पु.शि.रेगे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पु.शि.रेगे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पाहिले न पाहिले

जे मत्त फुलांच्या कोषांतुन पाझरलें,
निळ्या लाघवी दंवांत उलगडलें,
जें मोरपिसांवर सांवरलें,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हा एकदां
तशाच एका लजवंतीच्या
डोळ्यांमध्ये - डॊळ्यांपाशी -
झनन-झांजरे मी पाहिलें...
पाहिले न पाहिले.

जें प्राजक्ताच्या पाकळिवर उतरले,
मदिरेवरच्या निळ्या गुलाबी फेंसावर महिरपलें,
जे जललहरीवर थरथरले,

तें - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हां एकदां
तशाच एका लजवंतीच्या
ओठांवरती - ओठांपाशी
ठिबक-ठाकडें मी पाहिलें....
पाहिलें न पाहिलें.

जे कलहंसांच्या पंखांवर भुरभुरलें,
सोनेरी निळसर मळ्या-मळ्यांतुन शहारलें,
जें पुनवेंच्या चांदण्यांत भिजलें, भिजलें,
ते - त्याहुनही - आज कुठेंसें
पुन्हां एकदां
तशाच एका लजवंतीच्या

मानेखालीं - किंचित वक्षीं -
बहर-बावरें मीं पाहिलें...
पाहिलें न पाहिलें.


कवी - पु.शि.रेगे

शिल्प

जे सांगायचे
ते हवे कसे अगदी घट्ट
बांधेसूद्;
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द,
खुंट्या पिरगाळून
जागच्या जागी सुतंत्र
टांगलेला;
एकंदर ठाण कसे अगदी
वास्तुशिल्पित.
पण मध्येच
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात,
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली
नक्षी वेल्हाळते,
वार्‍याची पताका चित्रावते,
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते
- मनासारखी.
शब्दांना
पटत नाही आपली पहिली ओळख.
ते बिथरतात
भलत्याच खुंट्या धरून बसतात्;
म्हणतात :
आम्हाला एक नवी भाषा
घालून द्या.
मी म्हणतो : हो, हो;
उगाच त्यांना चुचकारीत.


कवी -  पु.शि.रेगे

आयुष्यात प्रेम करायचय मला ...

दूर कुठेतरी समुद्रकिनारी
हातात हात घालुन बसायचय मला,
आकाशातील तारकांकडे बघताना
भविष्याचे हितगुज करायचय मला,
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

माझ्या मांडीत डोक ठेऊन
तिला झोपी गेलेल पहायचय मला,
तिच्या शांत चेहेऱ्याकडे पहाताना
स्वतःशी स्मित करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यासोबत थोड दुष्टपणे वागुन
तिला रागाने लालबुंद करायचय मला
तिची आसवें पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय तिला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

आयुष्यातील तिचा हिमालय
तिच्या बरोबरीने चढायचाय मला
शिखरावर पोहोचताना माझ्या सोबतीच आनंद
तिच्या डोळ्यातुन व्यक्त झालेला अनुभवायचाय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

ती माझ्यापासुन दुर जात असताना
विरहाच्या कल्पनेने खिन्न व्हायचय मला
ती नसल्यामुळे होणाऱ्या वेदनांना
डोळ्यावाटे मुक्त करायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...

तिच्यसोबतचे माझे आयुष्य
झऱ्याप्रमाणे अवखळ जगायचय मला
पुन्हा जन्मेन तर जिच्यासाठी
तिचा चेहेरा पहात जायचय मला
आयुष्यात प्रेम करायचय मला ...


कवी - पु. शि. रेगे

त्रिधा राधा

आभाळ निळे तो हरि,
ती एक चांदणी राधा,
बावरी,
युगानुयुगीची मनबाधा

विस्तीर्ण भुई गोविंद,
क्षेत्र साळीचे राधा,
संसिद्ध,
युगानुयुगीची प्रियंवदा

जलवाहिनी निश्चल कृष्ण,
वन झुकले काठी राधा,
विप्रश्न,
युगानुयुगीची चिरतंद्रा


कवी :- पु. शि. रेगे

लिलीची फुले

लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!


कवी - पु. शि. रेगे