abhang लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
abhang लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुनः पुनः यावें

धन्य झालों देवा केलें आगमन

जाहलें पावन घर माझें

भजनपूजन नामाचा गजर

लाजले निर्जर देखोनिया

दाही दिशां भरे आनंदीआनंद

आनंदाचा कंद घरीं आला

आणखी याहून स्वर्ग दुजा काय ?

जेथें तुझे पाय तोची स्वर्ग !

भाबड्या भावाची अज्ञानाची सेवा

गोड केली देवा दयावंता

आतां गमनाची वेळ ये जवळ

जीवा तळमळ लागलीसे

पुनः पुनः यावें घ्यावा समाचार

हेंच वारंवार विनवीं देवा !


कवी - भा. रा. तांबे

आनंदाचे डोही

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥

काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥

- संत तुकाराम

तुझे नाम मुखी

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

चहूंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कनवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणें मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊं द्या करूणा देवराया ॥४॥


 - संत निर्मळा