अभिजीत दाते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभिजीत दाते लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

जायचे नाही

कुठल्याच जुन्या धाग्याला उसवून जायचे नाही
मज वसंत आल्यावरही बहरून जायचे नाही

का विपर्यास झाला या माझ्या साध्या स्पर्शाचा
की तूच ठरवले होते समजून जायचे नाही

जर इतका त्रागा होतो तुजला माझ्या शब्दाचा
तू नजरेमधुनी गझला सुचवून जायचे नाही

तव गंध लांघुनी येतो श्वासांच्या अगणित भिंती
त्यालाही बहुधा मजला चुकवून जायचे नाही

ती दरी गोठली आता दोघांमधल्या नात्याची
तू नाव धुक्यावर माझे गिरवून जायचे नाही

मी निवर्तल्याचे तिकडे इतक्यात नका हो कळवू
मज जळता जळता कोणा भिजवून जायचे नाही

वाटल्यास ठेवा काटे, स्वप्नांच्या फुटक्या काचा
माझ्या थडग्यास फुलांनी सजवून जायचे नाही

- अभिजीत दाते

देऊ किती आवाज आता..!

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

– अभिजीत दाते

ओळख


तुला का वाटते गाफील आहे मी
तुझ्या खेळामधे सामील आहे मी

हवासा वाटतो पण काय कामाचा
जुन्या पत्रातला तपशील आहे मी

तुझी उजळीत स्वप्ने रात्रभर जळतो
तुझ्या दारातला कंदील आहे मी

कशाला वास्तवाशी रोजचा झगडा
चुकीचे काय जर स्वप्नील आहे मी

कधी जमलेच तर घे गुणगुणून मजला
तुझ्या ओठातली मैफील आहे मी

जगाला काय ओळख वेगळी सांगू
खरे तर तूच माझ्यातील आहे मी

- अभिजीत दाते