एक तुतारी द्या मज आणुनी,
फुंकिन मी जो स्वप्राणानें,
भेदुनि टाकित सगळीं गगनें ---
दीर्घ जिच्या त्या किंकाळीनें;
अशी तुतारी द्या मजलागुनि,
अवक्राशाच्या ओसाडींतिल
पडसाद मुके जे आजवरी
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारीतं जीला जबरी ---
कोण तुतारी ती मज देइल ?
सारंगी ती सतार सुन्दर
वीणा, वीनहि, मृदंग, बाजा,
सूरहि, सनई, अलगुज माझ्या ---
कसचीं हीं हो पडतिल काजा ?
एक तुतारी द्या तर सत्वर.
रुढी जुलूम यांची भेसुर
सन्तानें राक्षसी तुम्हांला
फाडुनि खाती, ही हतवेला ---
जल्शाची का ? पुसा मनाला !
तुतारीनें ह्या सावध व्हा तर !
अवडम्बरलीं ढगें कितीतरि,
रविकिरणांचा चूर होतसे,
मोहर सगळा गळुनि जातसे,
कीड पिकांवरि सर्वत्र दिसे !
गाफिलगिरी तरिही जगावरि !
चमत्कार ? ‘ तें पुराण तेथुनि
सुन्दर, सोज्वळ, गोडें, मोठें ? ’
‘ अलिकडलें तें सगळें खोटें ? ’
म्हणती धरुनी ढेरीं पोटें ;
धिक्कार अशा मुर्खांलागुनि ?
जुन्या नभीं या ताजे तारक,
जुन्या भूमिवर नवी टवटवी,
जुना समुद्रहि नव रत्नें वी;
जुन्यांतून जी निष्पत्ति नवी ---
काय नव्हे ती श्रेयस्कारक ?
जुनें जाउं द्या मरणालागुनि,
जाणुनि किंवा पुरुनी टाका,
सडत न एक्या ठायीं ठाका,
सावध ! ऐका पुढल्या हांका ?
खांद्यास चला खांदा भिडवुनि !
प्राप्तकाल हा विशाल भूधर,
सुन्दर लेणीं तयांत खोदा.
निजनामें त्यांवरती नोंदा
बसुनि कां वाढवितां मेदा ?
विक्रम कांहीं करा, चला तर !
अटक कशाची बसलां घालुनि ?
पूर्वज वदले त्यां गमलें तें,
ऐका खुशाल सादर चित्ते;
परंतु सरका विशंका पुढतें ---
निरोप त्यांचा ध्यानीं घेउनि.
निसर्ग निर्घुण त्याला मुर्वत --
नाहीं अगदी पहा कशाची !
कालासह जी क्रीडा त्याची,
ती सकलांला समान जाची ---
त्यांशीं भिडुनी झटुनी झगडत
उठवा अपुले उंच मनोरे,
पुराण पडक्या सदनीं कांरे !
भ्याड बसुनियां रडतां पोरें ?
पुरुषार्य नव्हे पडनें रखडत !
संघशक्तिच्या भुईंत खंदक
रुंद पडुनि शें तुकडे झाले,
स्वार्थानपेक्ष जीवीं अपुलें
पाहिजेंत ते सत्वर भरलें;
ध्या त्यांत उडया तर बेलाशक !
धार धरिलिया प्यार जिवावर
रडतिल रडोत, रांडा पोरें,
गतशतकांचीं पापें घोरें ---
क्षालायाला तुमचीं रुधिरें ---
पाहिजे रे ! स्त्रैण न व्हा तर !
जाऊं बघतों नांव लयाप्रत
तशांत बनला मऊ मेंढरें,
अहह ! घेरिलें आहे तिमिरें,
परंतु होऊं नका बावरे ---
धीराला दे प्रसंग हिंमत !
धर्माचें माजवूनि डम्बर,
नीतीला आणिती अडथळे,
विसरुनियां हें जातात खुळें :---
नीतीचे पद जेथें न ढळें ---
धर्म होतसे तेथेंच स्थिर,
हल्ला करण्या तर दंभावर--तर बंडांवर,
शूरांनो ! या, त्वरा करा रे !
समतेचा घ्वज उंच घरां रे !
नीतीची द्वाही पसरा रे !
तुतारिच्या ह्या सुराबरोबर !
नियमन मनुजासाठीं, मानत्र ---
नसे नियमनासाठीं जाणा,
प्रगतिस जर तें हाणी टोणा,
झुगारूनि तें देउनि, बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !
घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नतिचा ध्वज उंच घरा रे !
वीरांनो ! तर पुढें सरा रे ---
आवेशानें गर्जत ’ हर हर ’ !
पुर्वींपासुनि अजुनि सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती;
सम्प्रति दानव फार माजती,
देवांवर झेंडा मिरविती !
देवांच्या मद्तीस चला तर !
कवी -
केशवसुत
कवितासंग्रह -
हरपलें श्रेय
- मुंबई २८ मार्च १८९३