elahi jamadar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
elahi jamadar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दिशाहीन एकटे भटकणे प्राक्तन बनले
एकांताशी बोलत बसने प्राक्तन बनले 

कॅमेऱ्यातील रोल संपला, हौस संपली
जुन्या स्मृतींचा अल्बम बघणे प्राक्तन बनले  

वाळूवरती तीच अक्षरे गिरवत बसतो
लिहिणे-पुसणे....पुसणे-लिहिणे प्राक्तन बनले
                  
श्वासांइतकी कठोर शिक्षा दुसरी नाही
पाषाणासम निर्जीव जगणे प्राक्तन बनले


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - मोगरा
हे असे बागेवरी उपकार केले.
कत्तली करुनी फुलांचे हार केले

ठेवुनी शाबूत काया वार केले
फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले

ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा
पाडुनी भिंती घराच्या दार केले

पाहुनी तुजला चितेवरती   'इलाही'
तारकांनी अंबरी जोहार केले


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - जखमा अशा सुगंधी
प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण
निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण   

पानगळीच्या मोसमापरी गळू लागले तारे आता
कसे थोपवू उल्केसम हे कोसळणारे एकाकीपण       
          
कधीतरी तू पुन्हा भेटशील अनोळखी माणसाप्रमाणे
दिसेन  मी पण दिसेल का तुज गोठविणारे एकाकीपण           

हलाहलाचे कितीक प्याले एकदाच तू रिचाविलेस पण
सांग शंकरा पचवशील  का गोठविणारे एकाकीपण 


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - अर्घ्य

इलाही जमादार

इलाही जमादार (१ मार्च १९४६) हे मराठीतील गझलकार आहेत.


इलाही जमादार यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

१. जखमा अशा सुगंधी (गझलसंग्रह)
२. भावनांची वादळे
३. दोहे इलाहीचे
४. मला उमगलेली मीरा (विराण्यांचे विश्लेषणात्मक काव्यरूप)
५. वाटसरू (मुक्तछंद आणि ग्येय कविता)
६. अर्घ्य (गझलसंग्रह)
७. सखये (गझलसंग्रह)
८. गुफ्तगू (उर्दू गजल संग्रह देवनागरी)
९. मोगरा (गझलसंग्रह)
१०. चांदणचुरा (मुक्तके, रुबाई)
११. तुझे मौन (५६९ शेरांची गजल)
१२. गजल शलाका (गजल तंत्र)
१३. रंगपंचमी (भावगीते ग्येय कविता)
१४. ओअ‍ॅसिस (गझलसंग्रह)
१५. निरागस (गझलसंग्रह)
१६. आभास (गझलसंग्रह)



पुरस्कार :-

१) गुणवंत कामगार पुरस्कार
२) सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वेलफेअर को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने १९९४-९५ चा ‘आर्टिस्ट ऑफ दि ईयर’चा बहुमान
३) कविता, गजल, लावणी लेखन स्पर्धेत पारितोषिके
४) ‘जखमा अशा सुगंधी’ या गजलसंग्रहास ‘गंगा लॉज मित्र व यशवंतराव चव्हाण साहित्य व संस्कृती प्रतिष्ठान च्या वतीने कै.गंगाधर पंत ओगले पुरस्कार
५) राष्ट्रगौरव पुरस्कार
६) स्वामी विवेकानंद पुरस्कार
७) प्रबोधनयात्री पुरस्कार
८) अ.भा.त्रैभाषिक गजल परिषदेचा २००५ चा ‘शान-ए-गजल’ पुरस्कार
९) दुधगांव भूषण पुरस्कार
१०) सांगली भूषण पुरस्कार

घर वाळूचे बांधायाचे

घर वाळूचे बांधायाचे
स्वप्न नसे हे दिवाण्याचे...

सहज बोलली,निघून गेली
झाले, गेले ,विसरायाचे......

आरशात मी, आरशा-पुढे
कोण तोतया,समजायाचे....

ठरविल्याविना ,ठरले आहे
स्वप्नामध्ये भेटायाचे....

- इलाही जमादार

अंदाज आरशाचा

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्याचार होतो आरशावरती आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे 

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा


कवी- इलाही जमादार

सांजवेळी सोबतीला

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा...
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा...

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा...

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा...

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा...

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा...

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा...

- इलाही जमादार

साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले " इलाही" ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

- इलाही जमादार