताबाईंची जी. ए. कुलकर्णी यांना लिहिलेली पत्रे वाचायला मिळाली, तेव्हा त्यांचे पुस्तक होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. सुनीताबाईंनी त्यावर प्रस्तावना लिहिणार असाल, तरच पुस्तक निघेल, असा आग्रह धरला. सुनीताबाईंचा आग्रह किती योग्य होता, हे त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचताना लक्षात येते. सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणाऱ्या डॉ. ढेरे या गेल्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील.
 

पुस्तके
‘लोकसंस्कृतीची रंगरूपे’, ‘लोक आणि अभिजात’, ‘विस्मृतिचित्रे’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार’, ‘विवेक आणि विद्रोह’, 'कवितेच्या वाटेवर', 'काळोख आणि पाणी'
 
कविता संग्रह
प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन,

कथा संग्रह
कृष्णकिनारा, अज्ञात झऱ्यावर, रूपोत्सव, मैत्रेय, नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे


संपादन
स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०) (११ लेखिकांच्या कादंबऱ्यांचा परामर्श) (पद्मगंधा प्रकाशन)
या शिवाय स्फुटलेख संग्रह, कादंबरी, समीक्षात्मक लेख यांतून त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेची ओळख पटते. त्यांचा विस्मृतिचित्रे हा ग्रंथ अतिशय गाजला.

पुरस्कार
नागपूरच्या डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यासाच्या वतीने अमेरिकेतल्या डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान त्यांना मिळाला आहे. अरुणा ढेरे यांना आजवर तीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

हदग्याच्या एखाद्या पावसात

हदग्याच्या एखाद्या पावसात
उलगून जाते विस्मरण
आणि नादावल्या काळाचे अंगण पुन्हा दिसू लागते
पाय नाचू लागतात
जुनी हरवलेली गाणी मिळतात
आभाळाच्या हत्तीभोवती फेर धरण्याइतके
पुन्हा लहान होतो आपण
हातावर टेकवलेली खिरापत, तसे हसावे कुणी
आणि गोड व्हावा सरता दिवस
असे आपसूक मिळतात सुखाचे क्षण
सगळ्या भवतालावरचा बाळविश्वास
नकळत आपल्यात रुजून मोठा झालेला दिसतो पुन्हा
आणि करावासा वाटतो परत एकदा
आभाळाएवढ्या आयुष्याभोवती फेर धरत
आतबाहेर चिंब भिजण्याचा सचैल गुन्हा


कवियत्री - अरुणा ढेरे

निरोप

बाबा रे,

निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?

कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !

असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारी, जशी गुलबशी

ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.

म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हण, एवढेच पुरे.


कवियत्री - अरूणा ढेरे

तिच्यासाठी

काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...


कवियत्री - अरुणा ढेरे

एक श्वास कमी होतो

नाही विजेचे वादळ, नाही पावसाचा मारा
वारासुद्धा फार नाही, साध्या झुळकीने येतो

दारी सायलीला नुक्ती जरा फुलू येते कळी
कसा कोण जाणे तिचा देठ सुटू सुटू होतो

हाती येणार वाटतो, जातो निसटून क्षण
आणि भिजतात डोळे, उगा हुंदकाच येतो

शोक करावा सा~यानी असा नसतो प्रसंग
फक्त आतल्या सुखाचा एक श्वास कमी होतो.


कवयित्री - अरूणा ढेरे

यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !


कवियत्री - अरुणा ढेरे

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !


कवियत्री - अरुणा ढेरे

देता यावे...

देता यावे हसू
निरभ्र अकलंकित
निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोवळे

देता यावे हात
निर्हेतुक आश्वासक
स्वत:ला स्वत:चा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे

देता यावे शब्द
अम्लान निःसंशय
आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार

देता यावे हृदय
अपार निरामय
दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार


कवियत्री - अरुणा ढेरे

इतक्यातच

इतक्यातच झिमझिमून सर गेली
झुकुन उन्हे, मिटून पुन्हा वर आली

रंग नवा स्वप्नांवर चढत पुन्हा
इतक्यात आस नवी मोहरली

फूल जसे, जीव तसा उमलत ये
इतक्यातच कळ दुखरी सरलेली

खटमधुर जीवनरस टपटपतो
इतक्यातच ऒंजळ ही भरलेली

इतक्यातच गडद तुझी ही सय झाली
विस्कळल्या जगण्याला लय आली


कवियत्री - अरुणा ढेरे