हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!
छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.
शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहीजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.
मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.
तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्शं कसं सारखं तिथेच घोटाळतंय…
अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमूक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.
पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!
एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!
कवि -
शंकर वैद्य
कवितासंग्रह -
दर्शन