म. म. देशपांडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
म. म. देशपांडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
 सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।


कवी - म. म. देशपांडे.

नाना पातळ्या मनाच्या

 नाना पातळ्या मनाच्या
आणि चढायला जिने
वर वर जावे तसे
हाती येताता खजिने

नाना पातळ्यांवरुन
नाना जागांची दर्शने
उंचीवरुन बघता
दिसे अमर्याद जिणे

उंच पातळीवरुन
दिसताता स्पष्ट वाटा
वर जावे तसा होतो
आपोआप नम्र माथा

नाना पातळ्यांवरती
नाना लढतो मी रणे
होता विजयी; बांधितो
दारावरती तोरणे


कवी - म. म. देशपांडे.