चित्रपट गीते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रपट गीते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी गाताना गीत

मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना

खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन तडफड होई
पाळणा म्हणे अंगाई

आयुष्याला नको सावली काळी
इश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – रवींद्र साठे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर

थांब जरासा

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा ! ॥धृ.॥

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा ! ॥१॥

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा ! ॥२॥

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा ! ॥३॥

गीत : ना. घ. देशपांडे
संगीत : यशवंत देव
स्वर : कृष्णा कल्ले

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी,
तू बहरांच्या बाहूंची

तू ऐल राधा, तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची

तू काही पाने, तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची

तू नवीजुनी, तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची

तू हिर्वी-कच्ची, तू पोक्त सच्ची,
तू खट्टीमिठ्ठी ओठांची

तू कुणी पक्षी : पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची

गीत – आरती प्रभू
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट – निवडूंग (१९८९)