दिसेना, आंधळ्यावाणी किती पाहू तरी चौफेर !
जराही स्पर्श होईना, किती घ्यावे तरी मी फेर
पुरे हा छंद, कानोसा कितीदा हरघडी घ्यावा
किती मारू तूला हाका, नको राहू असे बाहेर
मनःसंवेद्य ऐकावे किती हे पंचरंगी सूर!
किती शोधू तरी आता, कळेना हा कुणाचा हूर
उसासे मी किती टाकू ? किती होऊ तरी कष्टी
अघोरी, उष्ण अश्रूंचा निघाला पावसाळी पूर
निळ्या दिग्वर्तुळामध्ये, परत्री अंतराळी दूर -
निघाला चंद्र चंदेरी, उडाला चांदण्यांचा चूर
असे मी पाहिले तेव्हा मला झाला तुझा आभास
वृथा मी पाहिले झाली पुन्हा जागी जुनी हुरहूर!
विझाव्या का बरे आता नभाच्या तेवत्या वाती?
सुचेना मार्ग काहीही ढगाळी आंधळ्या राती
अरेरे हा असा आला तुफानी, उग्र झंझावात
कसे मी आवरू तारू? सुकाणू घे तुझ्या हाती
इथे कोणी पिता-पुत्रे, कुणी आजा, कुणी नातू
कुणी मामा, कुणी भाचा, निराळा मी, निराळा तू
दुरावे हे किती सोसू जगाचे हरघडी आता
इथे या शांत एकांती जीवाला दे जिव्हाळा तू
नको जाऊ, जरी आहे खरी सारी तुझी शंका
चुकीचा, त्याज्य, बेपारी, पहा, आहे तुझा हेका
दिवाण्या, श्रांत चित्ताला जरी केव्हा चुकूनमाकून -
जराशी विस्मृती झाली, तरी तू विस्मरावे का ?
निशेने व्यापिली सारी धरित्री मंत्रामोहाने
पहा, झोपी कसे गेले, सुखात्मे, या दिशा, राने!
उदासी शून्य ही माझी निराशा जागृती आता
हसवी मुग्ध, मायावी, तुझ्या निःशब्द हास्याने
किती मी या झळा सोसू? उन्हाळा उष्ण आहे फार
निवाराही कुठे नाही, कुणी नाही मला आधार
पुढे आता कसा हिंडू? कुठे आहे तरी सिंधू?
कशाने सर्व जन्मांची अघोरी ही तृषा जाणार?
कवी -
ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह -
शीळ