अजीम नवाज राही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अजीम नवाज राही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ग्लोबल मेंदीची नक्षी


माणसे रोजगारासाठी बाहेर पडल्यावर
दिवस मोहल्ल्यातल्या बायाबापड्यांचा,
गुलगुले विकल्यानंतरच्या
जब्बारच्या टोपलीसारखा.
मन भकास: लोडशेडिंग वेळेतल्या पिठगिरणीसारखे.


गरजाच्या चाकांनी धावणारे आयुष्य;
वाटा आव्हानांच्या नागमोडी;
विसावत नाही पळभरासाठी
लाकूड अपेक्षांचे भेदणारी कर्वत.
उजाडताच डोक्यांवर प्रश्नांचा पर्वत:
आदळाताहेत कोणत्या प्रदेशात ग्लोबली लाटा?
गेल्या नाहीत मोहल्ल्याला खेटून
बिगबाजाराच्या चकाचौंद वाटा.


न्याहाळतात बाया नजरेने अचंबित
उंच इमारतीवरच्या लबालब टाक्या,
चघळतात कुतूहलाने शॉवरच्या
थंड-गरम पाण्याच्या नळ्यांचा विषय.
गातात रांजणे कोरडी वाळवंटी गाणी:
येते आठवडा उलटल्यावर नळाला पाणी.
पडझड वारसाहक्काने आलेली,
प्रवास माहेर ते सासरपर्यंतचा,
दैन्याचा दारिद्र्याकडे मुक्काम,
उपासमारीचा रमझान रोज्याला सलाम.
दळणकांडण, भांडीकुंडी, धुणीधाणी, बाळंतपण
होत नाहीत जगण्याची मुळे पक्की;
गिळते स्वप्नांच्या पोष्टरला
वास्तवाची जळजळीत चिक्की.


वेस परिसरात सकाळी
टमरेल घेऊन जाणार्‍या बाया
पाने झडलेल्या एरंडासारख्या,
सांगतात पदराने डोळे पुसत
मारझोड दारुड्या नवर्‍याची,
छळवणूक सासरची जीवघेणी;
दाखवतात पाठीवरचे वळ काठीचे.
करते एक भार दुसरीचा हलका
खर्चून शब्द ठेवणीतले मायाळू;
दाटतो सांत्वन करणारीच्या डोळ्यांसमोर
पडदा धुक्याचा ओलसर.


तारुण्य बहरताना कोळपून गेलेले
जगणे वशिलाहीन विधवांचे होरपळून गेलेले,
निराधारांच्या तुटपुंज्या अनुदानासाठी
येरझारा तहसिलच्या मारणार्‍या
म्हातार्‍या मरणाला टेकलेल्या.
बंदुका कठोर शक्यतांकडे रोखलेल्या.
वागतो फटकून चंद्र पौर्णिमेचा,
पंख अमावस्येचे मोहल्लाभर पसरलेले.


काळजी जमान्याला शेअरबाजाराची,
वाहिन्यांच्या टीआरपीची,
स्टार्सच्या मानधनाच्या चढ-उतारांची.
बोकांडी प्राथमिक गरजांच्या स्कोअर क्रिकेटचा.


मोसमात पानगळीच्या वसंताचे कागदी नकाशे,
येताहेत कोणत्या वरातीसाठी डिजीटल ढोल-ताशे.
घेणार भरारी कशी पंखतुटले पक्षी?
कोरणार कोणत्या हातांवर ग्लोबल मेंदीची नक्षी?



कवी - अजीम नवाज राही