सुधीर फडके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुधीर फडके लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

होते तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाची पाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी


कवी       -     ग. दि. माडगूळकर
संगीत    -     सुधीर फडके
स्वर       -     सुधीर फडके
चित्रपट   -    प्रपंच (१९६१)
राग        -    मिश्र पिलू

दळिता कांडिता

दळिता कांडिता ।    तुज गाईन अनंता ॥१॥

न विसंबे क्षणभरी ।    तुझे नाम ग मुरारी ॥२॥

नित्य हाचि कारभार ।    मुखी हरि निरंतर ॥३॥

मायबाप बंधुबहिणी ।    तू बा सखा चक्रपाणी ॥४॥

लक्ष लागले चरणासी ।    म्हणे नामयाची दासी ॥५॥


रचना     -    संत जनाबाई
संगीत    -    सुधीर फडके
स्वर       -    आशा भोसले
चित्रपट   -    संत जनाबाई (१९४९)

तरुतळी

त्या तरुतळी विसरले गीत
हृदय रिकामे घेऊन फिरतो
इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना
स्वरातूनी चमकते वेदना
तप्तरणे तुडिवत हिंडतो
ती छाया आठवीत

विशाल तरु तरी फांदी लवली
थंडगार घनगदर् सावली
मनीची अस्फुट स्मिते झळकती
तसे कवडसे तीत

मदालसा तरुवरी रेलूनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळी सळसळे, वळे ती
मथित हृदय कवळीत

पदर ढळे, कचपाश भुरभूरे
नव्या उभारीत उर थरथरे
अधरी अमृत ऊतू जाय
परी पदरी हृदय व्यथित

उभी उभी ती तरुतळी शिणली
भ्रमणी मम तनू थकली गळली
एक गीत, परी चरण विखुरले
व्दिधा हृदय संगीत


कवी - वा.रा.कांत
गायक - सुधीर फडके
संगीतकार - यशवंत देव

आज राणी पूर्विची ती

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन्‌ सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का ?
नीत्‌ नवी मरणे मराया जन्म तू मागू नको



गीतकार     -    वा. रा. कांत
संगीत        -    यशवंत देव
स्वर          -    सुधीर फडके