सुधीर मोघे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुधीर मोघे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

नाहूनिया उभी मी ...........

नाहूनिया उभी मी सुकवित केस ओले
वेड्या मुशाफिराने त्याचेच गीत केले.

अवकाश भारलेला माझे मला न भान,
अनिवार एक होती ओठावरी तहान
श्वासाचिया लयीत संगीत पेरलेले.........

साधुनी हीच वेळ ;आला कुठून वारा
सुखवित फूल त्याने लुटला पराग सारा
मग होय चंदनाचे; आस्तित्व तापलेले...........

दाही दिशात तेंव्हा आली भरून तृप्ती
अथांग तेवणारी होई निवांत ज्योती
येई न सांगता जे असले घडून गेले.........


कवी - सुधीर मोघे

मन मनास उमगत नाही

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
दुबळया, गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा

चेहरा, मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा


कवी - सुधीर मोघे 

चाललो

चाललो तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो 
 मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो 

वैराण माळ उघडा बेचैन तळमळे 
 मी दान आसवांचे फेकीत चाललो 

आव्हेरुनी फुलांची अनिवार आर्जवे 
 काटेकुटे विखारी वेचित चाललो 
 
दाही दिशांत वेडा वैशाख मातला 
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो 

ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला 
मी तार वेदनेची छेडित चाललो 


 कवी - सुधीर मोघे