गणेश चतुर्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गणेश चतुर्थी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

।। श्री गणेश सम्पूर्ण पूजाविधी ।।


श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !
कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव' हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे', या भावानेच सर्व उपचार करावेत.

१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.

१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम, ३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो, ६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग, ३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी १ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली १ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती १ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग, ४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)


१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे


१ इ १. पूजास्थळाची शुद्धी

अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.

१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे

१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.'

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।' हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे', असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि' असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।


३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा

।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:' हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे. १. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:' या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. ४. श्री गोविंदाय नम: । पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत. ५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: । २०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।। पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.

देवतास्मरण : श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।

देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल' म्हणावा. श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा. `तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।। संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.
श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.

ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो. श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।

आवाहन :
उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.) `श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।'

आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।। चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि' हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत. श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.) उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे. प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' अशा प्रकारे म्हणतात.) हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे. श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।

अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने. यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्' हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे. अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।

श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो' म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।' असे म्हणावे.

कलशपूजन गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.

शंखपूजा शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।। अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.

घंटापूजा आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।। अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो. घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

दीपपूजा भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)

मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि' या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे. मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.

पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा

प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे', असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत. अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप - प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.) अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।। नंतर `परमात्मने नम: ।' असे १५ वेळा म्हणावे.

ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.
(टीप - हा मंत्र वेदोक्‍त आहे. ) एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.) आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.

२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना देवांच्या चरणी वहा. विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।

३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।

४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि' म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा. रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात. राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर. उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर. श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.) श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)

१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.
अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो. महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे. श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात. श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर) श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर) श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर) पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि' असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर) श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा) श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति) यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: । आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।। भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा. नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे. नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। फुलाला गंध लावून देवाला वहावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। यानंतर आरती करून कापूरारती करावी.

पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा. नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।। सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी. यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् । तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।। दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.) दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।' असे म्हणावे. श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: । श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।। नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी. गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।। विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।। श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी. अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.) प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे. विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।। यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।' असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी')

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते.त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते.


महत्व :

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे.दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते,तर गणेशोत्सवामधील दीड दिवसांत ते १००० पटीहून अधिक कार्यरत असते.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी
‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’,
असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला
‘ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या ।
वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा ।।’
याप्रमाणे वंदन केले आहे.
संत नामदेवांनी
‘लंबरोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।’,
असे म्हटले आहे.


प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व(वरची) आणि अधर(खालची) अशा दोन दिशा. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात.


प्राणशक्ति वाढविणारा

मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या निरनिराळ्या शक्तींच्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हणतात. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ति वाढविणारा आहे.


श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे.
‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’


पूजेत डाव्या सोंडेचा गणपति का ठेवावा ?

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्तीशाली व जागृत आहे, असे म्हटले जाते.याउलट डाव्या सोंडेचा गणपति शीतल व अध्यात्माला पूरक असतो, याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.

श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावित ?

दुर्वांमध्ये श्रीगणेशाचे तत्त्व जास्तीतजास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्याने मूर्तीत मोठ्या प्रमाणावर गणेशाची शक्ती जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ मूर्ती जागृत होते. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे; गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.

मोदक
अ. 'मोद' म्हणजे आनंद व 'क' म्हणजे भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग.
मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' या ब्रह्यरध्रांतील पोकळी सारखा असतो.
कुंडलिनी 'ख' पर्यंत पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे
आनंद प्रदान करणारी शक्ती.

आ. 'मोदक' हे ज्ञानाचे प्रतिक आहे; म्हणून त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान
प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू
लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे
प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.


आरती अन् नामजप

गणेश चतुर्थीच्या काळात आरती म्हणणे म्हणजे कर्णकर्कश्य आवाजात ती म्हणणे, असे जणू समीकरणच झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष भगवान श्री गणेशासमारे उभे आरती आपण आरती म्हणत आहोत असा भाव ठेवून भावपूर्ण आणि आर्ततेने आरती म्हटली पाहिजे. तर तिचा लाभ होतो. खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशाच नामजप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो.