लावणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लावणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

संध्येंतील चोवीस नामांवर

अनंत भगवंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥धृ०॥

केशवकरणी अघटित लीला नारायण तो कसा । जयाचा सकल जनावर ठसा ।

माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाचे रसा । पीत जा देह होइल थंडसा ।

विष्णु स्मरतां विकल्प जाती मधुसुदनानें कसा । काढिला मंथन समयीं जसा ।

वेष घरुनि कापटय मोहिनी भाग करि निमेनिम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगबंताचीं नामें त्यांतूनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥१॥


त्रिविक्रमान त्रिताप हरिले भक्तीचे सर्वही । वामनें दान घेतली मही ।

श्रीधरसत्ता असंख्य हरिती दुष्‍टांचे गर्वही । वंदिल्या ह्रुषिकेशाच्या रही ।

पद्मनाभ धरियेले तेथुनि देव झाले ब्रम्हही । दामोदरें चोरिलें दहीं ।

गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्‍ठादि गौतम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंतांची नामें ॥२॥

संकर्षण स्मरतांना षड्रिपु नाशातें पावती । स्मरारे वासुदेवाप्रती ।

प्रद्युम्नाचा करितां धावा गजेंद्र मोक्षागती अनिरुद्ध न वर्णवे स्तुती ।

क्षीरसारगरिंचें निधान पुरुषोत्तम हा लक्ष्मीपती । स्मरारे अधोक्षजातें प्रती ।

अपार पापें स्मरतां जाती वाचे पुरुषोत्तम । गाइल्या उद्धरती अधम । अनंत भगवंताचीं ० ॥३॥

प्रल्हादाचे साठीं नरहरि स्तंभी जो प्रगटला । अच्युतें कालनाथ मर्दिंला ।

जनार्दनाची अघटित लीला कीर्तनीं ऐकूं चला । उपेंद्रा शरण जाई तो भला ।

हरिहर स्मरता त्रिबार वाचादोष सर्व हरियला । गोकुळीं कृष्णनाथ देखिला ।

रामलक्ष्मण म्हणे तयाच्या नामें गेला भवभ्रम । गाइल्या उद्धरती अधम ॥

अनंत भगवंताचीं नामें त्यांतुनि हीं उत्तम । गाइल्या उद्धरती अधम ॥अ० ॥४॥


कवी - अनंत फंदी

बाजीराव कारकीर्द

दुनयेला तिळमात्र उपद्रव काडी नसावा । उलटा सुलटा आया जमाना आतां कधीं चक बसावा ॥ध्रु०॥

दुनयेमध्यें लोक बांडे अनर्थ मोठा करतात । शेत कापुनि त्या कुणब्याचें त्याला बिगारी धरतात ।

वड पिंपळ तोडुनि मोकळे केवढे धर्म आचरतात । घरांत कडबा असला म्हणजे महार पोर आंत शिरतात ।

हत्ती घोडे उंट बैल खुप सलिदा कसावा । मालधन्यानें उगाच आपला पाहत तमाशा बसावा ।

घ्या घर तुमचें दुनयेला तिळमात्र उपद्रव काडीमात्र नसावा । उलटा सुलटा आया जमाना आतां कधीं चक बसावा ॥

नल पिंगल दो सवत्सर हुमजुसकु दुख पैदा । दोदिन घरमे चुप बैठो हाय हुवाजी तुमकु बैदा ।

आपने दिलकी क्या खबर हये तुम कहते बैदा बैदा । सचे आदमी भुके मरते झुटा खावत हय मैदा ।

देऊन दस्ता खांद्या वरता फिरुन सोटा धरावा । देख आगाऊ चलना यारो घेऊन द्याना विसावा ।

लई शीण झाला । दुनयेला तिळमात्र० ॥२॥

खेडीं पाडीं भलताच लुटितो कुणब्याचा जीव उदासला । सुपें टोपलीं बिगार वाहतां बाहतां बिट्टा वासला ।

ज्याच्या घरावर हल्ला तो कुणबी ओझ्यानें त्रासला । चल तेरे जोरुकु चोदु देऊं धक्का पाडूं पासला ।

शरिराची अवघी अवस्था भगवंताला पुसावी । मारी सोटे घेतो झोले बैल भाडयाचा कसावा । चल पळ मोहरं ॥३॥

मागें जाणे जोशी सांगत होते राजीक होईल । रक्ताचे पूर वाहतील नवी मुद्रा उभी राहील ।

कुणी कुणाचें नोहे अति एकंकार होईल । येतील टोपीवाले अशी कांहीं दिवस झुळुक वाहील ।

झाले बाजीराव धणी आतां पृथ्वीला आनंद असावा । जुने मुत्सदी घरीं बसविले दोन दिवस घ्या विसावा ।

लई शिण झाला ॥दुन० ॥४॥

शिपाई थेसो फर्जी हो गये आपने आपने जगा मगन । लाल अखिया कहर कहर उसे रह्मा दो बोटं गगन ।

चल पाटील थोडा जलदी लाव देऊ धका पाडूं सदन । चल तेरे जोरुक चोदु खडा रहे व क्या होवे अलग ।

करो खुदाकी बंदगी यारो उचे मालसे बिकावोंमे । फंदी अनंद कहे उलटी दुनया । किदरसे शिकशिकावोंगे ।

मै चुप बैठ० ॥५॥


कवी - अनंत फंदी

नको जाऊ बाहेरी

नको जाऊ बाहेरी गोर्‍या आंगाशीं लागेल ऊन वारा । बिसणीच्या पलटणी उभे पाहावयास जग सारा ॥धृ०॥

पाई बिचेव पोल्हारे जोडवीं नाद अवघे एकवटले ॥ मांडयांचें गोरेपण पाहून सपेटित मागें हाटले ॥

नाषुक गोरे गाल घडीग परटाची जरा नाहीं मळकटले ॥ इतर स्त्रियांचे मुखडे मज भासती तुझ्या पुढें कळकटले ॥

बहु नाजुक पुतळी झराझर चालण्याचा झटकारा ॥ जशी तोफेवर बत्ती हत्तीच्या पावसाचा फटकारा ॥ नको० ॥१॥

हातीं हिर्‍यांच्या मुद्या चमाचम जसें चांदणें फटफटलें ॥ ऐसी वस्तु कधीं लाधल मनामधी कैक विलासी लठपटले ॥

लज्जीत मृग जाहले पाहतां मनामध्यें चटपटले ॥ इतर स्त्रियांचे मुखडे मज भासती तुझ्यापुढें कळकटले ॥

होट पवळीचे वेल वोट चवळीच्या सेंगा बहुतशिरा ॥ दंत शुभ्र शोभिवंत काळ्या दातवणांच्या मधीं चिरा ॥ नको० ॥२॥

मस्तकी मुदराखडी झोंक वेणीचा थरारी भुजंग जसा ॥ वदनचंद्र न्याहाळी हातीं घेऊन अरसा ।

बालोबाल ग मोती गुंफुनी रेखून भांग करिती सरसा । अटकर छाती सुंदुक त्यावर कुच कंदुक भरला तरसा ॥

सरळ नाक तरतरीत नित्य भरजरीत डुब आलबेली तर्‍हा । तुलाच पाहून भुललों नारी कलम करिना धरी चिरा ॥ नको० ॥३॥

चंद्र तुझा पहा मुखचंद्रावर येउनिया बैसला कसा । प्रत्यक्ष मज भासतो फणीवर त्या नागाचा मणी जसा ।

शब्द तुझा ऐकूनि कोकिळा पांगल्या त्या दाही दिशा । न दाखवी गडे सिंहकटी पाहून झाला हिंपुष्‍टा ।

फंदी मुलाचे छंदबंध कुठवर गेला तर्ख धरा । दिल्लीच्या ह्या पलिकडे बोभाटे झाले हे पोबारा ॥ नको जाऊं० ॥४॥


कवी -अनंत फंदी

जमाना आला उफराटा

जमाना आला उफराटा । सुन सासूला लावी बट्टा ॥धृ०॥

लेक बापाशीं लावी आवभाषी । शिष्य गांजितो गुरुशीं । जावई सासूला म्हणतो तूं काशी ।

लवंडून देतो मातेशीं ॥चाल॥ मेहुणीचा चालवी लाड । बहिणीला म्हणे तूं रांड । चाल निघ घरांतुन द्वाड ।

तुझी नाहींग मजला चाड । माझी बायकोच मजला गोड । नाहीं सासर्‍याची ठेवली भीड ।

बेटा लबाड पाहून बापाला लटका धरी ताठा । जमाना आला आला उफराटा ॥सून० ॥१॥

धन्यावर चाकर झाले फिखान । उलटून पडले बेइमान । सावकाराशीं कुळ गेलें बदलून ।

करीती मुदत लबाडीनें ॥चाल॥ अशी कलियुगाची रीत । सोय नाहीं दरबारांत । खर्‍याचें खोटें होत ।

पाटील हकिमाचें मत । कीं बुडवावी रयत । खासदार झाले राऊत । शिपाई हाकिती आऊत ।

झाले भवानीचे भूत । जोशी झाले पंडीत । भट करी वटकिशीं मोहोबत । दप्तर पडलें सांदींत ।

आतां तरी पाहे अक्कल धरी भटा । जमाना आला आला उफराटा ॥सुन० ॥२॥

मारवाडयानें दुनया नाडली फार । करिती भलताच व्यापार । साळी कोष्‍टी शिंपी सोनार ।

हे तो झाले सरदार ॥चाल॥ असा कलीचा वारा । गरती जाती परदारां । दोहीं कुळीं पाडिती आंधारा ।

तेलाचा उणा पावशेरां । तुटपुंज्या करितो तोरा । फुगून बसला पीसारा । ताथावर हाणीतील वारा ।

तो या काळा मधें बरा । फंदी म्हणे अक्‍कल धरा । मज गव्हरा । दे कलगीवर सोटा । जमाना आला० ॥३॥


कवी - अनंत फंदी

चंद्रावळ

नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी । पतिव्रता चंद्रावळ भोगिली त्या भगवंतांनीं ॥ध्रु०॥

अप्रतीम चंद्रावळ पाहून भुलले वनमाळी । तिचा नेम असा कीं सूर्य टळेल एक वेळीं ।

परि ती सत्कर्माशीं न टळे, कुकर्मा वेगळी। राहीची धाकुटी बहिण ऐका चंद्रावळी ॥चाल॥

फुल सव्वाशेर भार वजन चंद्रावळ । मृगनयना एक एक डोळा दिसे चंचळ । कुच उरीं हालती दोन्ही मुक्ताफळ ।

अंगीं वीर्य जसें कुपींतील जल निर्मळ । ह्रदयावर जोबन दोन्ही हालती कमळ । वेणींत केवडा सुगंध परिमळ ।

गोरी भुरकी गाला वरता हिरवा तीळ । मंजूल शब्द जशि टाहो करिति कोयाळ । कंठांतुन पिक दिसे अशी वेल्हाळ ।

नार कळसूत्र दिसे बाहुली । नाशीक चोंच राव्याची देह कोमळ । भर सव्वाशेर वजन चंद्रावळ ।

नार फारच हलकी जसें तुंबिनीफळ । हा तिचा नेम कीं राहावें निर्मळ । काय सूर्य टळेल नेमाशीं एक वेळ ।

परि ती न टळे ऐशी चंद्रावळ । त्या चंद्रावळीचा नेम असा असेल । त्या नगरामधीं स्वतां हरी शिन्नळ ।

चंद्रावळ पाहतां न पडे त्याशीं कळ । तेव्हां भगवंतानीं तिथें मांडिला खेळ । राहीचें रुप मग नटले तमाळनिळ ।

अलंकार अंगावर घालुनि तेव्हां भगवंतांनीं । राही झाले भगवान अलंकाराची मांडणी । नट धीट अचाट० ॥१॥

तेव्हां राहीचें रुप नटले ऐका ह्रषिकेशी । अलंकार अंगावर घालुनि तेव्हां त्या समयाशीं ।

जडिताचा शृंगार कोंदणे हिरे जिनसा जिनसी । राही काय त्या पुढें किं नटला श्रीरंगा ऐशी ॥चाल॥

राहीचे रुप मग नटला मुरलीधर । घालुनि मूद राखडी राव माथ्याबर । तिपेड गंगावन वेणी गुंफी पदर ।

मस्तकीं बिजवरा माथ्यावर मासा बोर । नाकामधीं नथ सरज्याची वर बिल्लोर । मोत्यांनीं भरला भांग बहुत सुंदर ।

कर्णफूल शिसफूल तानवडा वर चौफेर । वेल्या, बुगडया, काप पडे प्रकाश गालावर । कानीं धेंडया आणिक वेलबाळया मोत्याचे सर ।

पानबाळ्या तिथे मासबाळ्या मारी लहर । नालबाळ्या अबदागीरबाळ्या तर्कधर । खुंटबाळ्या साध्या बाळ्या त्याजवर ।

मोतीबाळ्या दाळिंबीबाळ्या त्या गंभीर । बोंडबाळ्या कोथिंबिरीबाळ्या बहुत सुंदर । चंद्रबाळ्या आणिक चिंचबाळ्या त्याजवर ।

घोसबाळ्या पर्डीच्या बाळ्या ल्याली सुंदर । झुबुकबाळ्या मखमालीबाळ्या तानोडयावर । खिरणीबाळ्या पोवळ्याच्या बाळ्या तर्कधर ।

हिरी बाळ्या कंगणीबाळ्या मनोहर । नागबाळ्या फणिंद्रबाळ्या हातीं हातसर । मुदबाळ्या पठाडी बाळ्या नथेवर मोर ।

हौदीबाळ्या पतंगीबाळ्या तुटती तार । कुर्डुबाळ्या मंडवीबाळ्या चाले छ्बीदार । फुलवाळ्या बतिसा बाळ्यांचा प्रकार ।

कानीं कुडुक ते बहू सुंदर दिसती । ताईतपेटी दुल्लडी सात पदर । पुतळ्यांची बोरांची जवाची माळ नवसर हार ।

दंडी बाजुबंद गजरानें भरला कर । गुजराथी कांकणें अंगुस्तान न जांहगिर । रत्‍नजडित पाटल्या पवच्या मनोहर ।

दंडी वेळा वाकडया गुजर्‍याचा झणत्कार । बसविले नागिना मंगलसूत्रावर । एकदाण्याची खरबुजी तर्‍हा सादर ।

चितांग चिंचपेटया मारी लहर सुंदर । अणवट बिजवे विरोद्या वरति स्थापिले मोर । हातिं मोतीसर वाक्या साकळ्या घालुनिया चरणीं ।

राही झाले भगवंत श्रृंगार झाला येथुनी । नट धीट अचाट० ॥२॥

चंद्रवळीघरीं गेले श्रीहरी राहीरुप धरुन । परिचारिका सांगती आली बाई तुमची बहिण । दिला बसाया पाट ऐका त्या चंद्रावळिनं ।

चंद्रावळ म्हणे बाई आज तुझें कोणीकडे येणें । चाल । राही म्हणे आजग बाई उदासलें मन । म्यां म्हटलें आज यावें बहिणीला भेटून ।

तेव्हां चंद्रावळ पाहे जरा तिजकडे न्याहाळून । बाई तुझ्या उरावर कांगे दिसेना स्तन । तुझी पुरुषाची आकृति दिसती जाण ।

तेव्हां उराकडे पाहे अवचित नारायण । तेवढीच कळा विसरला मधुसूदन । ह्मणे आतां हें सोंग न्यावें संपादुन ।

पुसूं नको ग सखये माझें दुःख मी जाणें । भाल्याची जखम काय होतें तुला सांगून । एके दिवशीं सत्यभामा मनमोहन ।

दोघे निजलेग मजला खोलिमध्यें कोंडून । त्या काळजीनें हा जीव गेला कर्पुन । पुसूं नको गवळ्या घरिं कष्‍टाची धन ।

चंद्रावळ ह्मणे बाई आतां तुला न्हाणिन । मी न्हाइना बाई खुण केली वेणिला त्यानं । श्रीकृष्णाची कदर फार दारुण ।

आतां तुलाच न्हाणिन मग घरां जाइन । आतां भ्रतार येईल तुझा बाहेरुन । तो थट्टा करील माझी मेव्हणीच्या नात्यानं ।

तेव्हां ठेवी चुलीवर गुंड पाण्याचा राही तत्क्षणीं । असे हरीचे खेळ देव मग चंद्रावळ न्हाणी । नट धीट अचाट राही० ॥३॥

राही ह्मणे चंद्रावळी उठ बाई मग करी स्नान । पितांबर परिधान चंद्रावळ ठेवी फेडून । चौरंगावर उभी ठाकली चंद्रावळ नग्न ।

राही गंगालयांत पाणी घाली त्या हंडयांतून । चाल । राही घाली ऊन पाणी चंद्रावळीवर दाटून । चंद्रावळ म्हणे बाई पाणी फारच ऊन ।

ऊन पाणी बरें त्यानें जाइल तुझा शीण । ऐसें चंद्रावळीशीं न्हाणिलें राहीनं । त्या चंद्रावळिचा पति आला बाहेरुन ।

त्यानें राही पाहिली करि मग हास्यवदन । आज कोणिकडेग मेहुणी केलें येणं । म्हणे उगीच आलें इला भेटाया कारणं ।

तेव्हां चंद्रावळिनें स्वयंपाक करुन । ह्या पुर्‍या पोळ्या घावण्या तेथें काय उणें । तेलच्या आणिक फेण्या गुरोळ्या जाण ।

आणिक बुंदीचे लाडू वाढी युक्तीनं । केशरी भात वर केळाचें शिखरण । लोणकढें तूप आणविलें मागून तिनें ।

भोजन करितां पति चंद्रावळिचा म्हणे । तुम्ही दोघी बहिणी निजा महालिं जाउन । आज आम्ही एकटे निजूं बाहेर जाऊन ।

तेव्हां पतिला तोशक दिला दारिं अंथरुन । राही आणि चंद्रावळी दोघी गेल्या निजभुवनीं । नट धीट अचाट राही नटला ॥४॥

बंगल्यामधिं अरास केली त्या चंद्रावळिनं । अबिर बुक्का सुवास आणिला राही कारणं । पलंग तिवाशा लोड जंबुखा टाकून ।

बहुता दिवशीं राही बहिण आली म्हणुन । चौफुला ठेवुन मधीं पानपुडा आणविला । चहूंभोतीं समया मधिं कंदिल लाविला ।

राही म्हणे दिव्यानें झोंप येईना मला । त्या चंद्रावळीनें दिप विझवुन अंधार केला । तेव्हां निद्रा आली त्या चंद्रावळिला ।

अंगाशीं अंग लागतां देव चंचळ झाला । धरि हळू स्तनाला मुखचुंबन रगडिला । जागी झाली चंद्रावळ हरि ऐसा भासला ।

अरे पाप्या दुष्‍टा भंग तपाचा केला । एक वेळ मीं हांसत होतें चंद्राला । मी पतिव्रता त्वां कसा डाग लाविला ।

जर अशी गोष्‍ट ही सांगावी भ्रताराला । तो म्हणेल स्त्रीचा पुरुष कैसा झाला । दोहिंकडून आड ना विहीर झाली मला ।

तेव्हां हरी म्हणे इला नवल काय दाखवावें नयनीं । अकस्मात दिवे लाविले तिच्या निजभुवनीं । नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी ॥५॥

विष्णुदुताला आज्ञा केली पहा भगवंतानं । स्वर्गाहुन विमान आणिलें तत्क्षणीं जाण ।

देवानें चंद्रावळ विमानांत बसवून एकवीस स्वर्गें चंद्रावळिला दाखविलीं जाण । श्रीहरीनें चंद्रावळ नेली मोक्षपदाशीं ।

सृष्‍टीची घडमोड यमपुरी दाखवी तिशीं । सदाशिव दाखविला कैलासासी । खालीं उतरुनिया आणिली समुद्रापाशीं ।

खांबाची द्वारका दाखवी चंद्रावळीसीं । तेव्हां देव ठसला चंद्रावळिसीं । घाली लोटांगण तेव्हां हरिचरणाशीं ।

नाहिं झाला भोग तुम्ही फेडून घ्या असोशी । देवानें आड धरिलें सुदर्शनासि ।

केलि सहा महिन्यांची रात्र त्या समयासी प्रीतिनें भोगिलें दिलें अलिंगन तिशीं । चंद्रावळ म्हणे देवा नको अंतर देऊं मशीं ।

तेव्हां देव बोलले त्या चंद्रावळीशीं । जेव्हां स्मरशिल तेव्हां आहें तुजपाशीं । फंदिमलिकचा ठिकाण पोखरिशी ।

करि अभंग लावण्या धाक पडे वैर्‍याशीं । फंदि अनंतची लपेट झपेट ही विकट बिकट धरणी ।

रतिरती समजुन कसली पहा ब्राह्मण राणी । नट धीट अचाट राही नटला सारंगपाणी ॥६॥


कवी - अनंत फंदी

दुष्काळ

उलटा जमाना आलारे । सेवक स्वामींचें मानीना ॥ध्रु०॥

जिकडे तिकडे टोळ माजले । दुनियाचें केलें वाटोळें । मुलुख कूल उजाड हलकल्लोळ ।

आंगावरते चमक्याचे ओळ । कुठवर घालतील हळदी बोळ । जी सांपडली तिलाच घोळ ।

घरें दारें जाळुनिया कोळ । गरिबा भोंवते माजलेत पोळ । एकामागें एक जैसे लोळ ।

ईश्वरें पैदा केले ओढाळ । नराहे खोंडया मका कडोळ । कारलीं भेंडया वांगीं पडोळ ।

किती दिवस राहील पाणी गढूळ । ओस परगणा जालारे । उलटा जमाना आलारे । सेवक स्वामी० ॥१॥

कलीमहात्म आलें उफराटें । होऊं लागलें खर्‍याचें खोटें । खाटमार ऐकलांत कोठें ? ।

ज्याला न भरवे आपलें पोटं । ते जैसे मोंगलाचें बेटे । ठेवितात फिरवून पागोटें ।

महार पोरग्याचे गळ्यांत गेठे । हुरडा खाऊन बनले लोठे । गव्हार जगली जट लंगोटे ।

त्यांना आभाळ दोनची बोटें । दे उगेच भलत्याला सोटे । वाटसरु बागेना वाटे ।

उगेच माजले गाटेगोटे । दुनयेचा फुटाणा केलारे । उलटा जमाना आलारे । सेवक० ॥२॥

धर बिगारी भलताच धरावा । ब्राम्हण शूद्र न ओळखवा । जेथील मुक्काम तेथची न्यावा ।

वस्त्रें घेऊन नागवावा । माघारें बोडकाची लावावा । तिकडून शिपाई दुसरा यावा ।

हा त्याला वाटेस भेटावा । परंतु त्याणें तोच दामटावा । परतुनि न्यावा मागल्या गांवां ।

असा कितीवेळ यावा जावा । ज्याचा गहूं हरबरा लुटावा । तोच बिगारी पुढें पिटावा ।

गांवकर्‍यांचा प्राण आटावा । कारभारी तो निघून जावा । गरीब एखादा हातीं लागावा ।

त्याच्या मतें पाटीलबावा । मारा खालीं भोत भरावा । आंगठे धरवाया लावावा ।

कळेल येवढा धोडा द्यावा । कोठें पुरलें ? ठिकाण दावा । खंडणीचा ठैराव ठरवावा ।

महाप्रळय यांना आलारे। फंदी अनंद सांगे जमाना । उलटा जमाना आलारे । सेवक० ॥३॥


कवी - अनंत फंदी

दुष्काळ २

उलटादमान आयाजी आया । सेवक खामींचें मानिना ॥ध्रु०॥

जिकडे तिकडे माजले टोळ । दुनियेचें वाटोळें झालें । मुलूख कुल उजाड हलकल्होळ ।

आंगावरती चमक्यांची ओळ । घालतील कुठवर हळदी बोळ । राहिना कोठें मकाला (?) डोळा ।

कार्लीं भेंडया वांगिं पडवळें । जसा माल बापाचा बापाचा । बांधिति मोटारे मोटा ।

सत्कर्माचा तोटा । समय खोटारे खोटा ॥उलटा०॥१॥

कलिमहात्म्य उफराटें । होऊं लागलें खर्‍याचें खोटें । खाटमार ऐकिलांत कोठें ? ।

ज्याला न भरवतीं आपुलीं पोटें । ते जसे मोंगलाचें बेटे । फिरवुनि ठेवितात पागोटें ।

महार पोरग्याच्या गळ्यांत गाठये । हुर्डा खाउनि बनले बेटे । फार माजले गांटे गोटे ।

उलटा दमाना आयाजी आया । सेवक स्वामींचें मानिना ॥२॥

धामधूम चोहोंकडेच गर्दी । पठाण कंपु आरब गारदी । जिकडे तिकडे फांसे पारधि ।

लोक मिळाले महा बेदर्दी । ज्याला मिळेना भाकर अर्धी । त्याला बसाया घोडी जर्दी ।

त्यासी बडेजाव आठ चांरदिं । सवेंचि झाली भाऊ गर्दी । तशामधें जे होते दर्दी ।

पार पडले मर्दामर्दी । दुनियेचा फुटाणा झालारे झाला । सेवक स्वामींचें मानीना ॥३॥

घर बिगारी भलताच धरावा । ब्राह्मण शूद्र शोध न करावा । जेथिल मुक्काम तेथेंच न्यावा ।

वस्त्रें घेऊन नागवावा । त्याला माघारा बोडका लावावा । त्याला दुसरा शिपाई भेटावा ।

त्याणेंच पुढें दामटत्वा । असा अवघि वेळ यावा जावा । ज्याचा गहूं हरबरा लुटावा ।

तोच बिगारी पुढें पिटावा । गांवकर्‍यांचा प्राण अटावा । पाटिलबाबा पळोनि जावा ।

गरिब एखादा हातिं लागावा । त्याचे मतें पाटिल बाबा । माराखालीं भोत भरावा ।

खंडणीचा ठराव ठरवावा । त्याचे जिवाला हा प्रळय झालारे झाला ॥सेवक स्वा० ॥४॥

हातांत भाला जेवूं घाला । कोण कुणाचा गुरु ना चेला । भलताच धमकावी भलत्याला ।

चोर दंडितो कोतवालाला । हा एक दाखला मिळाला पतिव्रता मुकली प्राणाला ।

शिनळ चढली लौकिकाला । सांगत फिरते ज्याला त्याला । एक जात टोपीवाला ।

मीं नाहिं भ्यालें पन्नासांला । अनंतफंदी सांगे जनाला । उलटा दमाना आयाजी आया । सेवक स्वा० ॥५॥


कवी - अनंत फंदी

जोरु कसमका कज्या

जोरु कसमका कज्या मुनो हाजा लढते फिरतेते ॥ बडा हजांबा खडा एकपर एक धबाधब गिरथेते ॥ध्रु०॥

खानोपिनेके तंगशाई येतोनाका दिननिकला ॥ माबापनो भलान किया मजपर रुटा हागतारा ।

साराघर दिनभुला खडू किबन हिकरता मुकाला । मयचरखेकेकमाई काहा लाग तुझे खिलाऊ नगदुल्ला ॥

पुढायतानें धरलिया सोसो येरझार करतिथे ॥बडा० ॥१॥

तुक्या कमाती फत्तर चुडयेल क्यो करती हाय हाय ॥ ऐसे लगकार जुया मारु एक बाल नहिरहने पाया ।

क्यापशम चरखेके कमाई हाम शिपाई हारगिसना खाया । दररकिब मारे तलबारा लोहखना खन तुटता जाय ॥

ये दुःख काल ककालेमे तेरे माबाप जगावे मरयेते ॥बडा० ॥२॥

सच कहुप्यारे सचकहु तुझे खुदाकी सौंगन कहा नौकरी रोताया ऐसा उलटा समया आया तिन दीन भुका मरथाता ।

तुझे तो रोटिका सपना औरतकुक्या खिलताया । मुये तुझेमे चाटु का हांडया धुके पिताया ।

तेरे सरीखे मेरे बापकु घरमे पानी भरतेथे ॥बडा० ॥३॥

रांडभांड बिछडीतो प्यारे फिर अबरु रहती कैसी । मरद आदमी झुटा होयतो नेक पतिव्रता जैसी ।

अनंतफंदीके छंद जैसे तलावमे कमल तिरथेते ॥४॥


कवी - अनंत फंदी

क्षीरसागरीचा हरी

क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी । अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥ध्रु०॥

जशी जिची भावना तसाच त्या रंगा । कोठें वेणी फणी न्हाणी धुणी नीत उठून हाच दंगा ।

तीचा योग जणुं भागिरथी गंगा । कोठें विलास अथवा कोणाघरीं मुनीं ब्रह्मचारी नंगा ।

एकांत लक्ष्मीकांत गेला झोपी । अष्‍टनायका सोळा सहास्त्र तितक्या आटोपी ॥१॥

करी थट्टा घटाला धक्का फोडी सुगडें । तरतरा पदर फरफरा फेडी लुगडें ।

गोपाळ मित्र नको मनांत लाजूं गडे । हें तुझेंच कवतुक वस्त्राआड उघडें ।

धर सुद दाट दहीं दूध लोणी ओपी । अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी ॥२॥

वनीं धेनु चारितां कामळ हातीं काठी । माधवा थवा भोताला पशुदाटी ।

न्याहारीच्या बाहारी मग दहीकाला वाटी । खर्कटी बोटें आवडीनें देव चाटी ।

फंदी मूल म्हणे तुझी कळा तुला सोपी । नसे अंत कृतांता क्षणामधें चोपी ।

अष्‍टनायका सोळा सहस्त्र तितक्या आटोपी । क्षीरसागरीचा हरी पाहूं आल्या गोपी ॥३॥


कवी- सवाईफंदी

अक्रुर

अक्रुरा गोपी आक्रंदती हरीप्रति ठेवा । मथुरेशीं नको नेऊं पहारे मथुरेशीं नको नेऊं आमचा प्राणविसांवा ॥ध्रृ०॥

येऊन गोकुळी अवतरला दीनबंधु । तेपासुनि अवघे आनंदले गोपबंधू त्रैलोक्यामाजी दुमदुमिला आनंदु ।

हें क्षीर सागरिचें निधान ब्रह्मानंदु । हा भक्तांना कनवाळू गोकुळाबाई । अक्रुरा याविना गोपी धृतराष्‍ट्र न दिसे कांहीं ।

मथुरेशीं कसा नेतां समुद्रजावाई । या हरिवांचुनि आम्ही मृत्यु पावलों लवलाही । हा पुतनारी घननीळ हत्तीचा छावा । आमचा प्राणविसांवा ॥१॥

मथुरेशीं कंस कसा रिपु निर्मिला हरिचे साठीं । धाडिलें तुम्हातें आणावया जगजेठी । अक्रूर पण तुम्ही क्रूर भासतां पोटीं ।

निष्‍ठुर हा तुमच्या ह्रदयीं विषाच्या गोटी । आधीं समस्त गोपींचें प्राण वधावे । मग स्वस्तिक्षेम मथुरेशीं हरीला न्यावें ।

हरि गेल्यावर राहुन आम्ही काय करावें । म्हणुनि स्वहस्तें आम्हाशीं मारुनि जावें । या मुरारीचा दचका प्राणाशीं नसावा । आमुचा प्राण० ॥२॥

अक्रूर म्हणे पुरुषोत्तम सर्वां ठायीं । भरुनि उरलासे तुम्हाशीं ठावा नाहीं । हा जळिं काष्‍ठीं पाषाणीं शेषशायी ।

कंसालागी हरी हा वधील एके धाई । ही तुम्हास भासती याची लहान पराई । परि हा प्रळयाग्नि कैक बांधिल पायीं ।

हा सर्वांचा देह असुनि विदेही । गोपीहो तुम्हाला भ्रांत पडली एव्हां । आमचा प्राण० ॥३॥

अक्रुरा तुम्हि इतुकें बोललां असत्य । कळलें ये समयीं तूं कंसाचा भृत्य । वचनें ऐकुनी गोपी चित्तीं वनवास जाला ।

अक्रुरा काननीं कसें मोकलिलें गोपिकांला । जननी मृत्तिका फाकिती प्रयळ झाला । मालणी कैक प्राशिती विषाचा प्याला ।

फंदि अनंत म्हणे ह्रदयीं हरि बसवा । आमचा प्राणविसांवा । मथुरेशी नको नेऊं अक्रुरा पहारे । मथुरेशीं नको नेऊं आमुचा प्राणविसावा ॥४॥


कवी - अनंत फंदी

पति तर केवळ शुद्ध दांडगे

पति तर केवळ शुद्ध दांडगे घागरगडचे हंस जसे । पाणी वाहतां खटी पडल्या खांदी कावड डुल्लतसे ॥ध्रु०॥

चवला पुरती करी मजूरी कंबर बांधुनि हजीर जसे । अक्षरशत्रू 'ओनामासी' हें तव ठाउक स्वप्निं नसे ।

तंबाखूचा मोठा चाळा नाहिं मुखावर तेजकळा । दोटक्यांनीं भले दांडगे पाझर येइना खडकाला ।

परि निवळ फतर । पति तर केवळ० ॥१॥

तूं तर केवळ देवाघरची मुखरणी मध्यें श्रेष्‍ठपणीं । नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी ।

राजस गोंडस स्वहस्तकमळीं गौरवर्ण तनु देखणी । विशाळ डोळे बुबुळ कुळकुळित नाहिं कुठे तिळतुल्य उणी ।

शांत प्रकृती हास्यमुखी सुंदराकृती हो सदा सुखी । रंभा पाहुनि लज्जित होउनि तव गुणश्रवणीं पडति गळां ।

पति तर केवळ ॥२॥


कवी - अनंत फंदी

पंडित शाहणा आला

पंडित शाहणा आला मनामधीं उलटा सुलटा आला जमाना । पाऊस म्हणतो कर्मेना । धरत्रीनें पीक टाकिलें अंतपारी दिसेना ॥ध्रु०॥

दुनयामधिं बंड मातलें जो बळी तो कानपिळी । सुलतानी अस्मानी राव ऐका एकच धुमाळी ।

मोमणानें माग टाकले शिपाई झाले साळी माळी । ज्या योनीला जन्म घेतला त्याची उद्धरली नाहीं कुळी ।

आपलें सांडी देवदंडी त्याला पुर्वेला येईना । आप आपल्यामधीं मर्जी ठेविती मोक्षपदाशीं मिळेना । पंडित० ॥१॥

कळावांतणीची झाली राळ बटकी झाल्या शिरोमणी । दे साळू वाण्याची घाण केली या मारवाडयांनीं ।

गुरुवांचें संधान बुडविलें महार या वाजंत्र्यांनीं । पाटीलपांडे घरीं राहिले पट्‍टी केली कुणब्यांनीं ।

पहा पासरी कितीक ध्यावी सवा हात खचली धरणी । पाऊस अंतरीं शाहाणा मग तो जाऊन बैसला कोकणीं ।

बाबन हकांचा महारधनी याला पुरविल्या येईना । भोपळ्यामधीं सत्व राहिलें तो पाण्यांमध्यें बुडेना । पंडित० ॥२॥

लेक म्हणे बापाला म्हातारा झाला याची शुद्ध गेली । सुन सासुची मर्जी ठेविना फिरुन बोलू ती लागली ।

शिष्य झाले मस्त गुरुची विद्या गुरुवर फिरली । गोरसाला कोणी पुसेना दारु महाग विकू लागली ।

पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली । चंचल नार बांधीत असे नवें घर एक दरसालीं ।

ब्राह्मण जोशी लटके यांचा ठोका येईना । अनंतफंदी म्हणे गडयांनों ऐकुनि घ्यावे सुज्ञाना ॥३॥


कवी - अनंत फंदी

घर नको मला मी फार त्रासलें

घर नको मला मी फार त्रासलें । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण शपत आण मनीं उदासलें ॥ध्रु०॥

कोण भेटली मोहून फासले । वर्ष चार चुकुर नार नसे थार लाऊनि तार पहातो मासले । संगतीमुळें बेताल नासले ।

समजतात जरी येतात प्यादेमात कुच उरांत रसालले । सुबक ठेंगणी मुसमुसासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥१॥

भुलनिशा करी जसें द्रव्य हरवतं । टाकितें उसास जातो भास खास नाहीं सुखास विषय करवत । रात्र वैरिणी दिवस पर्वत ।

ठेवितें शीर बंधु दीर व्हा वजीर पैलतीर न धीर धरवत । साक्षी देतील आसपासले । नवती जान पतीची वाण खरें प्रमाण० ॥२॥

अरुचि अन्न हें लागनें कडूं । हिंपुटींत जीब मुठींत हुटहुटीत कळवटींत पालथी पडूं । कधीं सखा सखी एकांतीं सांपडूं ।

सपन पडत उलट घडत कडकडत डाग पडत मळत का पडूं । गत कशी करुं मिळाले असले । नवती जान प० ॥३॥

निश्चय तिचा हिशोब गरतिचा । पावले दयाळ चंद्रमाळ रुंडमाळ व्याळ वेळ भरतीचा । मेघ वर्षतां उदय धरत्रीचा ।

धरुनि हात हांसत जात महालांत बेतबात पंचआरतीचा । चित्तवृत्तीनें सावकासलें ।

फंदी मूल करी कटाव नित घटाव सूर्यबिंब आज प्रकाशलें ।

नवती जान पतीची० ॥४॥


कवी - अनंत फंदी

हार तुरे तुला धीरा मी गुंफितें

हार तुरे तुला धीरा मी गुंफिते । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा धिरा धिरा तुझ्यावरी आधीं रंग शिंपितें ॥ध्रु०॥

होळिला तुम्ही घरीं असतां कधीं ? ॥ मी आपुल्या स्वहस्तें का निजमस्तकीं गुलाल फेकीन दयानिघी ।

रंग खेळणें होऊं द्या आधीं । मग हो सारे रात्र घेऊनि बसा मला तुम्ही रंगमहालामधीं ।

शरीर हें तुला आज वोपिंतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिल भरा धिरा० ॥१॥

दध्धराजभरा लई दिसा आला । होऊनि स्थीर धीर धरी, अधीर नका वस्त्र तरी नेसूं द्या मला ।

क्षणभरी उशीर लागला । ठीक ठाक चाकपाक झाक साबना उद्यां दिदार चांगला ।

वेणी मोकळी चापचोपिनें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥२॥

चाहते तुझ्यावर रंग टाकीन । त्या हातें फुलले तेल रेलचेल करुन आंग मर्दीन ।

भरभरु मुठी गुलाल फेंकीन । गोकुळीं जसा श्रीकृष्ण फाग खेळतो तसें तुम्हा मी लेखीन ।

तो हरी जसा त्या प्रीय गोपीतें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा०॥३॥

बनून फाकडी राहिली उभी । रंग राग पाग खेळूनि तुफंग मार करितसे खुबी । खुप देखणी लहानशी छबी ।

चोळी तंग घे पचंग आंग संग करीं निसंग मग कोणा न भी । तुज मी आपल्या ह्रदयीं स्थापितें ।

छंद फंदी आनंदाचे कटिबंध ते प्रबंध यामुखें अलाफितें । नकोरे होऊं घाबरा तूं दिलभरा० ॥४॥


कवी- अनंत फंदी

तुज नाहींरे माझी काळजी

तुज नाहींरे माझी काळजी ॥ध्रु०॥

आपण तरि जीव द्यावा । नाहिं तरि शुद्ध हातामधिं घ्यावा विणा टाळ जी । तुज नाहींरे० ॥१॥

कोण मिळाली ठकणी । माझा रांवा उडविला गगनीं ।
केली राळ जी । झाली राळ जी । तुज नाहींरे० ॥२॥

कोण मिळाली विवशी । कोणीकडे नेला राजबनसी ।
पिटी भाळ जी । आपटी भाळ जी । तुज । नाहींरे ॥३॥

घरास आले फंदी । तेव्हां सुंदर चरणा वंदी ।
घाली माळ जी । सख्याला माळ जी । तुज नाहींरे० ॥४॥


कवी - अनंत फंदी

एका राजाला कन्या झाली

एका राजाला कन्या झाली तिच्या उरावर तीन थान । जाईल आंधळ्याची तिथें लाग लाविला कुबडयानं ॥ध्रु०॥

तेथोनाची वाईट झाली कोणी करिना मग तिजला । तिला एका आंधळ्याला देऊन आपल्याच गांवामधिं ठिवला ।

तिला एका कुबडयानं फितवलं रोज घरामधिं आणि त्याला । कवाड वाजतां आंधळा म्हणे घरामधि कोण आला ।

ती म्हणे कुत्रें आले घरामधिं बाहेर घालितें पिटून । अशी कुबडयाला रोज आणिती पुढें ऐका त्याचें कथन । एका० ॥१॥

एके दिवशीं कुबडा बोले तिथानिशीं ऐकतां । कोण येतो म्हून उगाच आंधळा । सारा वेळ लावितो कथा ।

हा मरतां म्हणजे बरें गडे होत । तुझा आपला संग बरा होता । कुबडयानें एक सर्प मारुन बाहेरुन आणला ताथा ।

तिथानीचे केला हवाला घाल याला रांधुनशेन । दे आंधळ्याला खाया म्हणजे जवळ आल याचें मरण । एका० ॥२॥

तेव्हां तो सर्प चिरुनशेन तवली ठेविली चुलीवर । आंधळ्याला शिजवाया बसविले कुबडा होई तिजवर स्वार ।

गतका आला तवलिला तेव्हां तो पाहे कानाच्या सुमार । जहराचा कडका जो बसला आंधळ्याचा नेत्रावर ।

जहराच्या कडक्यान डोळ्यांच्या टिकाच गेल्या उडून । पहा उलटयाच सुलटें झालें त्याला रक्षिता भगवान । एका० ॥३॥

डोळे उघडून पाहे आंधळा कुबढा आणि तीनथानी । कुबडा वरती खालीं दोहींच्या आंगाचें पाणी पाणी ।

जळत लांकूड घेऊन झणी आंधळा उठला तत्क्षणीं । कुबडयाला माराया चालला आंधळा आहे त्याचे मनीं ।

जळत लांकूड उचलून झणी त्यान घातलं कुडवण ।


कवी - अनंत फंदी

तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली

पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा

याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचे सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
साऱ्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन्‌ गेला


गीतकार - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
गायिका - सुलोचना चव्हाण