संध्याकाळच्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संध्याकाळच्या कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रंग

 थेंबउणें ऊन 

माळावर जळे, 

कांचेवर तडे 

श्रावणाच्या. 


स्तनांवर माझ्या 

जांभळाची झाक;

ओली आणभाक 

आठवते.


दि - 18/01/1958 

नागपुर

आषाढबन

इथलेच पाणी,
इथलाच घडा,
मातीमध्ये -
तुट्ला चुडा.

इथलीच कमळण,
इथलीच  टिंबे
पाण्यामध्ये -
फुटली बिंबे.

इथलेच उ:शाप,
इथलेच शाप,
माझ्यापशी -
वितळे पाप.

इथलीच उल्का,
आषाढ-बनात,
मावलतीची -
राधा उन्हांत.

दि. २३.१.५८, 

हिमगंध

नको मोजू माझ्या
मुक्तीची अंतरे ;
ब्रह्मांडांची दारे
               बंद झाली.
माझ्या आसवांना
फुटे हिमगंध,
मागे-पुढे बंध
              पापण्यांचे.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

बहार

पान पान सोडती सहिष्णु वृक्ष येथले
चक्र ओंजळीतले वर्तुळांत नादलें
ऐकतो कुठेतरी तमांत झांकली घरें
दिशादिशांत गात हा फकीर एकटा फिरे !
पहाड शब्द वेढती तसा सतंद्र गारवा
नि रक्तवाहिन्यांतुनी उडे सुसाट पारवा …

तुझी बहार मंदशी तृषार्त जाग ये जरी...
वेदनेतली फुले नि चांदण्यातल्या सरी…
तुझेच अंग चंदनात अंतराळ ओढते
पुरात आणखी असे सजून ओल मागते…
दुक्ख लागता मला सभोवती जसेंजसें
दयार्द्र होउनी तसें क्षितीज दृष्टिला दिसे …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

लाटांचे देऊळ

लाटांचे देऊळ असावे
जिथे नसाव्या लाटा
समुद्र सोडुन दूर निघाल्या
जळवंतीच्या वाटा

माडांनाही वाट नसावी
फक्त असावे डोळे
या देहाच्या दिप्तीमधला
चंद्र जिथे मावळे …

सागरतंद्रीतून नसावे
कुठे चुळाभर पाणी
तुझ्या कृपेच्या दुक्खामागे
येइन मी अनवाणी …


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

हळवी

जळात भिजले
वळण उन्हाचे ,
मावळतीच्या सरणावरती
निजून आले
उरलेसुरले दुक्ख मनाचे.

धुक्यात गढल्या
भित्र्या अगतिक कौलारांच्या तांबूस ओळी ,
मी फिरले
दारावर झोकून शिणली मोळी

झाले हलके
तमांत पैंजण.
तंग जरासा उसवून वारा ,
भावूक हळवी
धावत सुटले मृदबंधातून.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

प्रारंभ

इंद्रियांच्या प्रारंभात क्षितिज,
संवादीपणाने.
नाद माझे हळुवार, पैंजणी रात्रींना
दुःख अभिजात, स्पर्शमय वर्तुळांत
क्षणाक्षणानें.
अवकाश- रेषा निसरड्या, सप्तरंगी
आकाशगामी डोळियांच्या गुंफात .......
जाऊ नकोस, हांकेवर थांब, ते अमृताचे
भयाण डोह आहेत
अमर होशील......


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

उखाणा

शुभ्र अस्थींच्या धुक्यात
खोल दिठीतली वेणा
निळ्या आकाशरेषेत
जळे भगवी वासना.

पुढे मिटला काळोख
झाली देऊळ पापणी;
आता हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

निर्मळा

प्रतिबिंब गळे कीं पाणी
अपुल्याच दिठीशी हंसले
ओसाड प्राण देवांचे
सनईत धुक्याच्या भिजले .

स्वररेघ निर्मळा पसरे
रडतात तमाशी झाडे
की श्रावण घेउनी हृदयी
ओवीत उतरले खेडे …

हिमभारी अपुले डोळे
पृथ्वीच्या थोर मुळाशी
पायांवर येउन पडती
मरणाच्या हिरव्या राशी ….

वासांत विराणी कसली ?
पाण्याचे तंतू तुटती
लोचने जशी स्पर्शाने
खाचेतुन गळुनी पडती ….

ही अशी निर्मळे रात
अज्ञात आठवे चेहरा …
अन हात तुझा क्षितिजाशी
ती वाट उभी धरणारा ….


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

पहांट

आज केशरी थेंबांनी
जाग आणिली कोवळी.
हांका - हांकांच्या लेण्यांत
सूर घुमले पोवळी .

निळया ओलाव्याच्या कांठी
आज नारिंगाचे बन,
झाली तरंग … तरंग
स्निग्ध मेघांची पोकळी .

रित्या मुठीत झांकला
शुक्र प्रभेचा अनंत ,
स्पर्शास्पर्शांत गोंदले
स्वप्न राधेचे हिवाळी


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

देखणा कबीर

दिशावेगळ्या नभांची
गेली तुटून कमान ;
तुझ्या व्रतस्थ दुखाचे
तरी सरे ना ईमान !

जन्म संपले तळाशी
आणि पुसल्या मी खुणा ;
तरी वाटांच्या नशीबी
तुझ्या पायांच्या यातना

भोळ्या प्रतिज्ञा शब्दांच्या
गेली अर्थालाही चीर ;
कांचा वेगळ्या पार्‍यात
तरी देखणा कबीर !!


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

संध्याकाळच्या कविता

 संध्याकाळच्या कविता हा सुप्रसिद्ध मराठी कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांचा १९६७ मध्ये प्रथम प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आहे.

एकूण सहा काव्यगुच्छांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे. आषाढबन, चंद्रधून, मरणगंध, स्मरणशिल्प, ऊर्मिलेच्या कविता आणि बर्फाच्या कविता हे संग्रहातील काव्यगुच्छ आहेत. संध्याकाळी, सूर्य अस्ताला जात असताना निसर्गात उठणाऱ्या रंगतरंगांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कविता मानवी दुःखाचे अपूर्व चित्रण करतात आणि जड व चैतन्याच्या संगमावर तरळणाऱ्या संधिप्रकाशात इंद्रियगोचर सृष्टीपलीकडील अज्ञात प्रदेशाच्या लोभस खुणाही दाखवितात. या संग्रहात स्वतः कवीने पुस्तकाच्या अखेरीस दिलेल्या कालक्रमानुसार 'रंग' (जानेवारी १९५८) ते 'रंगास्त' (नोव्हेंबर १९६५) अशा सुमारे ८० कविता समाविष्ट आहेत.

१. आषाढबन
२. रंग
३. उखाना
४. ओळख
५. हळवी
६. पहांट
७. आकाश
८. हिमगंध
९. निर्मिती
१०. पाउले
११. पार्श्वभूमी


पांढर्‍या शुभ्र हत्तींचा
वाट

निर्मिती

कधी पांघरावे मीही
माझा रक्ताचे प्रपात,
गूढ़ घावांचे किनारे
मीच तोडावे वेगात..

असा आंधळा आवेग
मीच टाळावी बंधने ,
विश्वनिर्मितीचा रात्री
मला छेदावे श्रद्धेने .

अशा लाघवी क्षणांना
माझा अहंतेचे टोक.
शब्द फुटण्याचा आधी
ऊर दुभंगते हाक.........


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

वाट

तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे,
ती ही अशा कातर वेळी,

उदाच्या नादलहरी सारख्या
संधी प्रकाशात…

माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत
जमा होतात….

अशा वेळी वाटेकडे पाहाणे ,
सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म
लकेरीत तरंगत जाणे;
जसे काळोखातही ऎकू यावे दूरच्या
झऱ्याचे वहाणे….

मी पहतो झाडांकडे , पहाडांकडे,
तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो…..

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या

पांढर्‍या शुभ्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले

पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता