shrikrushna raut लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
shrikrushna raut लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुलाल

माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही-
श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.


गझलकार - डॉ.श्रीकृष्ण राऊत
संग्रह - गुलाल आणि इतर गझला

वरात

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत
संग्रह - 'गुलाल आणि इतर गझला'

दुकान

दोह्यात जीव नाही, गझलेत जान नाही;
शायर जगात दुसरा माझ्या समान नाही.

चोरून रोज खातो उर्दू मधील लोणी;
सायीवरी मराठी माझे इमान नाही.

गेली हयात सारी वाया तुझी गड्या रे;
तू एक वाचलेला माझा दिवान नाही.

आश्चर्य हे मला की झाली न ‘अहम’बाधा;
माझ्याशिवाय आता कोणी महान नाही!

तू देणगी दिली ना जाहीर वा छुपीही;
वेड्या तुला कधीही मिळणार मान नाही.

त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वत:ला;
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही.


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत

पहारा

तुला पाहिजे तसे वाग तू
भल्या बुऱ्याला लाव आग तू

उगाच खोटी भीड कशाला
हक्क आपला तिला माग तू

कुठे अचानक गायब झाले
त्या सत्याचा काढ माग तू

जमेल जेथे मैत्र जिवाचे
तिथे फुलांची लाव बाग तू

मनात नाही त्याच्या काही
नकोस त्याचा धरू राग तू

अजून नाही रात्र संपली
सक्त पहारा देत जाग तू


कवी - डॉ. श्रीकृष्ण राऊत

शुभेच्छा

हा प्रश्न एकदाचा लावा धसास राजे
टांगून ठेवलेले त्याला कशास राजे

छातीवरील जागी कोटात छान दिसती
फेकू नका फुलांना घेऊन वास राजे

सांगू किती नवाई ह्या धूर्त कावळ्यांची
ताटामधून नेती काढून घास राजे

सेतू तसा नवा, पण हा कोसळेल केव्हा
याचा अचूक पक्का बांधा कयास राजे

जेवण नसेल तर मग सांगा खुशाल चुटके
जनता सभेत बसली आहे उदास राजे

दुष्काळग्रस्त गावे देतात ह्या शुभेच्छा
होवो सदा सुखाचा तुमचा प्रवास राजे


गज़लकार - डॉ.श्रीकृष्ण राऊत