पाथेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पाथेय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भेट अशी की...

भेट अशी की जिला पालवी
कधीच फुटली नाही
कोर शशीची घनपटलातून
कधीच सुटली नाही

मिठीविना कर रितेच राहिले
दिठीही फुलली नाही
ओठांमधली अदीम ऊर्मी
तशीच मिटली राही

युगायुगांचा निरोप होता
तोही कळला नाही
समीप येऊनी स्वर संवादी
राग न् जुळला काही

खंत नसे पण एक दिलासा
राहे हृदयी भरूनी
अलौकिकाची अशी पालखी
गेली दारावरूनी


कवी - कुसुमाग्रज
काव्यसंग्रह - पाथेय