वा.रा.कांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वा.रा.कांत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सखी शेजारिणी

सखी शेजारिणी, तू हसत रहा
हास्यात पळे गुंफीत रहा ॥ ध्रु ॥

दीर्घ बदामी श्यामल डोळे,
एक सांद्रघनस्वप्न पसरलॆ
धूपछांव मधि यौवन खेळे
तू जीवनस्वप्ने रचित रहा ॥ १ ॥

सहज मधुर तू, हसता वळुनी
स्मितकिरणी धरि क्षितिज तोलुनी
विषाद मनिचा जाय उजळुनी
तू वीज, खिन्न घनि लवत रहा ॥ २ ॥

मूक जिथे स्वरगीत होतसे
हास्य मधुर तव तिथे स्फुरतसे
जीवन नाचत गात येतसे
स्मित चाळ त्यास बांधून पहा ॥ ३ ॥


गीतकार - वा. रा. कांत
गायक - अरुण दाते
संगीतकार - वसंत प्रभु

बगळ्यांची माळ

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत
भेट आपुली स्मरशी काय तूं मनात ॥धृ.॥

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानांत खुले उन अभ्रकाचें,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥१॥

त्या गांठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनीं भर दिवसा झालीं,
रिमझिमतें अमृत ते कुठुनि अंतरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥२॥

हातांसह सोन्याची सांज गुंफतांना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजतांना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यांत,
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥३॥

तूं गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणें पंखांचें शुभ्र उरें मागें,
सलते ती तडफड का कधिं तुझ्या उरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥४॥


कवी - वा. रा. कांत

देणे

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हात
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे


कवी - वा.रा.कांत

तरुतळी

त्या तरुतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेऊन फिरतो
इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना
स्वरातूनी चमकते वेदना
तप्तरणे तुडिवत हिंडतो
ती छाया आठवीत

विशाल तरु तरी फांदी लवली
थंडगार घनगदर् सावली
मनीची अस्फुट स्मिते झळकती
तसे कवडसे तीत

मदालसा तरुवरी रेलूनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळी सळसळे, वळे ती
मथित हृदय कवळीत

पदर ढळे, कचपाश भुरभूरे
नव्या उभारीत उर थरथरे
अधरी अमृत ऊतू जाय
परी पदरी हृदय व्यथित

उभी उभी ती तरुतळी शिणली
भ्रमणी मम तनू थकली गळली
एक गीत, परी चरण विखुरले
व्दिधा हृदय संगीत


कवी - वा.रा.कांत
गायक - सुधीर फडके
संगीतकार - यशवंत देव

आज राणी पूर्विची ती

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन्‌ सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का ?
नीत्‌ नवी मरणे मराया जन्म तू मागू नको



गीतकार     -    वा. रा. कांत
संगीत        -    यशवंत देव
स्वर          -    सुधीर फडके