kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो "

चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो  ।।१।।

कोरडा डोळा , कोरडी विहीर
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।२।।

वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।३।।

या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।४।।

बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।५।।

असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।६।।

योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।७।।
माय ले माय म्हणता ओठले ओठ भिडे ,
चुलातीले काकी म्हणता अंतर किती पडे,
जीजीले जीजी म्हणता मिळे जीभाले निवारा,
सासुले सासू म्हणता गेला तोंडातुनी वारा,

- बहिणाबाई चौधरी

कशाला काय म्हणूं नही ?

बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही,
हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही

नही वाऱ्याने हालल त्याले पान म्हनू नही,
नही ऐके हरीनाम त्याले कान म्हनू नही

पाट येहरीवाचून त्याले मया म्हनू नही,
नही देवाच दर्सन त्याले डोया म्हनू नही

निजवते भुक्या पोटी तिले रात म्हनू नही,
आखडला दानासाठी त्याले हात म्हनू नही

ज्याच्यामाधी नही पानी त्याले हाय म्हनू नही,
धावा ऐकून आडला त्याले पाय म्हनू नही

नही वळखळा कान्हा तिले गाय म्हनू नही,
जिले नही फुटे पान्हा तिले माय म्हनू नही

अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हनू नही,
एके पोटच्या पोरीले त्याले बाप म्हनू नही

दुधावर आली बुरी तिले साय म्हनू नही,
जिची माया गेली सरी तिले माय म्हनू नही

इमानाले इसरला त्याले नेक म्हनू नही,
जलमदात्याले भोवला त्याले लेक म्हनू नही

ज्याच्यामधी नही भाव त्याले भक्ती म्हनू नही,
ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हनू नही


 - बहिणाबाई चौधरी

🔶 दगड 🔶

शब्द एक तो 'दगड' रांगडा
परंतू त्याची रूपे पहा
वृत्ती, दृष्टी जैसी असते
अर्थ लाभतो त्यास महा

अ, आ, इ, ई लिहीण्यासाठी
'दगडा'ची ती पाटी असते
सरस्वती नाखूष ज्यावरी
त्याला जग हे 'दगड'च म्हणते

बालपणी जी केली चोरी
कैर्‍या पाडून दगडांनी
संसाराचा आरंभ होतो
तीन 'दगडां'च्या चुलीतूनी

ऐतिहासिक शिल्पे म्हणजे
दगडावरती कोरीव काम
सेतू बांधिला वानरांनी त्या
'दगड' घेऊनी मुखात राम

'दगडा'ची ती शिला होते
वास्तू बांधण्या आरंभ होतो
अशुभ वार्ता ऐकण्याआधी
हृदयावरती 'दगड ठेवतो

मैलाचा तो 'दगड'च असतो
आयुष्याचे वळण सांगण्या
'दगडा'ची ती भिंत बांधती
नात्यामधले वैर दावण्या

'दगड' घालूनी डोक्यामध्ये
कुणी कुणाचा जीवच घेतो
या 'दगडा'तूनी शिल्पकार तो
सुंदर, मोहक मूर्ती घडवतो

निर्धाराचा शब्द म्हणजे
काळ्या 'दगडा'वरची रेघ
संप, बंद आंदोलन म्हणजे
क्रूर, अमानुष 'दगड'फेक

'दगडा'तूनच जन्मां आले
पाटा-वरवंटा अन् जाते
पाथरवट निर्माते  परंतू
आज त्यांस ना कुणी पुसे

मूर्ख माणसां अर्थ सांगणे
'दगडा'वरती डोके फुटणे
विनाश घेता  ओढवून कधी
पायावरती 'दगड' पाडणे

ज्याचा त्याने विचार करणे
'दगड'घ्यावा हाती कशास
नावच अपुले राहील मागे
'दगडा'वरती कोरून खास.


- सौ.शुभांगी श्री. नाखे (अलिबाग)

गांव

खरं खरं सांगतो राव् ,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाईलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललय?कस चाललय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झाेके हाेते,
आेढ्याच्या डाेहात पाेहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसुन,
कच्चे-पीकलेले आंबे खायची मजा हाेती...

विटी-दांडु,खेळाच मैदान होतं,
इतर अनेक मैंदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे हाेते,ऊस हाेता...

गोठाभर ढोरं होती...
ढाेरां बराेबर पाेर हाेती....

जिवाला जीव देनारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गानं होतं.…

शाळेतल्या कवितेले,
आनंदाचं उधान होतं...

पण..............

जसं गावात हा काेठुन,
मोबाईल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेटआलं...

गजबजलेलं गाव माझ,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणस,
टीव्हीलाच चिटकुन राहीली..

रस्तावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैंदानावरील मुल सारी,
देवळामागच्या अंधारात...

माेबाईल मध्येच,गुंतली सारी......

सुनेसुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खर-खर सांगताे राव.....
या माेबईलनच बीघडवल माझ सार गाव !


कवी - सतिश आहेर

** आम्ही असे शिकलो **

"आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ..
             त्यावर करतो
             तांब्यानी प्रेस,
             तयार आमचा
             शाळेचा ड्रेस..
       
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग..
       
            धोतराचं फडकं
            आमचं टिफीन,
            खिशात ठेवुन 
            करतो इन..
करगोटा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल ?
            मिरचीचा ठेचा
            लोणच्याचा खार,
            हाच आमचा
            पोषण आहार..
            
रानातला रानमेवा
भारी मौज,
अनवाणी पाय
आमचे शुज..
             काट्यांच रूतणं
             दगडांची ठेच,
             कसा सोडवायचा
             हा सारा पेच..
मुसळधार पाऊस
पाण्याचा कडेलोट,
पोत्याचा घोंगटा
आमचा रेनकोट..
             जुन्या पुस्तकांची
             अर्धी किंमत,
             शिवलेल्या वह्यांची
             वेगळीच गंमत..
पेन मागता
कांडी मिळायची,
गाईड मागण्याची
भिती वाटायची..
             केस कापण्याची
             एकच शक्कल,
             गप्प बसायचे
             होईपर्यंत टक्कल..
गेले ते दिवस,राहिल्या त्या फक्त आठवणी....

आलों, थांबव शिंग !

आलों, थांबव शिंग दूता, आलों ! थांबव शिंग !

किति निकडीनें फुंकिशि वरिवरि ! कळला मला प्रसंग ध्रु०

जरि सखे जन हाटा निघती,

आर्जवुनी मजला बोलविती,

परोपरी येती काकुळती,

पहा सोडिला संग. दूता० १

जरि नाटकगृह हें गजबजलें,

जरि नानाविध जन हे सजले,

मजविण त्यांचें कितीहि अडलें,

पहा सोडिला रंग. दूता० २

जरी खवळलें तुफान सागरिं,

मार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,

पहा टाकिली होडी मीं तरि

नमुनि तिला साष्टांग. दूता० ३

अतां पुकारो फेरीवाला,

गवळी नेवो गाइ वनाला,

कारकून जावो हपिसाला,

झालों मी निस्संग. दूता० ४

विसर्जिली मीं स्वप्नें सारीं,

आशा लावियल्या माघारी,

दुनियेच्या आतां बाजारीं

माझा न घडे संग दूता० ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - अंजनी
राग - हिंदोल
ठिकाण - अजमेर
दिनांक - १४ ऑगस्ट १९२१

तृणाचें पातें

तृणांचे पातें हालतें डोलतें वातें. ध्रु०

झगा मख्मली हिरवा गार,

मुकुटहि रत्‍नजडित छान्दार,

तुरा तयावर झुपकेदार,

हलवि ह्रदयातें १

यावरि तेज कसें रसरसतें;

जीवन नसांतुनी थबथबतें,

चिमणें इंद्रचाप थयथयतें.

दंवीं जइं न्हातें. २

तुम्हापरि सूर्य किरणिं या न्हाणि !

तुम्हापरि वरुण पाजि या पाणि,

तुम्हापरि पवन गाइ या गाणिं,

बघा हें नातें. ३

मग या पायिं कसें तुडवीतां ?

खड्‌ग यांतलें उद्यत बघतां

भरे कांपरें स्मरतां सत्ता

झुलवि जा यातें. ४

यांतुनि कृष्ण मुरलि वाजवितो,

वामन बलीस यांत दडवितो,

यांतुनि नारसिंह गुरगुरतो,

भ्या रे यातें. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२७

कोण रोधील ?

या भविष्याचिया दिव्य कारागिरा
कोण रोधील ? दे कोण कर सागरा ? ध्रु०

शूल राजा, तुझा रक्त त्यांचे पिओ,
गृध्रगण भक्षण्या पुण्य गात्रां शिवो,
दुर्गिं त्यांचिं शिरें अधम कुणि लोंबवो,
अंत त्याचा नको समजुं हा नृपवरा ! १

ज्योति मृत्युंजय प्रबळ पिंडाहुनी
समज दावाग्निशा चहुंकडे पेटुनी
देशकालांसि रे टाकितिल व्यापुनी,
अंतिं फडकेल रे ध्वज तयांचा खरा. २

ज्यावरी भार तव, ज्यावरी गर्व तव,
विफल तोफा तुझ्या, पलटणी सर्व तव,
विफल बलदर्प तव, यांत का शर्व तव ?
उघड लोचन, पहा दूर राजा, जरा. ३

भव्य ते स्तंभ बघ तुंग अट्टालिका,
त्या कमानी पहा, त्या गवाक्षादिकां,
सौध ते, कळस तो सोनियाचा निका,
ध्वज तरी प्रीतिचा मोहवी भास्करा. ४

तेथ त्या रत्‍नमय दिव्य सिंहासनीं
लखलखे भरतभूजननि बघ विजयिनी !
प्रणय, नय, सत्य हे सज्ज गण रक्षणीं,
बघ भविष्याचिया दिव्य त्या मंदिरा. ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - वरमंगला
राग - भूप
ठिकाण - अजमेर
दिनांक - १८ ऑगस्ट १९२२

मिळे ग नयनां नयन जरी

मिळे गे नयनां नयन जरी-

नयनमोहिनी, मनीं उसळती लहरींवर लहरी. ध्रु०

काय घुसळिला यापरि सागर मंथनकालिं सुरीं ?

विजेपरी लखलखतां अवचित दिपविशि नेत्र खरी.

पिटाळुनी स्मृति, धृति, मति ह्रदया व्यापिशि तूंच पुरी.

निलाजरे हे नयन पाहतिच, हासति लोक तरी.

नयनगवाक्षीं सकलेंद्रियगण एकवटे सुंदरी.

पापदृष्टि ही म्हणति, त्यांहिं मज ओळखिलें नच परी.


कवी - भा. रा. तांबे
जाति - पतितपावन
राग - भीमपलासी
ठिकाण - आग्रा रेल्वेस्टेशन
दिनांक - २२ जुलै १९२२

अवमानिता

कां मज आज तुम्हीं बोलविलें ?
बहु दिवसांनीं स्मरण जाहलें,
आज कसें हें घडलें ? ध्रु०

बालपणांतिल बालिश वर्तन,
तरुणपणांतिल तें भ्रूनर्तन,
स्वप्निं आज कां दिसलें ? १

चित्रगुप्त लिहि वह्या आपुल्या,
वरी धुळीच्या राशि सांचल्या,
त्यांस कुणीं हालविलें ? २

ह्रदयपटावरि सुंदर चित्रें
आपण रचिलीं पूर्वि पवित्रें,
बघुनि आजवर जगलें. ३

स्मराल कधिं तरि या आशेवरि
उदासवाणे दिवस कसे तरि
आजवरी घालविले. ४

परि समजूं का हा भाग्योदय,
भाग्यास्तचि कींपूर्ण तमोमय ?
ह्रदय तरल खळबळलें ! ५

सोक्षमोक्ष घेइन करुनी मी,
जगेन कीं जाइन मरुनी मी,
कांपत येण्या सजलें ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - भूपदंड
राग - तोडी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर,
दिनांक - १५ मे १९३४

दुर्गा

छेड सखे, दुर्गा मधु रागिणि;
बीनलयीं घर टाक थरारुनि. ध्रु०

लालन लालडि, लोचनमोहिनि
अमृत झरूं दे निजकंठातुनि. १

उन्मादक सुर-मोत्यांच्या सरि
उधळ, थरारीं मैफल भारुनि. २

धवल चांदणें स्रवे अमृतरस,
कशी पसरली शांत यामिनी ! ३

धीरोदात्त गभीरा दुर्गा,
ओत ओत सुर गभीर साजणि ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - दुर्गा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

चरणाखालिल हाय मीच रज !

सांगुं कुणा गुज साजणि, मनिंचे ?

बोलहि वदण्या चोरि समज मज;

मी पतिविरहित, शंकित नयनें

बघुति लोक मज, अशुभ गणुनिया टाळतात मज. ध्रु०

कुणाजवळ करुं ह्रदय मोकळें ?

कोंडमार किति ! दिवस कंठितें गिळुनि दुःख निज १

मी न मनुज का ? काय न मज मन ?

नच विकार का? लहरि उठति मनिं, काय सांगुं तुज ! २

पुरुष वरिति नव नवरि कितितरी,

सकल शुभच तें ! असहायच मी मुकेंच सावज ! ३

कशास जाई तो या मार्गी ?

बघुनि दुरुनिया पाणी पाणी होतें काळीज. ४

दुसर्‍या मिरविति युवति पतिशिरीं,

तुडविति पाउलिं चरणाखालिल हाय मीच रज ! ५


कवी - भा. रा. तांबे
जाति - श्रीमती
राग - तिलककामोद
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १८ सप्टेंबर १९३५

कवनकमळें

सखिलोचनकसारीं सारीं माझीं कवनें फुलति बहारीं ध्रु०

मूळ धरुनि तळिं गहन, जळावरि नाचति ठुमकुनि सारीं !

अथांग तुळ तुज न कळे रसिका, सुषमा वरिल निहारीं. १

सुरांगनांचें क्रीडास्थळ हें ह्या कमळांमाझारी,

इंद्रासह त्या उतरुनि या जळिं केलि करिति शृंगारीं. २

सुरासुरांची झुंज कमळिं या, रमति इथे नरनारी;

उषा-निशा नाचती, न उठती काळाच्या ललकारी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - लवंगलता
राग - काफी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १९ सप्टेंबर १९३५

मेनकावतरण

आलि आलि दीप्तिशाली
कोटि चंद्र नेत्रिं भालिं
स्वर्गाहुनि खालिं खालिं
मेनका वसंतीं १

अवतरली जैं छुमछुम
जिरुनि तपाची खुमखुम
थरथरूनि रोम रोम
टकमक मुनि पाही ! २

लटपटला गाधिजमुनि
जोडी जी सिद्धि तपुनि
चरणिं तिच्या ती ओतुनि
श्वानासम लोळे ! ३

जय जय जय जय मदना !
ब्रह्मा-शिव-विष्णु-गणां,
न चुके तव शर कवणा,
ध्वज तुझा त्रिलोकीं ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - मंदहसित
राग - खमाज
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २४ सप्टेंबर १९३५

जय रतिपतिवर !

सुरासुरांचा चुरा करी स्मर,
मंत्रि शीतकर, सेनाधिपवर
मधुऋतु मृदुतर, युवतिनयन शर ! ध्रु०

वैरि भयंकर योगीश्वर हर,
सोडि तयावर मृदुल नयनशर;
जळफळला क्षोभला मुनीश्वर
झोडुनि परि त्या स्मर करि जर्जर ! १

डळमळलें अढळहि योगासन,
तृतीय नयनीं क्षोभ हुताशन,
धगधगला जणुं जाळी त्रिभुवन !
भस्म जाहला जळुनि कुसुमशर ! २

आटोपेना अशरीरहि परि
शरावरी शर सोडी हरावरि,
जेरिस ये हर, अस्त्रें आवरि,
आला शरणागत चरणांवर. ३

स्मरमीनध्वज फडके त्रिभुवनिं,
सुर-नर-खग-मृग लोळति चरणीं,
वृथा वल्गना प्रीतीच्या जनिं !
जय कविकुलगुरु ! जय रतिपतिवर ! ४


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - मारवा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

शरणागत

दारिं उभा शरणागत तव मी,
क्षुद्र जंतु अति भवसंभव मी. ध्रु०

दिशि दिशि वणवण करुनि खपुनि अति
धरुनि देहली करितों स्तव मी. १

गहन तिमिरिं चांचपत येइं वर
त्रिविध ताप सोसुनि नव नव मी. २

ताड ढकल ! हें सोडिं दार नच;
उभा अढळ तें उघडशि तंव मी ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - पादाकुलक
राग - केदार
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १ ऑक्टोबर १९३५

घर राहिलें दूर !

उरला दिवस अल्प, घोडें थकुनि चूर,

पथ रानिं चधणींत, घर राहिलें दूर. ध्रु०

असशील घरिं आज तूं गे बघत वाट,

प्राण स्वनयनांत, पोटांत काहूर. १

मुद्रा तुझी म्लान डोळ्यापुढे येइ,

नाहीं मला पंख, ह्रदयांत हुरहूर. २

या निर्जनीं रानिं दे कोण मज साथ ?

माम् त्राहि जगदीश ! होई न निष्ठूर ! ३


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - भीमपलासी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ३ ऑक्टोअर १९३५

चुकला बाण

आलिस काय खिडकींतून गेलिस काय पळ ढुंकून

एक कटाक्षशर टाकून कासावीस जीव करून ? ध्रु०

आंबराईत झुळुक शिरून मोहर जाय जशी उधळून

शांत तळ्यांत पवन घुसून जाई शीघ्र जळ ढवळून !

आलिस काय, गेलिस काय ? १

मी पांथस्थ मार्गी जाइं, तुझिये दारिं ठरलों नाहिं,

धरिला नेम अन्यासाठिं चुकला बाण कां मज गांठि ?

आलिस काय, गेलिस काय ? २


कवी - भा. रा. तांबे
जाति - गंधलहरी
राग - हमीर
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - २ ऑक्टोबर १९३५

पाणपोईवाली

झाली ती ओणवी, तों पदर उरिं सरे सैल झाला, झुले तो

पाणी दे पाणपोईजवळ उभि, पितां ऊर्ध्वदृष्टी फुले तो !

बोटें तीं ओंजळीचीं विरळ, मग तिची धार बारीक झाली;

मद्येच्छू काय पीतो अविचल ? मदिराक्षी तरी काय घाली !


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - स्रग्धरा
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर