madhav jyuliyan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
madhav jyuliyan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

ऐकव तव मधु बोल

ऐकव तव मधु बोल, कोकिळे,
ऐकव तव मधु बोल ॥ध्रु॥

नकोत मजला मैना, राघू,
साळुंकी, चंडोल
नकोत मजला विविध सुरांचे
कृत्रिम हे हिंदोल ॥१॥

एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल,
वसंत नाहीं अजुन संपला,
कां झालीस अबोल? ॥२॥

सुखें वसंतासंगें जा मग
पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपुनहि
पर्णांमाजीं खोल ॥३॥

पाहिन नंतर वाट वर्षभर
दाबुनि चित्त विलोल
नको करूं पण आस एवढी
जातां जातां फोल! ॥४॥


कवी - माधव जुलियन

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !


कवी - माधव ज्यूलियन

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥


कवी - माधव ज्युलियन

प्रेम कोणीही करीना

प्रेम कोणीही करीना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी,
भाळता कोणास देशी का न भक्तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी.


गीतकार - माधव ज्युलियन
गायक  - जी. एन्‌. जोशी
संगीतकार - जी. एन्‌. जोशी