भूत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भूताचे भविष्य अन् भविष्याचे भूत

एकदा एक भूत
आलं पहायला भविष्य
ज्योतीष्याच्या दारात
भेटले त्याचे शिष्य

त्यांनी त्याला हटकलं
त्याला ते खटकल
थांब म्हणता म्हणता
ते दारातून सटकल

घरात थोडं भटकल
एवढ्यात उंदराच पिटुकल
होत मोठ धिटुकल
त्याच्या पायाला चिटुकल

म्हणत,
भूता तुझी स्वारी
ज्योतीष्याच्या घरी
आली कशी बरी
सांगशील का खरी?

भूत म्हणाल,
जगण्याशी तुटल नातं
जीवनाच बंद खातं
मग भविष्य पहायला
आपलं काय जातं

हसत हसत फिदीफिदी
उंदीर म्हणाला त्याच्या आधी
गोष्ट सांगतो साधीसुधी
नको लागू उद्याच्या नादी

मी होतो जंगलचा वाघ
जंगलात एकदा लागली आग
प्राण्यांची झाली भागंभाग
मला आला भलताच राग

ज्योतीषाला दाखवून पंजा
म्हटलं, विचारतो जंगलचा राजा
सांग भविष्यात काय माझ्या
सांग नाहीतर करीन फज्जा

सांगितलं त्यान सारं खरं
कानात शिरलं भयाण वारं
कितीही झाडली जरी खुरं
तरीही झालं त्याचच खरं

दिसतो मी उंदीर जरी
आरशात पहा मला खरी
बिंबात दिसते वाघोबाची स्वारी
पाहून वाटते भीती उरी

भीती उराताली जाईना
मला पाहवेना आईना
उंदीरपण काही जाईना
वाघपण पुन्हा येईना

तर सांगतो दोस्ता भूता
तुझी तर विझली चिता
मग कशाला अहो करता
उगा उद्याची भलती चिंता

भविष्य म्हणजे उद्याचं भूत
कशाला त्याशी जमवायच सूत
अन् आजच व्ह्यायचं उद्याचं दूत
वर्तमानाच्या मानगुटी भविष्याचं भूत