ज्ञानेश वाकुडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ज्ञानेश वाकुडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ती माणसेच होती..!

ती माणसेच होती..!
देहाविना जळाली..ती माणसेच होती..
पुन्हा फुलून आली..ती माणसेच होती..!!

गोळी समोर छाती देण्यात अर्थ नाही --'
...हे सांगुनी पळाली..ती माणसेच होती..!!

फासावरी खुन्यांना देवू नका परन्तू--
ज्यांची शिकार झाली..ती माणसेच होती..!!

माझा तुझ्या लढ्याशी संबंध काय येतो ?
...ऐसे मला म्हणाली..ती माणसेच होती..!!

चवचाल उंदरांना साऱ्या बिळात जागा..
जी पोरकी निघाली..ती माणसेच होती..!!

घनदाट पावसाचे केले तुफान वादे..
..अन कोरडी निघाली..ती माणसेच होती..!!

आता कुणाकुणाचे मांडू हिशेब बोला..?
जी आरशास भ्याली..ती माणसेच होती..!!
                                             

कवी - ज्ञानेश वाकुडकर

अजून झोपली सखी.. !

थांबल्या पहा कळ्या , उषाही थांबली
अजून झोपली सखी .. पहाट लांबली !

तिचीच वाट पाहते , गोठले धुके
रान रान , पान पान जाहले मुके
तिचे बघून हाय ! सुस्त जाहली घरे
थांबली उडायची अजून पाखरे ...
मनातली मिठी मीही मनात कोंबली !

अजूनही नभात थांबल्यात तारका
घुटमळे अजून चंद्र हाय ! सारखा
फुलात गंध थांबला, मनात प्रार्थना..
प्रभू तरी उठायचा कसा तिच्याविना ?
तिची भुते इथे तिथे अशीच झोंबली !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

पावसाळा जुना होत नाही..!

काय सांगु तुला सांग बाई..
पावसाळा जुना होत नाही !

रात आली उशिरा तरीही..
या पहाटेस नसणार घाई !

जीवनाला असे खोल खोदू ..
पूर यावा सदा बारमाही !

या विहिरी तशा ठीक..ओके..
बेडकांची किती सरबराई ?

भूतकाळा तुला माफ केले..
वर्तमानातला मी शिपाई !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

तिळ

तिथ गालाच्या बाजूला, नाकाच्या थोडं खाली..
ओठांच्या काठावर भेट 'तिळा'सवे झाली !

तिळ मनात भरला, तिळ डोळ्यात कोरला..
माझ्या ओठांनीही ध्यास सखे तिळाचा धरला !

भेट घेण्याला तिळाची जीव तिळ तिळ तुटे..
तिळ लपतो कुठेही त्याला शोधू कुठे कुठे ?

सांग शोधू कुठे कुठे आता तिळाला साजणी..
लपुनिया ओठामागे तिळ मिळाला साजणी !

नागिणीची धाव जशी तिच्या बिळावरी जाते..
माझी नजर साजणी तुझ्या तिळावरी जाते !

तिळ खुणावितो मला त्याच्या जवळ जावू दे..
माझ्या ओठांची साजणी भेट तिळाशी होवू दे !

माझ्यासाठी त्या तिळान असं कितीदा झुरावं ?
तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव !


गीत : ज्ञानेश वाकुडकर
गायक/संगीत : मिलिंद इंगळे
अल्बम : 'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव'
कविता संग्रह :  'सखे साजणी'

नको स्पर्श चोरू

नको स्पर्श चोरू..नको अंग चोरू..
सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू !

तुझ्या पैजणांचा असा नाद येतो..
प्रीतीचा ध्वनिलाही उन्माद येतो..
नको ताल चोरू, नको छंद चोरू..
नको पावलांची गती धुंद चोरू..!!

असा कैफ यावा, असा वेग यावा..
मिठीला नवा धुंद आवेग यावा..
नको प्रीत चोरू, नको राग चोरू..
गुलाबी गुलाबी नको अग चोरू..!!

खुलू दे, फुलू दे तुझी गौर काया..
पुरे दाह झाला..नको और व्हाया..
नको गाल चोरू, नको ओठ चोरू..
पिवू दे.. नशेचे नको घोट चोरू..!!


कवी - ज्ञानेश वाकुडकर

न्यायदेवता 'चोर' म्हणाली..!!

न्यायदेवता 'चोर' म्हणाली..
पब्लिक त्याला 'थोर' म्हणाली..!

धमाल 'बापू' तुझी गिधाडे..
संसद त्यांना 'मोर' म्हणाली..!

माणुसकीला बघून दुनिया..
'हे कोणाचे पोर'..म्हणाली..!

दार उघडले चोरासाठी..
अन आम्हाला 'घोर' म्हणाली..!

गझल ऐकुनी रडली दुनिया..
तीच गझल तू 'बोर' म्हणाली..!


कवी -  ज्ञानेश वाकुडकर

देवांनो..!

या इकडे अन माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो..
ही धर्माची लफडी सोडा..जरा हसा रे देवांनो !

मंदिर-मस्जिद करता करता माणूस पागल झाला..
हृदयी त्याच्या तुम्ही एकदा जरा धसा रे देवांनो !

कुणी ओढतो रेष मधे अन..देश वेगळा होतो..
त्या रेषेचे घाव मनातून जरा पुसा रे देवांनो !

इथला सैनिक, तिथला दुश्मन.. अर्थ बदलतो सारा..
रंगासोबत न्याय बदलतो.. असा कसा रे देवांनो ?

'तो' येण्याची पुन्हा नव्याने बोंब कशाला मारू ?
सांगून सांगून थकला माझा खुळा घसा रे देवांनो !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

रडू नका बापू..!

बकरी तुमची खतम केली..आम्ही कापू कापू
रडू नका बापू आता.. रडू नका बापू !

काळ आता बदलून गेला.. गणितं ही न्यारी
बापू तुम्ही समजून घ्याहो..खरी दुनियादारी !
माल दिसल्याशिवाय हल्ली..पिकत नाहीत शेते
कमिशनच्या विना बापू हसत नाहीत नेते !
गब्बर झालेत हपापाचा माल ढापू ढापू !
रडू नका बापू..आता रडू नका बापू !!

बघा बघा बापू कुठे निघाला जमाना
चरखा सोडा , पंचा सोडा..'हायटेक' व्हाना !
काहीतरी करू बापू..हुशारीने वागू
सरकारकडे तुमच्यासाठी कोळसा खदान मागू !
तुम्ही फक्त हो म्हणा..मिळून नोटा छापू..
रडू नका बापू असे..रडू नका बापू !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

'पाली','मुंग्या' आणि 'आपण'..!

मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा
हा पाऊस खोटा खोटा .. ह्या फसव्या फसव्या धारा
ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने
मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविन कुजले दाणे
सुकली धरणे, ठणठण विहिरी.. अजून फोडती टाहो
'पालींच्या' मुतण्याला मी..पाऊस म्हणावा काहो?

ही संदूक संदूक सत्ता..हे बंदूक बंदूक नेते
'द्यूत' नाही खेळलो तरीही.. 'शकुनी'च अजूनही जेते!
मग अवती भवती भिंती.. ह्या सवती सवती भिंती
एखादी तुटता तुटता .. डझनानी उगवती भिंती!
घरात भिंती, ऊरात भिंती..अंगण शाबूत राहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?

ह्या भजल्या भिजल्या 'मुंग्या'..ह्या विझल्या विझल्या 'मुंग्या'
प्रलयाच्या असल्या वेळी.. ह्या घोरत निजल्या 'मुंग्या'
ह्या टपल्या टपल्या 'पाली'..ह्या लपल्या लपल्या 'पाली'
भिंतीवर फोटो मधुनी.. ह्या आम्हीच जपल्या 'पाली'
'मुंगी' 'मुंगी' पुन्हा जागवू ..सोबत माझ्या याहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?




कवी - ज्ञानेश वाकुडकर

हे लाघवी खुलासे..

हे लाघवी खुलासे..आले तुझे थव्याने..
देतेस का कबुली..पुन्हा अशी नव्याने ?

घडले असेल काही..अंधार जाणतो ना..
दावू नये हुशारी..बेकार काजव्याने !

हंगाम पेरण्याचा होता कुठे परंतू..
आधीच चिंच खावी का गे तुझ्या मनाने ?

साधेच बोलतो मी..त्याचाच 'वेद' होतो..
समजेल ना तुलाही..सारे क्रमाक्रमाने !

आहे तसे असू दे..होते तसे घडू दे..
हा श्वास चालतो का..तुझिया मनाप्रमाणे ?
 
 
कवी - ज्ञानेश वाकुडकर

शेवटी...!

'हेच' चाले पहा शेवटी..
'तेच' झाले पहा शेवटी !

सभ्य मी, संत मी, चांगला..
लोक 'साले' पहा शेवटी !

शब्दकोशात नाही मजा..
हे कळाले पहा शेवटी !

ज्या घरासाठि भांडायचो..
ते जळाले पहा शेवटी !

शेवटी काय सारे 'झिरो'..
'ते' म्हणाले पहा शेवटी !

कैकदा मी मला पेरले..
पिक आले पहा शेवटी !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

अहवाल..!

हे हळूच किलकिलती ..झोपेचे दरवाजे..
हा श्वास म्हणावा की..आभास तुझे ताजे ?

उजवे, डावे, मागे..सारेच बुरुज गेले..
किल्ल्यात फितुरीचे हुंकार कसे वाजे ?

हे युद्ध कुणी जिंको..हे युद्ध कुणी हारो..
कानून तुझा चाले..आम्ही कसले राजे ?

सारेच तुझे आहे..अहवाल पहा ताजा..
जोडून तुझ्यापुढती..बघ नाव दिसे माझे !

आभाळ उडाले का ? वाराच तसा आला..
रेषेतून जगण्याचा..इतिहास कुठे गाजे ?

झाले ते झाले ना..तू लोड नको घेवू..
मुर्खाला सांग जरा..का गाल तुझा लाजे..?


कवी - ज्ञानेश वाकुडकर

डोळे

तिची सोनियाची काया..
तिचं लाजाळूच झाड..
याचे आतुरले डोळे..
तिची खुलेना कवाडं !

तिच्या देहाला कुंपण..
याचे देहभर डोळे..
तिच्या श्रावणाच्यासाठी..
याच्या देहाचे उन्हाळे..!

जीव नदीकाठी त्याचा..
तहानला सोडू नये..
तिच्या धारेला जगाने..
उगा फाटे फोडू नये !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

चांदणे अंथरू..

चांदणे अंथरू..चांदणे पांघरू..
देह माझा तुझा..चांदण्याने भरू !

आज दोघामधे ही हवाही नको..
बांध दोघातले दूर सारे करू !

पाहू दे, वेचू दे हा अजिंठा तुझा..
शोधता शोधता..तू नको थरथरू !

धबधब्याला कशी झेलते ही दरी..
कोसळू कोसळू अन पुन्हा सावरू !

दूर फेकून दे सर्व पाने फुले..
श्वास आता जरा रोखुनीया धरू !

ठेव राखुनिया सर्व खाणाखुणा..
निर्मितीचे उद्याच्या पुरावे ठरू !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

शाब्बास रावणानो !

तुमचाच काळ आहे हा खास रावणानो..
शाब्बास रावणानो..शाब्बास रावणानो !

खाऊन देश झाला.. खाणार काय आता..
सोसेल काय तुम्हा..उपवास रावणानो



कवी :- ज्ञानेश वाकुडकर