सुनीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुनीत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

देवा, स्त्रीहृदयीं

देवा, स्त्रीहृदयीं मनोरमपणा केव्हा कुणीं ओतिला ?
गङगौघापरि भूवरी वरुनि ये ओढाळ ओढा कसा !
भूमीतें पहिल्या रसें सजवितां हा सार्थ होऊ रसा;
हा दिव्याभिमुखी करी ऊजळुनी चेतोभवज्योतिला.
नेत्रें तीं वळतां ऊठे प्रथम त्या वृष्टींतलें वादळ,
गालींचीं अरुण स्मितें झळकतां प्रीति त्वरें अङकुरे,
ऐकाकी फुलतांच वाक्सुमन तें वेडा पतङग स्फुरे,
त्या आलिङगनचुम्बनांत पहिली ऐकी पटे मङ्गल.
कैशी घेत अनेक रम्य वळणें जाऊ वरी हा पथ,
भासे मन्दिर न्हाणिलें गिरिशिरीं की सोनियाच्या रसें !
प्रीतीची अधिदेवताच वसशी तू त्या स्थळीं राजसे,
देवी, अन्तर तोडुनी तव पदीं आलोंच मी धावत.
म्हतारीं म्हणुं, देत की भवपथीं काटेकुटे मातले -
काटयांची क्षिति कां गुलाब फुलतां हे ध्येयलोकांतले ?


कवी - माधव ज्युलियन
१ फेब्रुवारी १९१२

आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- फैजपूर २९ नोव्हेंबर १९०१