vasant bapat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vasant bapat लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आबाद

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून


कवी - वसंत बापट

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांडा !

उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांडा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांडा !


कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांडा ..
पक्के शिक्के जॅकरांडा
डोळेभर जॅकरांडा
डोकेभर जॅकरांडा !

हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांडा !

इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांडा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांडा !

जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा !


कवी - वसंत बापट

बाभुळझाड

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे ll१ll

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे ll२ll

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे ll३ll

जगले आहे जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांदयावरती सुतारांचे
घरटे घेउन उभेच आहे ll४ll


कवी - वसंत बापट

उत्तुंग आमुची उत्तर सीमा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

कवी - वसंत बापट

मधुबाला

मदीरा साकीसंगे जेथे
एकच होतो मधु प्याला
ती स्वर्गाहुन सुखकर म्हणती
कुणी बच्चंजी मधुशाला
नकोत असल्या व्यर्थ जल्पना
सर्व असंभव काव्यकल्पना
तुम्हास तुमची मधुशाला
अम्हास प्यारी मधुबाला

नार अनारकलीसम नाजुक
पडदा दुर जरा झाला
महाल स्वप्नांचा झगमगता
लखलखली चंद्रज्वाला
डोळे दिपता चोरी झाली
दिलदारांची ह्रदये गेली
कठोर काळा दाद न देता
फरार झाली मधुबाला

कुठे हरपली शोधीत बसला
जगात जो तो दिलवाला
स्वप्नामध्ये खळी चाचपुन
स्पर्शुन पाही कुणी गाला
अजुन तिला मन शोधीत राही
धुंडुन झाल्या दाही दिशाही
रजतपटावर कितीक झाल्या
मधुबाला ती मधुबाला


कवी - वसंत बापट

अमेरीकन शेतकरी भाऊ

अमेरीकन शेतकरी भाऊ केवढं तुमी तालेवार
उगवतीला मावळतीला पघावं ते हिरवंगार
एवढा थोरला बारदाना चारच गडी त्याच्या पाठी
औजारं बी नामी तुमची पेरनी, कापनी, मळनीसाठी
मिशीशीप्पी नदी म्हंजी ईमानदार कामवाली
पानी भरती, चक्की पिसती, बिजलीबत्तीबी तिनंच केली
म्या म्हनलं, "ह्यो राक्किस कोन?"...तर ती फवारनीची चक्की
निस्तं योक बटन दाबा...फसाफसा उडवती फक्की
गाया मस्त दूध देत्यात बैलं कापून खाता म्हनं
अगडबंब गोदामांतनं खंडी खंडी भरता दानं
गहू म्हनां भुईमूग म्हनां समदं बख्खळ पिकत असंल
बाजाराची कटकट न्हाई सॅमकाकाच ईकत असंल
सूटबूट ह्याट पाईप... आयला कामं होत्यात कशी
तुमची पोरं झ्याकूबाज... शिरीमंतांची असत्यात तशी
आमच्या गवनेराला नसतं असं आंगन हिरवकंच
असा बंगला अशी मोटर अशी बायको गोरीटंच


कवी - वसंत बापट

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले.. भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये.. आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी... झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही.. प्रतिभाशाली भाट


कवी - वसंत बापट

भास

संध्याकाळी किनाऱ्यावर एकाएकी झाला भास
कोण आलं... कोण गेलं? कोणीच नाही जवळपास?

कुठून आली... कुठे गेली? मी पाहिली एवढ खरं
अस येणं अस जाणं तिला दिसलं नाही बरं!

चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली
रेतीवरती पाउलखुणा न ठेवता परत गेली

थांब थांब म्हणेस्तोवर कशी दिसेनाशी झाली
गुल्बाक्षीच्या मावळतीवर आली जास्वंदाची लाली!

पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगल का हे पुन्हा येणं?
तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं !

आयुष्याच्या क्षितीजावर अंधारात बुडले रंग
कशासाठी, कशासाठी आता असा तपोभंग?

समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो
ओल्याचिंब देहांनीच पेटलो होतो, विझलो होतो!

आता असे कोरडे.. जसे जळण्यासाठी उत्सुक सरण
निमित्ताला ठिणगी हवी! एवढ्याकरता दिलं स्मरण?


कवी - वसंत बापट.

ये उदयाला नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी

ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल आम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी?

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी


कवी - वसंत बापट

सैनिकाप्रत

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

कवी - वसंत बापट

जिना

कळले आता घराघरातुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेऊनी
हळूच जवळी ओढायाला.

जिना असावा अरूंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडधड.

मूक असाव्या सर्व पाय-या
कठडाही सोशिक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा.

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहूनी
चुकचुकणारी पाल असावी.

जिना असावा असाच अंधा
कधी न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधी न करावी चहाडखोरी.

मी तर म्हणतो - स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पॄथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे...


कवी - वसंत बापट

अलाण्याच्या ब्रशावरती

अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेअर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा, वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरीचाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटणघाटण
पिझ्झाहटचा पिझ्झा खा मेपलज्यूस ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अ ब क ड ई फ ग ... तयार घरे सात टाईप्स
रेडिमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटरपाईप्स
होटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रुचि एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश! गजब तऱ्हा! व्यक्तिवरती सक्तीनाही
सहस्रशीर्ष पुरुषा!! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!


कवी - वसंत बापट

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,
ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,
ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल.

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,
धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,
मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,
ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,
शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...


कवी - वसंत बापट

देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


कवी - वसंत बापट