माधुरी भिडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माधुरी भिडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गिरीशिखरे चढणार

गिरीशिखरे चढणार
जगाच्या माथ्यावर जाणार ||

काळा कातळ सह्याद्रीचा
कणा आमुच्या महाराष्ट्राचा
यशवंती मी बनुनी मानवी
सर सर सर चढणार ||

बर्फ कडा वा हिमालयाचा
वास तिथे शैलजाशिवांचा
चढुनी तेथे मी या नयनी
कैलासा बघणार ||

शिखरी चढुनी निरखीन सृष्टी
वार्‍यासंगे सांगीन गोष्टी
हात उभवुनी टाचा उचलुनी
आकाश धरणार ||

मनीची बाळे


आमच्या मनीला
पिले झालीत छान
एक आहे काळे
एक गोरेपान

गोर्‍यापान बाळाचे
डोळे आहेत निळे
काळे काळे पिल्लू
फार करते चाळे


मनीच्या बाळांचं
करायचं बारसं
पाहुण्या माऊंना
दूध देऊ गारसं

गोर्‍या बाळाचं नाव
ठेवायचं नीलम.
काळयाचं सांगू?
त्याचं नाव द्वाडम

बडबड-गीत


ससोबा साजरे
खातात गाजरे
या की जवळ
भारी तुम्ही लाजरे



कावळोबा काळे
फिरवता डोळे
लावा बुवा तुमच्या
तोंडाला टाळे






चिमुताई चळवळे
इथे पळे तिथे पळे
बसा एका जागी
पायात आले गोळे
मिठूमिया मिरवे
अंग कसे हिरवे
सारखे काय तेच
बोला की नवे


गाडी

घडाडधड खड खड खड
झुक झुक गाडी चालली
दोहीकडे झाडं पहा
कशी पळू लागली

खडाडखड धड धड धड
किती हिची गडबड
गप्प बसणं माहीत नाही
सारखी हिची धडपड

सों सों सों सों वारा येतो
डोळयात जाते धूळ
वेडयासारखी पळत सुटते
लागलंय हिला खूळ

दंगा करीत शिट्टया फुंकीत
गाडी सुटते पळत
तरी हिला मुळीच कसा
मार नाही मिळत?

साबणाचे फुगे



जादूची बाटली
त्याच्यात पाणी
फुगे आत
ठेवले कोणी?

काडीवर बसून
बाहेर येतात
रंगीत झगे
बघा घालता

वार्‍यावरती
होतात स्वार
किती मजेचे
रंगतदार

हात लावता
फट्ट फुटले
बघता बघता
कुठे पळाले?

जिराफदादा जिराफदादा
खरंच का रे
उंच मान करून
मोजतोस तारे?

द्वाडपणा केलास
बाप्पानं धरला कान
म्हणून का उंटदादा
वाकडी झाली मान?

चित्तेदादा चित्तेदादा
काळे डाग कसे
शाईने अंगावर
पाडलेस का ठसे?

चिऊताई

चिऊताई चिऊताई
चिंव चिंव चिंव

मी पुढे पळते
तू मला शिव

टुण टुण टुण
चल मार उडी

चल आपण खेळू
दोघी फुगडी

भुर्र भुर्र भुर्र
उडून नको जाऊ

चल ये खेळू
देते तुला खाऊ

लवकर उठ
बघ आली माऊ

पटकन पळ
तुझाच होईल खाऊ


माकडदादा माकडदादा
हूप हूप हूप
उडया चला मारुया
खूप खूप खूप
ससेभाऊ ससेभाऊ
पैज लावू चला
पहा कसा धावतो
हरवा पाहू मला!

बेडूकराव बेडूकराव
नका मारू बुडी
तुमच्याहून बघा
लांब मारीन उडी
हसता काय सारे
मारीत नाही गप्पा
दुध पितो म्हणून
जोर देतो बाप्पा

कवियत्री: माधुरी भिडे

वेडा बाळू

"शाळेत नाही जाणार,
येतं मला रडू
आई मला शाळेत
नको ना धाडू!"

कोण बरं बोललं,
रडत हळूहळू
दुसरं कोण असणार?
हा आमचा बाळू.

आई मग म्हणाली:
शहाणा माझा राजा
शाळेत गेलास तर,
देईन तुला मजा.

घरी बसलास तर,
हुशार कसा होशील?
बाबांसारखा कसा,
इंग्लंडला जाशील?

आपला रामा गडी,
शाळेत नाही गेला
म्हणून भांडी घासावी,
लागतात ना त्याला?

तू कोण होणार?
डॉक्टर का गडी?
बाबांसारखी ऐटबाज
नको तुला गाडी?

मुसमुसत बोलला,
बाळू आमचा खुळा

"होईन मी गडी,
नको मला शाळा."

ताई

ताई म्हणे मोठी
आणि मी म्हणे लहान
जिथे तिथे जेव्हा तेव्हा
ताईचाच मान

नवीन पुस्तकं ताईला
पेन्सिल पण तिलाच
किती मोठी झाले तरी
मी लहान सदाच!

ताई सारखी मोठी होणार
नवे फ्रॉक तिला
"बरोब्बर" होतात म्हणे
जुने फ्रॉक मला

अस्सा अगदी राग येतो
पण उपयोग काय होणार?
अगदी म्हातारी झाले तरी
मी लहानच राहणार.

परी

परी असते गोरी
परी असते खरी
परीच्या गळयात असते
सोन्याची सरी

परी हासते गालात
परी नाचते तालात
परी अशी चालते
आपल्याच तोर्‍यात

परी असते इवली
चिमणीशी भावली
अंग तिचे मऊ जणू
साय असे लावली

काल मला दिसली
खिडकीमध्ये बसली
खरं सांगते परी
मला बघून हसली

मोठी झाली म्हणजे

मोठी झाले म्हणजे
होणार मी आई
मंडळात जायची
सारखी माझी घाई

मोठी झाले म्हणजे
मी बाई होणार
चष्म्यावरून अश्शी
रागानं पाहणार

मोठी झाले म्हणजे
होईन भाजीवाली

म्हणेन "घ्या हो घ्या हो.
ताजी भाजी आली."

मोठी झाली म्हणजे
बोहारीण मी होईन
नव्या छान भांडयांनी
पाटी माझी भरीन

नकोच पण मोठी व्हायला
लहानच मी राहणार
मोठेपणी सारखा सारखा
खाऊ कसा मिळणार?