शंकर वैद्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शंकर वैद्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पालखीचे भोई

पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

हा असा पाउस पडत असताना

हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहीजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्शं कसं सारखं तिथेच घोटाळतंय…

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमूक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

जिकडेतिकडे पाणीच पाणी

जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे,
झुळझुळणारे गवत पोपटी
लवलवणारे तुरे.

नवी लकाकी झाडांवरती
सुखात पाने-फुले नाहती,
पाऊसवारा झेलित जाती
भिरभिरती पाखरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.

हासत भिजती निळसर डोंगर
उडया त्यांतुनी घेती निर्झर,
कडेकपारी रानोरानी
नाद नाचरा भरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.

मधेच घेता वारा उसळी,
जरी ढगांची तुटे साखळी,
हिरव्या रानी ऊन बागडे
हरिणापरी गोजिरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी
खळखळणारे झरे.


कवि - शंकर वैद्य

शांतता

घराचे पाठीमागले दार उघडले...
तेवढाच काय तो कडीचा आवाज
- बाकी शांतता...
- हिरवी शांतता...
- गार शांतता...
हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण
फुले फुललेली...उमलती शांतता...मंद गंध
नव्हे ... प...रि...म...ल
अलगद उडणारी फुलपाखरें
फांदीवर सरडा..सजग...स्तब्ध
पलीकडे ऊंच आभाळात देवीच्या देवळाचा कळस
त्या भोवती घारीचे भ्रमण
शांततेवर उमटलेला एक वलयाकार तरंग
सरसरत गेलेला पानांचा आवाज...साप
...नंतर कोसळती शांतता
पण मुंग्यांची संथ निमूट चाललेली रांग
...शांतता सजीव...गतिमान
अलगद अलगद तरंगत कुठून तरी आलेले
एक अलवार बाळपीस
वाऱ्याची मंद, नीरव झुळूक
दयाळ पक्षाची एक प्रश्नार्थक शीळ
...शांतता मधुरलेली
मऊ मातीवर उमटलेली माझी पावले...त्यांचे ठसे
जादूचे...गूढ
पुढे पुढे नेणाऱ्या पाऊलवाटेचे लाडीक वळण
पुढे गहन..गगन
शांततेत ऊभे माझे निवांत एकटेपण!


कवी -  शंकर वैद्य