vinda karandikar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vinda karandikar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मृद्‌गंध

१. कसा मी कळेना !
२. हे माडांनो !
३. तेंच ते
४. शाप
५. पुन्हा एकदां
६. हीच दैना
७.
८.
९.
१०.
११. 
१२.

विंदा करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.




काव्यसंग्रह
स्वेदगंगा    इ.स. १९४९   
मृद्‌गंध    इ.स. १९५४
धृपद    इ.स. १९५९        
जातक    इ.स. १९६८
विरूपिका    इ.स. १९८१        
अष्टदर्शने    इ.स. २००३


संकलित काव्यसंग्रह
संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)



 बालकविता संग्रह
राणीची बाग    इ.स. १९६१        
एकदा काय झाले    इ.स. १९६१
सशाचे कान    इ.स. १९६३        
एटू लोकांचा देश    इ.स. १९६३
परी ग परी    इ.स. १९६५        
अजबखाना    इ.स. १९७४
सर्कसवाला    इ.स. १९७५        
पिशीमावशी आणि तिची भुतावळ    इ.स. १९८१
अडम्‌ तडम्    इ.स. १९८५        
टॉप    इ.स. १९९३
सात एके सात    इ.स. १९९३        
बागुलबोवा    इ.स. १९९३





ललित निबंध
स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)




समीक्षा
परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
उद्गार (इ.स. १९९६)


इंग्लिश समीक्षा
लिटरेचर अ‍ॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)



अनुवाद
अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
राजा लिअर (इ.स. १९७४)




अर्वाचीनीकरण
संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)





 



पुरस्कार आणि पदवी
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान १९९१
जनस्थान पुरस्कार १९९३
कोणार्क सन्मान १९९३
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)
केशवसुत पुरस्कार
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स








विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक--
इ.स. २०११ : विजया राजाध्यक्ष
इ.स. २०१२ : के.ज. पुरोहित
इ.स. २०१३ : ना.धों. महानोर

राणीची बाग

स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग

हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते

उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगित पुराण

सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत

जिराफ होता गात छान
मानेइतकीच लांब तान

कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार

मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे

त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग


कवी - विंदा करंदीकर

त्याला इलाज नाही

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

                    
कवी - विंदा करंदीकर

हीच दैना

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

साठीचा गजल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!


कवि - विंदा करंदीकर

घननीळ

घननीळ सागराचा घननाद येतो कानी
घुमती दिशा दिशात लहरीमधील गाणी

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत

आकाश तेज भारे माडांवरी स्थिरावे
भटकी चुकार होडी लाटात संथ धावे

वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा

जलधीबरोबरीचे आभासमान नाते
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे

सांनिध्य सागराचे आकाश पांघराया
परी साथ ना कोणाची अस्तित्व सावराया


कवी - विंदा करंदीकर

स्वप्‍न

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले !

स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मी
होते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ?

स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्य
स्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले

स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्‍त पंख
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले

स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जा
हे नेत्र घेऊनि जा स्वप्‍नात नाहलेले

जा नेत्र घेऊनि जा स्वप्‍नांध पांगळीचे
आता पहावयाचे काही न राहिलेले


गीतकार    -     विंदा करंदीकर
संगीत       -     यशवंत देव
स्वर          -     पद्मजा फेणाणी-जोगळेकर
गीतसंग्रह  -    ही शुभ्र फुलांची ज्वाला

जडाच्या जांभया

रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां
जीवबाची कळ नाही.

संस्कृतीला साज नाही.
मानवाला माज नाही;
आज कोणा, आज कोणा,
जीवनाची खाज नाही.

इथें आतां युद्ध नाही;
इथें आतां बुद्ध नाही;
दु:ख देण्या, दु:ख घेण्या
इथे आतं शुद्ध नाही.

भावनेला गंध नाही;
वेदनेला छंद नाही;
जीवानाची गद्य गाथा
वाहतें ही; बंध नाहीं!

चोर नाही; साव नाही;
मानवाला नांव नाही;
कोळ्शाच भाव तेजीं
कस्तुरीला भाव नाही.

जागतें कैवल्या नाही;
संशयाचे शल्य नाही;
पापपुण्या छेद गेला.
मुक्ततेला मूल्य नाही.

जन्मलेल्या बाप नाही;
संचिताचा ताप नाही;
यापुढे या मानवाला
अमृताचा शाप नाही.

जाणीवेची याच साधी
राहिली मागें उपाधीं;
– या जडाच्या जांभया हो
ना तरी आहे समाधी!


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध
- कागल, २१ सप्टेंबर ५०

कणिका

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते मराठी कवी कै. विंदा करंदीकर यांच्या काही कणिका सादर करत आहे.
कणिका म्हणजे चार ओळींची छोटीशी कविता...

उत्क्रांती

माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी

कवी - विंदा करंदीकर

दर्पण

परमेशाला गमलें, आपण
रुप पहावें अपुले सुंदर;
आणिक केला त्यानें दर्पण;
तोच समजतो आपण सागर!

कवी - विंदा करंदीकर

चंद्र आणि क्षय

चंद्र जाहला क्षयी कशाने?
शापबलाने, म्हणती कोणी;
कुजबुकला पण तो माझ्याशी;
या कवितांनी! या कवितांनी!

कवी - विंदा करंदीकर

नायक

रामायण वाचुनिया नंतर
बोध कोणता घ्यावा आपण
श्रीरामासम मिळता नायक
वानर सुद्धा मारिती रावण

कवी - विंदा करंदीकर

इतिहास

इतिहासाचे अवघड ओझे
डोक्यावर घेउनी ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
चढुनि त्यावर भविष्य वाचा

कवी - विंदा करंदीकर

खळी

स्वर्गामधुनी येता बालक
अमृत त्याचे काढुन घेती
उरे रिकामी वाटी जवळी
ती खळी ही गालावरती

कवी - विंदा करंदीकर

मला टोचते मातीचे यश

श्रावणातले ऊन रेशमी
आकाशाला बांधून ठेवी
घट्ट धरेशी
सह्याद्रीच्या गळ्यात पडती
श्रावणतल्या सरी सराईत
ओलेत्याने
आणि ओणव्या माळालाही
हंबरणारा अवखळ वारा
ढुशी मारतो भलत्या जागी
अडचणीतल्या पाऊलवाटा
अंग चोरुनी हळूच पळती
माझ्या जवळून
मजला टाळून
- ब्रम्ह जाहले धरणीला वश
अशा प्रसंगी
आत कुठेसे
मला टोचते मातीचे यश
संकलक Kshipra वेळ ८-२७ म.नं. 4 अभिप्राय या पोस्टचे दुवे
वर्ग विंदा करंदीकर
सोमवार ७ फेब्रुवारी २०११
असेल जेव्हा फुलावयाचे - विंदा करंदीकर
असेल जेव्हा फुलावयाचे
तुझ्याचसाठी फुल सखे तू
फुल सखे तू फुलण्यासाठी;
फुल मनातिल विसरून हेतू.

या हेतूला गंध उद्याचा;
या हेतूची किड मुळाला;
फुल सखे तू फुलण्यासाठी;
या हेतूचा चुकवून डोळा.

फुल सखे होउन फुलवेडी;
त्या वेडातच विझव मला तू.
विझव नभाच्या आळवावरचे;
स्थळ-कालाचे हळवे जंतू.


कवी - विंदा करंदीकर

मानवाचे अंती । एक गोत्र

मिसिसिपीमध्ये। मिसळू दे गंगा;
र्‍हाइनमध्ये "नंगा"। करो स्नान.

सिंधुसाठी झुरो। ऍमेझॉन थोर,
कांगो बंडखोर। टेम्ससाठी.

नाईलच्या काठी। "रॉकी" करो संध्या;
संस्कृती अन्‌ वंध्या। नष्ट होवो.

व्होल्गाचे ते पाणी। वाहू दे गंगेत;
लाभो निग्रो रेत! पांढरीला.

माझा हिमाचल। धरो अंतर्पट,
लग्नासाठी भट। वेदद्रष्टा!

रक्तारक्तातील। कोसळोत भिंती;
मानवाचे अंती। एक गोत्र.

छप्पन भाषांचा। केलासे गौरव
तोचि ज्ञानदेव। जन्मा येवो.

जागृतांनो फेका। प्राणांच्या अक्षता
ऐसा योग आता। पुन्हा नाही!


कवी - विंदा करंदीकर

डोळ्यातल्या डोहामध्ये

डोळ्यांतल्या डोहामध्ये
खोल खोल नको जाऊ;
मनांतल्या सावल्यांना
नको नको, सखे, पाहू;

जाणीवेच्या गाभा-यात
जाऊ नको एकटीने ;
गेलेल्यांना साधले का
व्यथेवीण मागे येणे ?

व्यथेच्या या पेल्यांतून
सत्याचे जे घेती घोट,
पूस त्यांना कसा कांपे
पिता पिता धीट ओठ !


कवी - विंदा करंदीकर

एवढे लक्षात ठेवा

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥


कवी - विंदा करंदीकर