शृंगारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शृंगारिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नको स्पर्श चोरू

नको स्पर्श चोरू..नको अंग चोरू..
सखे पाकळ्यांचे नको रंग चोरू !

तुझ्या पैजणांचा असा नाद येतो..
प्रीतीचा ध्वनिलाही उन्माद येतो..
नको ताल चोरू, नको छंद चोरू..
नको पावलांची गती धुंद चोरू..!!

असा कैफ यावा, असा वेग यावा..
मिठीला नवा धुंद आवेग यावा..
नको प्रीत चोरू, नको राग चोरू..
गुलाबी गुलाबी नको अग चोरू..!!

खुलू दे, फुलू दे तुझी गौर काया..
पुरे दाह झाला..नको और व्हाया..
नको गाल चोरू, नको ओठ चोरू..
पिवू दे.. नशेचे नको घोट चोरू..!!


कवी - ज्ञानेश वाकुडकर

चांदणे अंथरू..

चांदणे अंथरू..चांदणे पांघरू..
देह माझा तुझा..चांदण्याने भरू !

आज दोघामधे ही हवाही नको..
बांध दोघातले दूर सारे करू !

पाहू दे, वेचू दे हा अजिंठा तुझा..
शोधता शोधता..तू नको थरथरू !

धबधब्याला कशी झेलते ही दरी..
कोसळू कोसळू अन पुन्हा सावरू !

दूर फेकून दे सर्व पाने फुले..
श्वास आता जरा रोखुनीया धरू !

ठेव राखुनिया सर्व खाणाखुणा..
निर्मितीचे उद्याच्या पुरावे ठरू !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

सत्य

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी
वाकलीस खणानारळांनी .

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .

'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..


कवी -  नारायण सुर्वे

चिंब मिठी

सर्सर सर्सर वळवाची सर
आली अचानक धावत धावत
थेंब टपोरे माथी झेलत
झाडे वेली अवघी नाचत

अवेळीस हा पाऊस चावट
तुझ्या बटांवर होता अलगद
झाडाचा आधार चिमुकला
तिथेच तू ही होती निथळत

थरथरणारा देह तुझा तो
भिजून सारी वसने ओली
भिरभिरलेल्या त्या नजरेतच
भिती अनामिक तरळून गेली

कडाड् लखकन वीज चमकता
नकळत सारे अवचित घडले
मिठीत केव्हा अलगद दोघे
तुला- मला ना काही कळले

चिंब चिंब हा पाऊस अजूनी
तनामनाला हुरहुर लावी
पाऊस येता वळवाचा तो
चिंब मिठी ती स्मरते सारी

पहिल्या मिलनाचि रात्र

पूनवेची रात्र
त्याला चांदण्याची झालर
बहरलेला प्राजक्त
त्याला सुगंधाचा पाझर

जवळच कुठे तरी…
सजलेली एक परी
वाट बघते तिच्या रायाची
आज आहे रात्र पहिली
तिच्या अन् त्याच्या मिलनाचि

नजर खीळलेली पाऊलावर
चले कांकणाशि खेळ
क्षण किती सरले
भान नाही तिला
वाट पाहता रायाची
जाता जात नाही वेळ

मनी भावनांचा कल्लोळ
मुखी लाजेचा रक्तिमा
अर्धोन्मिलित डोळ्यात तरळे
मिळनाची आर्तता

राया, राया….. आता नको पाहूस
तू असा अंत
डोळे शिणले माझे
पाहुनिया वाट
तहानलेले मन माझे
आसुसलेला देह
ये, मिठीत घे मला
कर माझ्याशी संग

रायाने तिच्या जणू तिची साद ऐकलि
तो खोलीत आला आणि तिच्या बाजूला जाऊन बसला

अन्…. शहारले शरीर
चेतले तिचे अंग
उष्ण झाले श्वास
धडधडले उरोज
घायाळ झाले दोघे
लागला मदन बाण
एक झाले दोन देह
पुनवेच्या रात्रीला चढला प्रणयाला बहर ...

सोपेच असतात तुझे केस

सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची
सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची
सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यामध्ये
दहा हत्तींचे असते बळ...

कवी-विंदा करंदीकर

ती मधुरात्र

आजही आहे माझ्या मधुरात्र ती लक्षात ग,
चांदणे अवघ्या तनुवर चंद्र अन् वक्षात ग।

उत्तररात्रीतही उतरेना उन्मत्त ते आवेग ग,
उत्तर ना यास उतारा लगाम ना वेग ग।

स्मित ते विसरु कसे स्मरतो हरेक नखरा ग,
लज्जा खोटी रागही लटका, हां भाव तुझा न खरा ग।

करू नकोस उगाच सये रुसण्याचे रूक्ष बहाणे,
मार्दवाची आर्जवे करून वेडावती शहाणे।

खेळ केला तारकांनी चंद्र वेडावला बिचारा,
पूर ओसरून गेला कोरडा वेडा किनारा।

घे मला जवळि आता दूर लोटू नको गडे,
कोसळावे काय आता संयमाचे उंच कड़े।

रातराणीच्या फुलांचा गंध हां विरेल ग,
निशेस्तव रातकिडा रातदिन झुरेल ग.

आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया