जी. एन्. जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जी. एन्. जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बाई या पावसानं !

बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !

दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं !

फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !

नदीनाले एक झाले, पूर भरुनीया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन !
बाई या पावसानं !


कवी     -    अनिल
संगीत    -  जी. एन्‌. जोशी
स्वर    -    पु. ल. देशपांडे

उघड दार उघड दार

उघड दार उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रिच्या नभात
शांत चांदणे खुले
पांघरूनी रश्मिजाल
गाढ झोपली फुले

अजुन हा निजे न भृंग
मरंद-गुंगिने भुलून
मंजु गुंजनात दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्यां


कवी      -    अनिल
संगीत    -   जी. एन्‌. जोशी
स्वर     -    जी. एन्‌. जोशी

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


गीतकार -  माधव ज्यूलिअन
गायक    -  गजाननराव वाटवे
संगीत    -  जी. एन्. जोशी