शीळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शीळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शीळ

रानारानांत गेली बाई शीळ,
रानारानांत गेली बाई शीळ!

राया, तुला रे, काळयेळ नाही,
राया, तुला रे, ताळमेळ नाही,
थोर राया, तुझं रे कुळशीळ,

येडयावानी फिरे रानोवना,
जसा काही ग मोहन कान्हा,
हांसे जसा ग, राम घननीळ,

वाहे झरा ग झुळझुळवाणी,
तिथं वारयाची गोड गोड गाणी,
तिथं राया तुं उभा असशील,

तिथं रायाचे पिकले मळे,
वर आकाश शोभे निळे,
शरदाच्या ढगाची त्याला झील,

गेले धावून सोडुन सुगी,
दुर राहून राहिली उगी,
शोभे रायाच्या गालावर तीळ,

रानीं राया जसा फुलावाणी,
रानीं फुलेन मी फुलराणी,
बाई, सुवास रानीं भरतील,

फिरु गळ्यात घालून गळा,
मग घुमव मोहन शीळा,
रानीं कोकिळ सुर धरतील,
“रानारानांत गेली बाई शीळ!”



कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कंचनी

झाले आज मी बावरी, बाई, भागले लोचन !
कोठे हालली वल्लरी, कोठे नाचले नंदन ?

होती एक आशा मला : सारे धुंडले मी वन;
गेले प्राजक्ताच्या तळी : तेथे दिसे ना तो पण.

सारी हालली ही फुले; सारे नाचले हे बन;
बाई, लाजली ही कळी : तिचे घेऊ का चुंबन ?

हाका घालते का कुणी ? माझे धुंदले हे मन :
वेड्या लाघवाने क्शी करु फुलांची गुंफण ?

खाली सारखे आणतो वारा परागांचे कण;
त्यांनी माखले हे असे माझे हि-यांचे कंकण.

झाले एक मी साजणी : कुठे माझा गऽ साजण ?
झाले एक मी कंचनी : करु कोणाचे रंजन ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

निद्रा

चंद्रप्रकाशातून ही कादंबिनीपुंजातूनी
सौंदर्यशाली श्यामला धुंदित ये वातायनी :

निद्रिस्त दोन्ही लोचने; ही मुक्त सोडी कुंतला;
भाली चकाके चांदणी; कंठात नाचे चंचला.

उत्फुल्ल या ह्रदपंकजी चालून आली मोहना :
गेले मिटूनी पद्म : तो माझी विरे संवेदना !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुझ्या माझ्यात गं

आज आहे सखे
बहुरंगी अपार
नजरेचे जुगार
तुझ्या माझ्यात गं !

आज आहे सखे
निशिगंधास गंध
श्वसनाचा प्रबंध
तुझ्या माझ्यात गं !

आज आल्यात गं
पावसाच्या सरी
भावनेच्या भरी
तुझ्या माझ्यात गं !

आज नाही सखे
येथ कोणी दुजे
आणि ‘माझे-तुझे’
तुझ्या माझ्यात गं !

आज पाहु नको
विस्मयाने अशी
प्रीत आहे पिशी
तुझ्या माझ्यात गं !

तुझ्या माझ्यात गं !
तुझ्या माझ्यात गं !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तळमळ

मी सुखात घालू हात कुणाच्या गळां ?
राहिलो इथे : पण नाही लागला कुणाचा लळा.

मज एकहि नाही कुणी सखासोबती :
ममतेविण हिंडत आहे हे जीवजात भोवती.

वंचनाच दिसते इथे सदा सारखी;
हे स्नेहशून्य जग: येथे कोठची जिवाची सखी ?

हे वरुन आहे असे, तसे अंतर:
हे उदास जीवा, नाही, बघ, इथे कुणी सुंदर !

विक्राळ घोर अंधार जरी कोंदला
पळ एकच झळकत आली : लोपली वरच चंचला.

पोसून ध्येयशून्यता उथळ अंतरी
शून्यातच वाहत जाते ही मानवता नाचरी.

माझा पण आता पुरा जीव भागला:
मज करमत नाही येथे , ने मला दूर, वादळा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुम्ही

सुदूरच्या जमिनीचे तुम्ही आहात प्रवासी :
उदार राघव का हो तुम्ही अहां वनवासी ?
तुम्ही दुजी वदता ही अनोळखी परभाषा :
परंतु ती कळण्याला मला नकोत दुभाषी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मालन

-१-
इवला झाला गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हालेना जरा वेलींचे पान;
निजली धरा; निजले रान,
आई, बहिणी झोपल्या घरी;
ये गऽ ये गऽ ये मागल्या दारी!
माथ्यावरती आला चंदीर
सांग, मी कसा धरावा धीर ?
भागले डोळे वाट पाहून :
प्रीतीची माझी ये गऽ मालन !

-२-
पुष्पवारती दवाचे बिंदू;
अंतराळात सुंदर इंदू;
पानोपानी की नाजूक वारा;
झीमझीम की झडीच्या धारा;
तशीच येते मूक, मोहन
अंगणातल्या वेलीमधून
शारदाची की ढवळी रात;
हासली प्रीत आतल्या आत !
दाविते कोण हंसीची मान ?
हासून येते माझी मालन !

-३-
पाहून तुझे काजळी डोळे
माझे गंऽ मन भुलले भोळे !
कपाळावरी चांदणी कोर;
मुक्त सोडला केसांचा भार;
हासणे गोड लावण्यखाणी;
कंठामधून कोकळगाणी ;
फुलांचे हार शोभले गळा;
रानराणीचा शृंगार भोळा.
कोणाचे ध्यान, कोणाचे गान,
प्रीतीचे कोण, सांग, मालन ?

-४-
एकाएकी का थांबली अशी ?
संध्येची दूर चांदणी जशी !
मूर्तच जशी हाले चाले ना !
उभी का दूर अधोवदना ?
कंपन ओठी, लाज नयनी :
बावरू नको रानहरिणी !
काय मनात भीती सारखी ;
नको गंऽ परी – होऊ पारखी !
प्रीतीला नाही भीतीचे भान ;
प्रीतीची माझी देवी मालन.

-५-
एकमेकांच्या आलिंगनात ;
भावनामय चुंबनगीत ;
एकमेकांच्या नयनांवरी
प्रीत मोहक, मूक, नाचरी;
एकमेकांचा हृदयनाद
घालत आहे एकच साद.
इवला झरा गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हासले जरा वेलीचे पान;
हासली धरा; हासले रान !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सुगी

पूर्णेच्या पाण्यामधी फार नाहीला ;
येऊन दया देवानंऽ हा दिला कौल चांगला.

चौफेर वनावर फळाफुलांच्या सरी;
डोईवर गेली, बाई, औन्दाच जवारी, तुरी !

मी राखण करते बरंऽ किती नेहमी ;
शेतात नांदते; आता येईल घरा लक्षुमी.

मळणी, अन उफणी तशी करू सोंगणी ;
फिरफिरू जशा हरिणी गऽ आम्ही मग साऱ्या जणी !

का उगाच हसता मला, अहो घरधनी !
मी खरोखरच भाग्याची लाभले तुम्हाला किनी ?

सासरी सरू, गोठ्यात जसंऽ वासरू ;
येईलच मायघराला घरट्यात जसंऽ पाखरू.

येऊ दे पण सांगते, भराला सुगी ;
वाहीन, माय अंबाई, पहिलीच तुला वानगी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ओसाडीत बसून

ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून

निमिषच फुलले
नंतर मिटले
फूल उदास हसून
ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून

दिसले मृगजळ
फिरले अवखळ
हरिण उगाच फसून
ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून

फिरता वणवण
माझे जीवन
थकले वाट चुकून
ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

येशील का रे?

एकदा पाहिले लागली माया
माझी रे कोवळी वाळली काया !
नवीन लोचन आले
आणखी अधीर झाले
वाटते तुला रे, पडली भूल
प्रीतीचे पहिले नाजूक फूल !

एकली बागेत हिंडत होते
हासत हासत आलास तेथे
पाहिले–पाहिले तूही
गेले मी लाजून बाई !
प्रीतीच्या नाजूक लागल्या झळा
जाळीत मैनेचा चढला गळा

नदीच्या किनारे होते रे, उभी !
हळूच चांदण्या हसल्या नभी
आले हे भारुन ऊर
हिंडले हिंडले दूर
वेगळ्या आपल्या मिळाल्या वाटा
नदीच्या पाण्यात नाचल्या लाटा

थांबला जरासा गेलास दूर
आतूर आशेचा सुकला नूर
सुकले चांदणे जळी
सुकली चाफ्याची कळी
अवती भवती नव्हते दुवे
वाळून चुंबिले पाऊल तुझे

तुझाच सांगते लागला ध्यास
तुझ्याच नावाचे चालले श्वास
डोळ्यांत कोंडले आसू
नको रे जीवन नासू
एकदा पाहिले लागली माया
माझी रे, कोवळी वाळली काया


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

इशारा

संध्येचे, सखये, तरंग पिवळे चुंबीत होते नभा
होती मंगल सांजवात सदनी लावीत तू बैसली
दाराशीच तुझ्याकडे बघत मी होतो मजेने उभा
काळी चंद्रकळा, शशांकवदने होतीस तू नेसली !

तेव्हा जे वठले हळुहळु तुझ्या संगीत ओठांवर
गाणे ते पहिले अजून घुमते चित्तात माझ्या, सखे !
होती ती घटिका निरामय, तुझा होता गळा सुंदर
ते सारे श्रुतिसंहिताच मजला, झाले तुला पारखे

नाचवी लहरी जलावर तशी प्रीती तुझी पावन –
पाण्याच्या लहरीपरीच ठरली आता अशी नाचरी
माझा नाश करावयास असला झालीस तू कारण
मी माझा नुरलो, उदास फिरतो ओसाड माळावरी

जीवाचे जळ घालूनी फुलविले — तू जाळिले नंदना
आता हास पुढे निरंतर तुला जाळील ही वंचना !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुझ्यासाठी !

तुझ्यासाठी
कितीदा
तुझ्यासाठी रे !

मी दुहेरी
बांधल्या
खूणगाठी
–खूणगाठी रे !

मी दुपारी
सोसले
ऊन माथी
– ऊन माथी रे !

लाविल्या मी
मंदिरी
सांजवाती
–सांजवाती रे !

कैक आल्या,
संपल्या
चांदराती
–चांदराती रे !

मी जगाच्या
सोडल्या
रीतभाती
– रीतभाती रे !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ये जरा जवळ, राजसे गऽ !

ये जरा जवळ, राजसे गऽ !
ये जरा जवळ, राजसे गऽ !

मी तुझा सजण सावळा
अन तुझी चांदणी कळा
चल, फिरु बरोबर, असे गऽ !

घे चंद्रकळा काजळी
हास तू फुलांआगळी
कर खरे जुने भरवसे, गऽ !

आणली तुला, मंजुळा
लाल बुंद चोळी, तिला –
बिलवरी, नितळ आरसे, गऽ !

करतील तुला सावली
हलत्या गर्द जांभळी
चमकतील मग कवडसे, गऽ !

कोवळे ह्र्दय हरघडी
फडफडून घेते उडी
हळुवार पखरु जसे, गऽ !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सखू

चढविते गळा कोवळा
जशी कोकिळा;
हरिणीस सखूचा लळा
कि पडते गळा ऽऽऽऽ जी !

कवळाच नूर लुसलुसू;
नजर देखणी;
खुलविते निरागस हसू
नितळ चांदणी ऽऽऽऽ जी !

हलताच हात : वाजते
गोठबांगडी;
लावून जीव नेसते
कि हिरवी चिडी ऽऽऽऽ जी !

लेऊन रुपेरी, निका
गोफ अन सरी,
पाहते ऊर सारखा
पोर लाजरी ऽऽऽऽ जी !

लडिवाळ हिंचे बोलणे;
चाल नाचरी;
फडफडून राघू म्हणे :
‘सखू साजरी ऽऽऽऽ जी !’


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मोटकरी

ही मोठ भरे भरभरा ;
चढे करकरा जी !
विहिरीत बघा वाकुनी
जरा धाकूनी जी !
पाण्यात लई भोवरे
फेस गरगरे जी !

अजून काम राहिलंऽ – करा !
कसून कंबर कसा जरा
थुइथुइ फिरे हा झरा
लावणी करा जी !

चौफेर बहरला मळा
खुले नवकळा, जी !
काळीत दिसे हिवरा
गहू हरबरा, जी !
लवलवति कसे नाचरे,
ओंबिचे तुरे, जी !

वरून सांजकाळ साजरा
हसे: आता चला चला घरा ;
पन धनीन है माहिरा ;
जीव घाबरा, जी !

कुठवरी धरू तर असा
तुझा भरवसा, जी !
कोवळा चढे मोकळा
राघूचा गळा, जी !
राहिला कुठे तर दूर
सखूचा नूर, जी !

सदाकदा मनास लागणी,
–हसे, बघा, वरून चांदणी,
बांधून बैल लावणी
म्हणा लावणी, जी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

उन्मनी

बाहेर गहन अंधार फार दाटला ;
पण घरात ही पुनवेची शशिकलाच तू हासली ;
बाहेर माघमासात वाळला मळा;
पण घरात हसते माझ्या तू सुंदर चाफेकळी

बाहेर मुकी झालीत रानपाखरे
पण आत म्हणत आहे हे कोवळे प्रीतीगीत तू ;
मिटवून नयन तिमिरातच निजली घरे
पण घरात हारोंहारी लावियलेस हे दीप तू

नाहीच जरी ही मूळी ढगाळी निशा
सदनात तुझ्या भुवयांचे हे इंद्रधनू नाचते
का उगाच माझ्या नुरांत चढते नशा?
तू तुझ्या मदिर नयनांनी नुसतेच जरी पाहते.

भलतीच, गडे, भरविलीस तू उन्मनी
हे अनंत जीवनधागे गुंतले तुझ्या लोचनी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मी आले लडिवाळ

“नांव सांग तव काय आणखी अंतरातला भाव,
वनांतरी शिरकांव कशाला? दूर राहिला गांव”

“मी नारीची जात आणखी धनवंताची नात:
कुळशील अन जात सोडली, जाऊ कशी नगरांत?”

“उबाळ वाटे बात : घालशी अस्मानाला हात
मिळेल का रानांत, साजणी, जिवाजिवाची जात!”

“नागिण मी बेभान : चालले कुठे तरी हे गांन?
उतावीळ हैराण धावते, कुठे केतकीपान?”

“कुणीकडे फिरणार : अशी तू कोमल आहे नार;
मंजुळवाणी फार बोलशी वीणेवरची तार!”

“वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!

करू नको नाराज, उदारा, कळे न का आवाज?
भूल पडे का आज जीवाला; जुनाच आहे साज”

“अधीर उडतो ऊर सारखा, मनी उठे काहूर :
हा मैनेचा सूर वाटतो अन चंद्राचा नूर”

“उदास कासावीस हिंडते – उदास कासावीस :
ओळखले नाहीस काय रे, अरे तीच मी – तीच!

वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!”


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

किशोरी

कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

कलशाशी कुजबुजले कंकण
‘किणकिण किणकिण रुणझुण रुणझुण’
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

चरणगतीत तुझ्या चंचलता
मधुर-रहस्य-भरित आतुरता
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

गहन-गूढ-मधुभाव-संगिनी
गहन-तिमिरगत चारुरूपिणी
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

अंधारावर झाली भवती
तरलित पदसादांची भरती
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

स्वप्नतरल ह्रदयातच या पण
का केलेस सताल पदार्पण
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कधी व्हायचे मीलन?

कुठवर पाहू आता वरी आकाश चांदण्याचे जाले,
आकाश काळे काळे?

काय पाहू आता खाली भूमी प्रस्तर पाषाणी
सागराचे पाणी पाणी?

आसमंत हासे खेळे : भासे निरार्थ पसारा :
जीव झाला वारावारा

सापडेना वाट कोठे : हारवले देहभान
उदासले माळरान

भावनेच्या परागांनी लिहियेली गूढ गाणी
अंतराच्या पानोपानी

आता भागले हे डोळे : भवताली काळी रात :
कुठे पाहू अंधारात?

काय नाही दयामाया? माझे जाळसी जीवन :
कधी व्हायचे मीलन?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

या रामपहारी

तू हळूच येतो, चंद्रा माझ्या मागंऽ !
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं

हे पाठीमागं तुझंच हसरं बिंब
अन समोर माझी पिशी साउली लांब

या समोर गायी उभ्या गावकोसात
हे ढवळे ढवळे ढग वरले हसतात

या रामपहारी गारच आहे वारा
वर कलला हारा : पाझरते जलधारा

मी अधीर झाले : घरी निघाले जाया
ही गारठली रे, कोमल माझी काया!

हे माघामधलं हीव : थरकते अंग
हुरहुर वाटते कुणीच नाही संग

पण हसतो का तू मनात आले पाप?
मी नवती नारी : बघ सुटला थरकाप

अन नकोस हासू चंद्रा माझ्या मागं
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ