aarti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
aarti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबरही | साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें |
रामा जनार्दनी | पायीं मस्तक ठेविलें || ३ ||


रचनाकर्ते - समर्थ रामदास स्वामी

गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरे जडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय.॥२॥

लंबोदर पीतांबर फणीवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥जय.॥३॥


रचना - संत रामदास

पांडुरंगाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥
कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥
सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥
ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥

धन्य पुष्पावती भीमासंगम ॥
धन्य वेणूनाद उभें परब्रह्म ॥
धन्य पुंडलीक भक्त निर्वाण ॥
यात्रेसी येती साधु सज्जन ॥ जय. ॥ ४ ॥

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥
चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥

शंकराची आरती

लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा ।
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥

दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें ।
त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥

मारुतीची आरती

जयदेव जयदेव, जय हनुमंता
संकटकाळी तुम्हीच, हो त्राता
भक्तावर व्हावे, त्वा कृपावंता
मिटतील जगती साऱ्याच चिंता
जयदेव जयदेव जय हनुमंता

अंजनी माच्या , परमप्रिय सुता
श्री रामाच्या रे, लाडक्या दूता
तूच सर्वांचाच , असे विघ्नहर्ता
कृपा कर आम्हां त्वरित आता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

शौऱ्याची तूच, साक्षात देवता
तूच धैऱ्याचा, असे रे जनिता
शरण मनोभावे, तुजला रे येता
देसी अभयदान, तूच सर्व भक्ता
जयदेव जयदेव, जय हनुमंता

सीता माईचा, संकटी तू त्राता
लंका दहनाचा ,तूच असे कर्ता
लंकेच्या नृपा, नमविले पुरता
धन्यता मिळते, वीर हनुमंता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

सप्त चिरंजीवात, तुझे असे स्थान
असे तुजला रे, मृत्युलोकी मान
नमती तुजला मनोमनी, सर्व जन
मागती तुजला, शक्तीचे वरदान
जयदेव जयदेव, जय हनुमंता

पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २॥

दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥

गणपति आरती

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती।
विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती।
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥

जय देव जय देव जय गणराजा।
आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥

एकदंता स्वामी हे वक्रतुंडा।
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा।
लप लप लप लप लप लप हालति गज शुंडा।
गप गप मोद्क भक्षिसी घेऊनि करि उंडा॥जय.॥२॥

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा।
कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा।
परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा।
नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा॥३॥

भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा।
हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा।
प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥जय.॥४॥

गणपति आरती

आरती करु तुज मोरया।
मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥

सिद्धीबुद्धीपती संकटनाशा।
विघ्ननिवारण तूं जगदीशा॥ आरती करुं.॥१॥

धुंडीविनायक तू गजतुंडा।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥ आरती करुं.॥२॥

गोसावीनंदन तन्मय झाला।
देवा देखोनिया तुझ शरण आला॥
आरती करुं तुज मोरया.॥३॥

गणपतीची आरती

उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी।
हाती मोद्क लाडू घेउनियां खासी।
भक्तांचे संकटी धावूनि पावसी।
दास विनविती तुझियां चरणासी॥१॥

जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥

भाद्रपदमासी होसी तू भोळा।
आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा।
कपाळी लावूनी कस्तुरी टीळा।
तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥ जय.॥२॥

प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला।
समयी देवे मोठा आकांत केला।
इंदु येवोनि चरणी लागला।
श्रीराम बहुत श्राप दिधला॥ जय.॥३॥

पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा।
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता।
मला बुद्धी देई तू गणनाथा॥

जयदेव जयदेव ॥




नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्ने परिपूरिता पात्रे ॥
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्ठि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ॥१॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ जयदेव जयदेव ॥

तूझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेही हरतीं ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनी अंती भवसागर तरती ॥२॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ जयदेव जयदेव ॥

शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शशितरणी ।
त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ॥
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती
तूझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ जयदेव जयदेव

प्रथम तुला वंदितो




प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया ॥धृ.॥

विघ्न विनाशक, गुणिजन पालक, दुरीत तिमीर हारका
सुखकारक तूं, दु:ख विदारक, तूच तुझ्या सारखा
वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभू राया ॥१॥

सिद्धी विनायक, तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधीशा, गणाधीपा वत्सला
तूच ईश्वरा सहाय्य करावे, हा भव सिंधू तराया ॥२॥

गजवदना तव रूप मनोहर, शुक्रांबर शिवसुता
चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
ॠद्धी सिद्धीच्या वरा, दयाळा, देई कृपेची छाया ॥३॥

जय देव जय गणपति स्वामी




जय जय विघ्नविनाशन जय इश्वर वरदा।
सुरपति ब्रह्म परात्पर सच्चिंद्धन सुखदा॥
हरिहरविधिरुपातें धरुनिया स्वमुदा।
जगदुद्भवस्थितीप्रलया करिसी तूं शुभदा॥१॥

जय देव जय देव जय गणपति स्वामी, श्रीगणपती स्वामी, श्रीगणपती स्वामी।
एकारति निजभावें, पंचारति सदभावे करितो बालक मी॥धृ.॥

यदादिक भूतात्मक देवात्मक तूचि।
दैत्यात्मक लोकात्मविक सचराचर तूंची॥
सकलहि जिवेश्वरादि गजवदना तूंची।
तवविण न दिसे कांही मति हे ममसाची॥जय.॥२॥

अगणित सुखसागर हे चिन्मया गणराया।
बुद् धुदवत् जैअ तव पदि विवर्त हे माया॥
मृषाचि दिसतो भुजंग रज्जूवर वायां।
रजतमभ्रम शुक्तीवर व्यर्थचि गुरुराया॥ जय.॥३॥

अन्न प्राण मनोमय मतिमय हृषिकेषा।
सुखमय पंचम ऐसा सकलहि जडकोशां॥
साक्षी सच्चित् सुख तू अससि जगदीशा।
साक्षी शब्दही गाळुनि वससि अविनाशा॥जय.॥४॥

मृगजलवेत हे माया सर्वहि नसतांची।
सर्वहि साक्षी म्हणणे नसेचि मग तूचि।
उपाधिविरहित केवळ निर्गुणस्थिती साची।
तव पद वंदित मौनी दास अभेदेची॥जय देव.॥५॥

दुर्गे दुर्गट भारी




दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी ।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी ।
वारी वारी जन्म मरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी महिषासूर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥

त्रिभुवन भुवनी पहाता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तु भक्तालागी पावसी लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदनी प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशा पासुन सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरि तल्लीन झाला पद पंकजलेशा ॥ ३ ॥



शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ।

दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको ।

हाथलिये गुडलड्डू साई सुरवरको ।

महिमा कहे न जाय लागत हुं पदको ॥१॥

जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।

धन्य तुमारो दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।

विघ्नविनाशन मंगल मूरत आधिकारी ।

कोटीसूरज प्रकाश ऎसी छबी तेरी ।

गंडस्थलमदमस्तक झूले शशिबहारी ॥जय.॥२॥

भावभगतिसे कोई शरणागत आवे ।

संतति संपत्ति सबही भरपूर पावे ।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।

गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय.॥३॥

साईनाथ आरती

जोडूनिया कर चरणी ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा ।। १ ॥

असो नसो भाव आलो तुझिया ठाया ।
कृपादॄष्टी पाहे मजकडे सदगुरूराया ॥ २ ॥

अखंडित असावे ऐसे वाटते पायी ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देई ॥ ३ ॥

तुका म्हणे देवा माझी वेदीवाकुडी ।
नामे भवपाश हाती आपुल्या तोडी । ४ ॥

रचनाकर्ता-जगद्गुरू तुकाराम महाराज

संत नामदेव आरती




जय जयाजी भक्तरायां | जिवलग नामया |
आरती ओवाळिता | चित्त पालटे काया ||धृ.||

जन्मता पांडुरंगे | जिव्हेवरी लिहिले |
शतकोटी अभंग| प्रमाण कवित्व रचिले ||१||

घ्यावया भक्तिसुख | पांडुरंगे अवतार |
धरुनियां तीर्थमिषें | केला जगाचा उद्धार || जय.||२||

प्रत्यक्ष प्रचीती हे | वाळवंट परिस केला |
हारपली विषमता | द्दैतबुद्धी निरसली || जय.||३||

समाधि माहाद्वारी श्रीविठ्ठलचरणी |
आरती ओवाळितो | परिसा कर जोडूनी | जय जयाजी ||४||

संत तुकाराम आरती

आरती तुकारामा | स्वामी सदगुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ति | पाय दाखवी आम्हां ||१||
आरती तुकारामा ||ध्रु.||

राघवें सागरांत । पाषाण तारियेलें |
तैसें तुकोबाचे । अभंग रक्षियेले ||२||

तुकितां तुलनेसी | ब्रह्मा तुकासी आले |
म्हणोनि रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें ||३||