श्रीधर फडके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रीधर फडके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी

मिळेल सांजा, साबूदाणा
खडिसाखर, मनुका, बेदाणा
संत्री, साखर, लींबू आणा
जा बाजारी, मौज हीच वाटे भारी

भवती भावंडांचा मेळा
दंगा थोडा जरि कुणि केला
मी कावुनि सांगेन तयाला
‘जा बाहेरी’, मौज हीच वाटे भारी

कामे करतिल सारे माझी
झटतिल ठेवाया मज राजी
बसेल गोष्टी सांगत आजी
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ ?
हे मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारी, मौज हीच वाटे भारी


गीत - भानुदास
संगीत - श्रीधर फडके

तुला पाहिले मी नदीच्या किनारी

तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठिवरी मोकळे
इथे दाट छायातुनी रंग गळतात
या वृक्ष-माळेतले सावळे

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मना वेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा


कवी/गीतकार- ग्रेस
गायक : सुरेश वाडकर
संगीतकार : श्रीधर फडके
गीतसंग्रह/नाटक : ऋतू हिरवा

काही बोलायाचे आहे, पण......



















काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्‍यात कधी तुला जाळणार नाही


गीतकार      - कुसुमाग्रज
गायक        - श्रीधर फडके
संगीतकार  - यशवंत देव