aai-kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
aai-kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आई कामाहून येता

आई कामाहून येता
पोरं बिलगली तिला
फुलं शोभतात चार
जशी हिरव्या वेलीला

कुणी गळा कुणी मांडी
जागा पोरांनी घेतली
लळा पाहताना असा
पृथ्वी सारी सुखावली

नाही वाडग्यात आज
शिळ्या भाताचाही दाणा
तिला भुकेल्या बाळांचा
प्रश्न पडलेला पुन्हा

उगीउगी पेटवली
चूल तिने भकभक
पाणी भांड्यात ठेवून
केला खोटाच सैपाक

पाणी उकळे नुस्तेच
नाही अंशही भाजीचा
आई म्हणते पोरांना,
"वास येतो ना सोजीचा?"

गाढ झोपली पाखरे
सैपाकाच्या नादामंदी
बांध मोडून वाहते
तिच्या डोळ्यांमधली नदी


- अंजूम मोमीन

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंडय़ा जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.

दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मज्जा म्हणून सांगू
शब्दसाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.

एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.

त्याच रात्री आम्ही पाचांनी
एकमेकांस बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आईदेखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.


कवी - नारायण सुर्वे 

माय

मायसंगं मीबी तवा,
काडक्या येचाया जायचो.....
माय लाकडांकडं आन,
मी धसपाटं घ्यायचो......

माय माझी हुती गोरी,
उन्हात त्वांड जळालेली....
गरीबीच्या लांड्ग्यामागं,
दमस्तवर पळालेली.....

फ़ाट्क्या तिच्या पदराशी,
लेमण गोळीचा तुकडा....
भुक तिची जाळायसाठी,
संगं र्‍हायचा मिश्रीचा पुडा....

माजी साळा बुडाया नगं,
म्हणून रोज लई राबायची......
कंधी दमलो शाळंत जर,
पोट्र्‍या माह्या दाबायची.....

म्या मेट्रिक केली तवा,
मायचं कातडं लोंबलं...
पण तिचं गोधडी घेणं,
माया काळजाला झोंबलं....

शर्ट-चड्डी घालेल पोर्‍या,
तिनं नीट पाह्यला न्हाई......
पण शिकवुन माला लय,
जायाची व्हती तिला घाई....

दाराम्होरं आजबी ढीग,
वाळेल काडक्यांचा हाय.....
पण चुलीजवळ शेकणारी,
गेली सोडुन लाडकी माय....


कवी - संतोष वाटपाडे(नाशिक)

आई...

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

तोच आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे

लहानपणी धाकटयावर दाद्गिरी करायचो
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो

आई

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.



कवियत्री -  इंदिरा संत

माझी मायं

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्‍यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय




कवी - स. द. पाचपोळ, हिंगोली

झूलाघर

सायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी
गाय वासरे हंबरती
सांगती झाली वेळ आईची
आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती
मी पण पाहते वाट आईची
लागली ओढ तिच्या भेटीची

इतुक्यात एक चिमणी छोटीशी
येऊनी बसली माझ्या पाशी
होती ओठात एक काडी चार्‍याची
आपल्या चिमुकल्यां साठी
सांगत होती जणु घालीन
घास माझ्या पोरांच्या ओठी
ही मिलनाची आस बघुनी
मी व्याकुळ झाले मनी
केव्हा येईल आई माझी

नको वाटते तिची नौकरी
दिवस भराची दुसर्‍याची चाकरी
नको राहणे झूलाघरात
वाटते राहावे आई पाशी
डब्यातले थंड अन्न न मला रूचते
शेव, मिक्चर न मला आवडे
एकटेपणात न दिवस सरे
सारखी आईची आठवण येते
कसे हे जीवन आमचे
न आईची कुशी मिळते
न प्रेमानी अन्न भरवते
बालपण आमचे हे असेच संपते
एकटेपणाची आठवण मनात सलते

कसे हे जीवन चक्र बदलले
आई-वडिल दोघेही घरा बाहेर पडले
वाट पाहता-पाह ता थकले डोळे
सारखी आईची आठवण येते
कधी येईल सांगा माझी आई

पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का?
निरोप माझ्या आईला
वाट पाहते लेक आईची
सायंकाळ ही आता सरू लागली
सायंकाळ ही आता सरू लागली.


कवियत्री - सौ. स्वाती दांडेकर

आई

सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे प्रेमाने सुखाचे घास दे खाऊ

उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राजा

कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते

अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार.