पिकले पान

पद्य मजला येईल करू जाता,
त्यात ओतू मी काव्य कसे आता ?

अंगि नुरता निर्माणशक्ति लेश
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

स्फूर्तिशक्तीचा होय लुप्त 'मंत्र'
तिथे झाले विकलांग वहन 'यंत्र'

'तंत्र' विस्मरलो, होय मी उदास !
कसा यावा भर काव्यकौमुदीस ?

एक नैसर्गिम जन्म सर्वमान्य,
अन्य होतो संस्कारकर्मजन्य

छटा यांच्या होता न एकजीव
काव्यसौंदर्यी भासते उणीव !

काव्यदेवी देउळी गर्भभागी
शिरू शकलो मी ना कधी अभागी !

मुखश्रीचे, एकान्त-दर्शनाचे
सुख स्वप्नांतहि ते न मिळायाचे

भाग्य नसता मज रसिकरंजनाचे
कसे काढू उद्‌गार धन्यतेचे ?

कुणा सांगू या कर्मकहाणील ?
मला वाटे हा जन्म फुकट गेला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

गाविलगड

सातपुडा जवळीच बोडखे वर डोंगर घाट,

खालते जंगल मोकाट.

इतस्तता पसरुनी भरारा उंचविती माथे

आक्रमशील सकळ येथे.

पहा वृक्ष-वेली की, खग-पशु-कीटकगण सारा.

सदा संनद्ध प्रतिकारा,

मुक्तछंदलीलेचे निष्टुर शासनविधिलेख

निसर्गी जीवनीहि एक.

मंगलोग्र शक्तींचा गिरिवर सदा सिद्ध मेळा

जीवनमरणाच्या खेळा.

विरुद्धेहि एकत्र नांदवी सत्तेचा व्याप

भयानक तिचे आद्यरूप.

जीवसृष्टि जीवनात तेची रूपबिंब नाचे

जणू ते चलत्‌चित्र तीचे.

द्वितीय पुरुष न जाणिव येथे प्रथमाचा थाट

जिवाचा तो पहिला पाठ.

द्वितीयतेची जाणिव मुकुरित होता ते ज्ञान

सृष्टिचे पहिले बलिदान.

समष्टीत तद्विकास व्हावा विस्तारित अझुनी

युगे किति जातिल की निघुनी !

साध्य न हे तोवरी अवश्यचि जीवितरणकर्म

घोर तरि तो मानवधर्म

विश्वपुरुष हा विश्वाहितास्तव त्रिगुणात्मक कुंडी

पाशवी-अंश-हवन मांडी.

त्याग आणि उत्सर्ग समुत्कट उद्दीपित करिती

महत्तम अंतर्हित शक्ति.

ती आत्मोन्नति, संस्कृति ती, ती मानवता विहित

अल्पतर तामसपण जीत.

संस्कारशील संस्कृति वदशी तू सर्व भ्रममूल

मना ! मग तूहि एक भूल.

तर्कवितर्कात्मक बुद्धीचे अति अस्थिर तेज

बुद्धिची श्रद्धा ही शेज.

जाणु शके ती शक्ति वाळल्या मात्र लाकडाची.

न जाणे शाद्वल हरळीची.

प्रचंड चाले स्थूलान्तरि तो व्यापार न विदित

मनुजमतिगति परिमित अमित.

ज्ञान सरुनि संस्कार उरे ते तेवढेच तूझे

बाकी भारभूत ओझे.

समवाय संस्कृति संस्कारांचा तदनुसार शील

जिणे तिजविण बाष्कळ खूळ.

क्षितिजाच्या कंकणी ललित लघु तारा जणु विमल

वेलिच्या पालवीत फूल.

तसे गाव एक हे नदीच्या वाकणात्राहे

पाणी बारमास वाहे.

विभुत्व गिरिचे अखंड पुरवी नवजीवन तीस

खळाळे म्हणुनि समुल्हास

कडेवर टेकडी सतीचे रम्य स्थळ परम

साभिमुख भैरव बलभीम.

खडा असे सन्मुख 'गाविलगड' साहत तप करिता

आतप-हिम-वर्षा-वाता.

दिसे अस्थिपंजर केवळ तो उरे प्राण कंठी

आर्त गतवैभवार्थ पोटी.

पूर नदीचे येती पायी लोटांगण घेती

निरामय मळ टाकुनि होती.

रिघ-निघ चाले, उधळण चाले हळदकुंकवाची

गर्दी होते नवसांची.

देती नेणत सद्‌भावांचे दृढतर संस्कार

सतीचे ते जयजयकार.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

दोन 'मी'

१.

मज सर्वाज्ञा कळे न त्याला एक शिवी मी हासडतो,

'शतपाता' चा कलाभिज्ञ मी आग तयावर पाखडतो.

डोके लढवुनि पैका कमवी का मज म्हणता 'पोटभरू'?

खाल तुपाशी आणि उपाशी काय एकटा मीच मरू?

'माल गधोका अकलमंदका खुराक' हे आपण करिता,

गाल्या मजला का देता हे सत्यव्रत मी आचरिता ?

पुढे पुढे ते जाती त्यांना टांग ओढुनी पाडितसे,

पुरुषार्थाची, कृतार्थतेची सिद्धि याविना अन्य नसे !

मात्र तुम्हाला मते असावी, नकोत मज काही काय ?

'गाड मनी ती' मला सांगता, घोर होतसे अन्याय !

"हिंदुस्थाना रशिया बनवा"- महायुद्ध सांगे वर्म

'प्रथम भेद मग छेद भयंकर' हाच आमचा कुळधर्म !

२.

विशालतेतिल भिन्नत्वातिल एकसूत्रपण अव्यंग

कळोनि आहे आणायाचे वर्तनांत ते सर्वांग.

सुधारणा पाहता आजची आपणास हे स्पष्ट दिसे

पाशवता परिपूर्ण आतली उफाळुनि वर येत असे.

अणु परिमाणू रेणु आणि तिस्रेणुवर वर्चस्व दिसे

हा बुद्धीचा विकास, पण तो मानवतेचा खास नसे !

बुद्धीचा तर विकास येतो राक्षसातही आढळुन

मनुष्यत्व राक्षसास देणे आर्यधर्म हा सनातन.

उत्पत्ति, स्थिति तसाच लय हा सृष्टीचा क्रममार्ग असे

महन्मंगला चिच्छक्तीचा हा तर परमोल्हास दिसे.

३.

संस्कृति म्हणजे जीवनसरणी वेगवेगळ्या त्या असती

विशेषता तीतलि आपली दक्षपणे या रक्षू ती.

संस्कृती परकायांची करणे अकस्मात हे शक्य नसे,

अंगलगट करु नका तिच्याशी त्यात आपला घात असे.

जीवन-संजीवनी त्याग ही राष्ट्र असो संपन्न नसो

ना तरि त्याचा विनाश मनि हे अक्षयतेचे तत्त्व ठसो.

देश असो माझा मी त्याचा सर्वस्वार्पण करीन मी

निर्वाणही कधी न होइन देशाचा बेमानहरामी.

भारतास भूषण विश्वाचे करण्याचा निर्धार धरू

देशहितास्तव जगू, नाहि तर प्राणांचा उत्सर्ग करू !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

स्वैर गीत

अयि स्वैरते ! गाइं गीत तू, मतवाली तू, तू अतुला,

विषयांची निर्मात्री ती तू, विषय कोणता देउ तुला ?

"स्वैर पाखरे विचरति वरती, स्वैर फिरे वनवायु वरी;

कृष्ण मेघमंडळ प्रकाशुनि मुक्त तेज संचार करी.

स्वतंत्रतेचा अर्णव फेकी स्वतंत्र लहरीवरी लहरी

जनसंमर्दा स्नात करोनी सौभाग्याचा + सेस भरी.

पूर लोटला उत्साहाचा उसळत महितळ सकळ भरी,

ऊठ, होय जागृत बसलासी काय उगा तू स्वस्थ घरी ?

प्रतिभेच्या आरशात पडते निसर्गछाया मनोहर,

वाङ्मयतप कर; प्रसन्न होइल प्रतिभादेवी निरंतर.

भेसुरतेला सांग मराठा भ्याला केव्हा काय तरी ?

वाङ्मयगंगा खाली नेउनि सहस्त्रायुधे देइ करी.

प्रणयपंकजासवे खेळणे आता तरि तू पुरे करी

नियमांचे परिपालन सरले जाय कराया मुलुखगिरी

यशोगान-दुंदुभी नादवुनि नेई त्याला दिगंतरी

ज्योत जागती करी धरोनी दीपस्तंभ उभारि वरी !"

बाइ स्वैरते ! स्वैर धावसी धावू मागे कोठवरी ?

दमलो ! 'लेखन-कामाठी' मी आता सारी पुरे करी.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

भारतीय जीवन

१.

जीवामात्रामधे राहे एक शक्ति अपार्थिव

जड सूक्ष्मेंद्रियद्वारा हो तिचा व्यक्त संभव.

क्रियाशक्तिस्वरूपाने अनेकविध जो घडे-

व्यवहार तयालागी 'कर्म' ही अभिधा पडे.

व्यक्तिकर्मप्रवाहाचे वाहणे तेच 'जीवन'

स्थली एकीच हो त्याचे जन्म आणि विसर्जन.

'चैतन्य' म्हणती त्याते सर्व विश्वास निर्मुनी

स्वभावचि असे त्याचा रहावे त्यात व्यापुनी.

सर्वव्यापक तत्त्वा या नावे बहुत ठेविती-

'जगज्ज्योति' 'अंतरात्मा' 'जगज्जीवन' बोलती

विभूती त्यांतुनी येती; जाती आम्हास देउन

ज्ञानतेजे समायुक्त विकासमय जीवन.

भारताचा असे मोठा विस्तार तरि आपणा

महाराष्ट्रप्रतीकाने करू येतेच अर्चना.

प्रतिमापूजने होती ईश्वराप्रति अर्पण

महाराष्ट्रमिषाने हो भारताचेच पूजन.

विपन्नकाली देशाच्या अग्रभागी सदा स्थित

राहिला हा महाराष्ट्र, आज राहिल निश्चित.

२.

एकान्तात महत्कार्ये स्फूर्ति-पूर्तीस पावती

राष्ट्रोदय नवे होती सूज्ञ सर्वत्र बोलती.

एकान्तात बसू जाता अन्य संकल्प सोडुनी

विचारांचे, विकारांचे काहूर उठते मनी.

विवेकभ्रष्ट तत्त्वांचा बडिवार विवादती;

तत्त्वे ती असती कोणासाठी हे ते न पाहती !

व्यावहारिक तत्त्वे ती सापेक्ष असती सदा,

भिन्नावस्थेत कामाला तेज ते ये न सर्वदा.

देशकार्यी तत्पराते निंदिती उत्तरोत्तर

कृतीच्या शून्य नावाने शब्दगुंड घरोघर !

स्वदेशाच्या गौरवात आपला होय गौरव

यातना, हाल जे त्याचे, आपला तोच रौरव !

शक्तीचे वसतिस्थान अंतःकरण केवळ.

पवित्र जीवनाधारे कर्मे होतात सोज्वळ.

सुखाची वर्णित स्वप्ने भ्रांत चित्ते सदोदित

सत्यसृष्टीत येती का ? व्हावे कार्यास उद्यत !

स्वतंत्राची देशवाची देशवैभव गर्जते

पराधीने स्वदेशचे रचावे स्तोत्र कोणते ?

जाणत्याने सदा व्हावे यत्‍नसाहसतत्पर

सिद्धिदाता होत आला सत्यसंकल्प ईश्वर !

शक्तीच्या चालका रामा ! पुरवी मनकामना

'सत्यं-शिवं'सुंदरम्' दे आनंदवनभुवना !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

अध्यात्म

अध्यातमशास्त्र म्हणती तरि ते कशाला ?

त्याचे प्रयोजन कळे नच जाणत्याला!

हे शास्त्र काय ? न दिसे उपयोग त्याचा-

हा तो विकल्प दिसतो कविकल्पनेचा !

जे का विचार करिते जड भौतिकाचा

ते मात्र शास्त्र म्हणणे अविचार साचा !

जे दे अचेतन अणुप्रति चेतनेते

ते नित्य तत्त्व कळणे अनिवार्य होते !

ते तत्त्व निर्णय करी जड शोधनाने,

संशोधिला सकलही व्यवहार त्याने,

अध्यात्म मानस तथा व्यवहारसार

एकत्र यात मजला दिसतो विचार.

यानेच शुद्धतर हा व्यवहार केला

यानेच व्यापकपणा दिधला तुम्हाला.

पूर्वेतिहास पढता पटते मनाला

देइल वैभव पुन्हा नवभारताला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

रगडनी ( मळणी )

केला पीकाचा रे सांठा

जपीसन सर्व्याआधीं

शेत शिवाराचं धन

आतां आलं खयामधीं

खय झालं रे तैयार

सम्दी भूई सारवली

मधी उभारलं मेढ

पात बैलाची चालली

आतां चाल चाल बैला,

पात चाले गरगर

तसे कनूसामधून

दाने येती भरभर

आतां चाल चाल बैला,

आतां चाल भिरभिरा

व्हऊं दे रे कनुसाचा

तुझ्या खुराखाले चुरा

पाय उचल रे बैला,

कर बापा आतां घाई

चालूं दे रे रगडनं

तुझ्या पायाची पुन्याई !

पाय उचलरे बैला,

कनूसाचा कर भूसा

दाने एका एकांतून

पडतील पसा पसा

आतां चाल चाल बैला,

पुढें आली उपननी

वारा चालली रे वाया,

कसा ठेवू मी धरूनी

पात सरली सरली

रगडनी सुरूं झाली

आतां करूं उपननी

झट तिव्हार मांडली

आतां सोडी देल्ही पात

बैलं गेले चार्‍यावरी

डोयापुढें उपननी

जीव माझा वार्‍यावरी

रगडनी रगडनी

देवा, तुझीरे घडनी

दैवा तुझी झगडनी

माझी डोये उघडनी !


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

आठवण

१.

ऊन उतरते होते, वारा पडला होता बंदी

दिशादिशांच्या नेत्री भरली होती मादक धुंदी.

नेती जिकडे पाय मागुनी शरीर तिकडे जाते

शून्यत्वाचा अभाव उघडे डोळे पाहत होते.

मंदावत पाउले चालली खिन्न मनाच्या भारे

तीव्र भाव हो जसा मंदतर अवास्तविक विस्तारे.

मूर्तिमंत रूक्षता वावरे अफाट त्या मैदानी

उडता जीव न दिसला एकहि ध्वनि नच पडला कानी !

रिता एकटेपणा जगी या भीषणतर भारी

साक्षात्कारी अनुभविली मी मारकता ती सारी !

२.

काळी तरुराजी क्षितिजावर दिसली त्या अवकाळी

हरिणीच्या नेत्रातिल जणु का काजळरेषा काळी !

उडती दुनिया दिसू लागली रानी गजबज झाली

स्वर्णरसाने सारवलेली शेते पिवळी पिवळी.

बंदीतुन वाराही सुटला मुक्त खगासम भिरभिरला.

झाडेझुडपे डोलु लागली उत्सव तृणपर्णी भरला.

वार्‍यावरुनी अवचित आल्या गीतसुधेच्या धारा

चित्तमोर नाचला आपला उघडुनि पूर्ण पिसारा.

स्त्रीकंठातिल होते ध्वनि ते भाव न ये निर्धारा

शेलेचा चंडोल गाय की गिरिधर नागर मीरा !

ओसरते हो गीत चालले अपूर्व त्यातिल गोडी

मिळे नृत्यगतिशीलांची त्या संगीताला जोडी.

रूपराशि उर्वशी वाटले स्वर्गातिल सुकुमारा

भरूनि हाती शुद्ध चांदणे करीत होती मारा !

होता आठव अंतःकरणी ते गीतस्वर भरती

ह्रदय नाचते नृत्यगतीच्या अविरत तालावरती.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

एक दृश्य

विदर्भात डोंगरात आहे गाव नाव बुलठाणे

वनलक्ष्मीच्या शृंगाराचे एक अमोलिक लेणे !

गावाच्या उत्तरेस आहे जवळचि डोंगर मोठा

द्वारपाळ हा कडा पहारा देउनि रक्षी वाटा !

तिकडे वस्तीपासुनि लागे उतरण काही थोडी

चढत लागते पुढे जराशी जाया उंच पहाडी.

त्या उंचावर आहे मोठा एक कडा तुटलेला

दृष्टि देखणी एकवटे ती शोभा निरखायाला

पायाखाली उंच कड्याच्या गोलाकार दरी ती

पश्चिमेस मुख करुनि दूरवर घसरत गेली होती.

सायंकाळी एके दिवशी नित्याच्या परिपाठी.

सहज निघालो व्यवसायाच्या श्रमपरिहारासाठी.

त्या रमणीय स्थळी पातलो, जाउनि वरती बसलो

सृष्टीचे ते दृश्य पाहता विसरुनि मज मी गेलो !

सूर्यबिंब सारखे धावते अस्तगिरीच्या संगा

निजैश्वर्यरंगे अभिषेकी ज्योतिर्मय महिलिंगा !

रविबिंबाचे रूप घेउनी वाटे की, अनुरागे

नील नभाची, धवल घनांची रंजित केली अंगे !

रक्तवर्ण पर्वती रंगि त्या वस्तुजात रंगे

शुचिर्भूतही तसाच होई त्यांच्या अनुषंगे.

दृष्टिपथी ये एकाएकी दरीवरिल आकाशी

ताम्रछटामिश्रित रंगाचा एक कृष्ण पक्षी.

आला कोठुनि कळले नाही निज गति कुंठित करुनी

पक्षद्वय निज पसरुनि सुस्थिर राहे निश्चल गगनी !

दृष्टि करुनि एकाग्र नेहटुनि पाहे रविबिंबासी

व्रताचरण करितसे उग्रतर काय विहग वनवासी ?

चलित स्थिति होता त्याची तो एक घेउनी गिरकी

तीव्र चिरत्कारे स्थिर होउनि बिंब पुन्हा अवलोकी.

नवलाचे ते दृश्य पाहता वेध लागला चित्ता

चाहुल नसता एकाएकी प्राप्त होय तन्मयता !

तन्मयता ती चिंत्य वस्तुच्या खोल अंतरी शिरते

बहिरंगाच्या वरते नुसते फेर घालित नसते !

मला वाटले, झेप घेउनी उंच नभाच्या भागी

पक्षी लोपुनि खरोखर स्थिर झालो त्याचे जागी !

पृथ्वीवर जड शरीर सोडुनि झालो गगनविहारी

त्या पक्षासम करू लागलो त्याची अनुकृति सारी.

व्हावे स्थिर मग गिरकी घ्यावी, रक्तबिंब लक्षावे,

असे चालले किती वेळ ते नाही मजला ठावे !

अज्ञानातुनि पक्षी आला, गेला; मीहि निघालो

पद न लागता भूमीला मी वरवर चालत आलो !

शरीरात असती तत्त्वे का जी जाणिव घेवोनी

अंतराळमार्गाने जाती त्वरित इच्छिल्या स्थानी ?

विचार करिता प्रश्न सुटेना, हुरहुर चित्ती लागे

झोपेतही तेजाळ दृश्य ते लागे माझ्या मागे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रीति

अवश्य कर प्रीति तू सहज धर्म हा वागतो

परी समज अंतरी बिकट चालता मार्ग तो !

परस्परि न राहती समसमान आकर्षणे

तरी विरस मानसी विषम चालती घर्षणे !

असे कुटिल प्रीति जी श्रुतिमनोहरा रागिणी

दिसो रुचिर ती असे गरलधारिणी नागिणी

असे द्विविध प्रीति ती - मलिन भोगकामाकुला,

तशीच दुसरी उषेसम असे महन्मंगला !

अशीच कर प्रीति जी सुपथदीपिका जीवनी

गृही सुखद होतसे तशिच श्रृंखलावंधनी !

समग्र पुरुषार्थ दे सुयश-कीर्ति, दे श्रेयसे

तसे शिकवि उज्ज्वलास्तव तुला मरावे कसे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

रूपमुग्धा

सौंदर्याचा लीलासागर लागे हालायाला

निज लावण्योदक देखावे-इच्छा झाली त्याला.

प्रतिबिंबित आपल्या पहावी सृष्टीची व्यभिशोभा

प्रबल ओढ ही रूपसागरा त्या चढवी प्रक्षोभा.

स्वयंप्रभा अवलोकायाची जरि आवड हो त्याला

'दुजे' करुनि लागते पहावे त्याही अप्रतिमाला !

पुढे आरसा ठेवुनि बसली नवबाला एकान्ती

प्रकाश पाडित होत्या तेथे उज्ज्वल दीपज्योति.

असामान्य सौंदर्य कसे ते ज्या जग हे वाखाणी

देखायाते इच्छित होती रूपगुणाची खाणी.

स्वच्छ आरशाच्या भूमीवर प्रतिमा बिंबित झाली

लावण्याच्या कोवळिकेवर पोरचि मोहुनि गेली !

मंत्रबळे मांत्रिके करावे मंत्रबद्ध इतराला

तो संमोहनमंत्र उलटला, स्वयं बांधला गेला !

मूर्ति मनी संकल्पे होती काय उभी, अभिरामे ?

ह्रदयाचे सिंहासन बघता दिसते शुद्ध रिकामे !

वस्तूच्या निरपेक्ष असे जे भावरूप सौंदर्य

काय चालले असे तयाचे हे तव चिंतनकार्य ?

करी कल्पना सौंदर्याची सुहास्य जे अव्याज

सुरम्यतेचा तेच चढविते त्या वस्तूवरि साज.

तिरस्कार कधि प्रेम, रुष्टता कधि आकुलता, कोप

उमटुनि ते अनुरूप चालती अंगाचे विक्षेप.

ओष्ठ, भ्रू, कर कधी मोडिशी, स्थिर कधि चंचल दृष्टि

क्षणोक्षणी निर्मिशी विलक्षण नूतन अभिनयसृष्टि !

रंगविकारांचे उमटुनि हो तव सुतनूवरि मेळ

संगे त्यांच्या खेळतेस का तू हा अद्‍भुत खेळ ?

नेत्रातिल तेजाची कलिका इकडे तिकडे नाचे

जीवभाव एकत्र होउनी त्या त्या ठायी साचे.

सभोवार तेजाची निर्मळ चादर पसरत जाते

जीव उडी घे त्या मृदु शय्येवरती लोळायाते.

प्रसन्नतेचा प्रशान्त शीतल तेजोनिधि कोंदाटे

जीव सारखा पोहत डुंबत राहो त्यांतचि वाटे !

सूक्ष्म नेत्रकिरणांते घेउनि विणले वस्त्र नवीन

"मोल काय ते सांग" - पुसाया सौदागर तरि कोण ?

सौंदर्याच्या या स्फुरणाते पाहुनि प्रत्यक्षाते

साहित्यातील रसभावांचे व्यर्थ प्रदर्शन होते !

फुटे आरसा, स्वप्न उडाले स्पष्ट वाजता 'खट्ट'

मुक्तांगावर स्खलित पदर घे सावरूनि ती घट्ट !

सभोवार भयचकित लोचने पहात उठली पटकन्‌

रागात्मक भावाचे तुटले नाजुक सूत्रह तट्‌कम्‌ !

जन्मा येउनि एकवेळ हा पर्वकाळ साधावा

पूर्णोदय 'नारीतत्वाचा' भाग्ये अवलोकावा !

रसास्वादनाचित विषयांचे केवळ करिता येते-

स्वसंवेद्य आस्वादन; तेथे वाचा स्तंभित होते !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

प्रतिमाभंग

ज्यांनी भारतपुण्यभूमिवरती फोडोनिया डोंगर

लेणी निर्मुनि दाविले निज कलानैपुण्य लोकोत्तर;

वज्रप्राय कठोर भेदुनि महायत्‍ने शिलाप्रस्तर

तो कैलास अगम्य आणुनि दिला आम्हास पृथ्वीवर !

ज्यांनी मूर्ति अनेक निर्मुनि नव्या रंगावली रेखिल्या,

ज्यांच्या पाहुनि त्या कलाकृति जगे सोत्कंठ वाखाणिल्या;

हा नेत्रोत्सव पाहण्यास जमले ते तृप्त झाले जन

धीरोदात विभुत्व, ते परतले, तेथील संपादुन.

त्यांनी मूर्ति अनेक यत्‍न करूनी होत्या श्रमे निर्मिल्या

गर्वोन्माद भरात नीच यवने येवोनि त्या भंगिल्या !

हा विध्वंस समोर एक, दुसरे अद्यापिही चालता -

राष्ट्रात्मा खवळोनि जाय न कसा विच्छेद हे साहता !

प्रज्ञावंत विचारशील असती आम्हात जे संस्थित

साक्षेपे म्हणती समस्त विसरा ही दुष्टता सांप्रत.

सारे यद्यपि शान्तिपाठ पढतो सप्रेम येथे सदा

आहो मानव हे कसे विसरता आम्हास येते, वदा ?

ज्या सन्मूर्तिवरी मनोविहग हा फेरे असे घालित

ते अत्यंत सखोल वाच्य करिता येते कसे ह्रद्गत ?

कोणी निष्ठुर येउनी जरि तिला भंगोनि टाकीतसे

या निर्माल्य जगात, राहुनि अशा, त्याने जगावे कसे ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

पत्री समर्पण

श्रीराम

अनंत आई झगडे मनात
उसंत ना संतत चालतात
किती निराश किति थोर आशा
किती मनी चालतसे तमाशा।।

कसे तुला दावु समस्त माते
अशक्य ते या दुबळ्या मुलाते
परी कळावी तुज मन्मनाची
स्थिती, अशी आस तुझ्या मुलाची।।

म्हणून जो हा हृदयात सिंधु
उचंबळे, त्यातिल एक बिंदु
समर्पितो ठेवून नाम पत्री
तुझ्या महोदर पदी पवित्री।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, २८-२-२५

हृदय मदीय तव सिंहासन होवो

हृदय मदीय तव सिंहासन होवो।।
अभिनवतम रमणीया गुणनिधान
मूर्ति तुझी विलसत राहो।।हृदय....।।।

दंभ दर्प काम क्रोध
बहु करिती विरोध
उपजे न ज्ञानबोध
तिमिर सकल जावो।।हृदय....।।।

भक्तिभाव-गंधाची
सद्विचार-सुमनांची
मंगलमय-गानांची
पूजा तुज पावो।।हृदय....।।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- अमळनेर, १९२६

मजवर कृपा करावी

प्रभुवर मजवर कृपा करावी
मतिमलिनता हरावी माझी।। मजवर....।।

भरो प्रेम अंतरंगी
जडो जीव संतसंगी
मम अहंता गळावी सारी ।। मजवर....।।

नुरो तम अता समीप
जळो हृदयी ज्ञानदीप
मति तव पदी जडावी माझी।। मजवर....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

एक किरण

एक किरण मज देई
केवळ एक किरण मज देई।।

कोटी रवि-शशि
तू पेटविशी
विश्वमंदिरी पाही
परि मम हृदयी
तिमिर सदाही
श्रमुनी जीव मम जाई।। एक....।।

किती कृमि-कीटक
रोगोत्पादक
बुजबुजाटा जणू होई
दे सौभाग्या
दे आरोग्या
तम मम विलया नेई।। एक....।।

मी धडपडतो
मी ओरडतो
कोणि न धावो भाई
आस तुझी मम
हरि झडकारि तम
मुळी न सुचे मज काही।। एक....।।

एक किरण ना
मागे फार
एक किरण शुभ
देऊन तार
प्रणति तुझ्या शुभ पायी
तेज:सिंधो!
प्रकाशबिंदु
दे, होईन उतराई।। एक....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, सप्टेंबर १९३४

माझी बुडत आज होडी

माझी बुडत आज होडी
मज कर धरून काढी।। माझी....।।

तुफान झाला सागर सारा
मज सभोती वेढी।। माझी....।।

लोटितील मज भीषण लाटा
खचित मृत्यु-तोंडी।। माझी....।।

शांत करी रे तुफान दर्या
काळमुखी न वाढी।। माझी....।।

अपराध तुझे रचिले कोटी
परि धरी न आढी।। माझी....।।

पुनरपि माते राहीन जपूनी
करीन कधी न खोडी।। माझी....।।

रागावली जरी माय मुलावरी
संकटी न सोडी।। माझी....।।

ये करुणाकर ये मुरलीधर
हात धरुनी ओढी।। माझी....।।

किती झाले तरी मूल तुझे मी
प्रेम कधी न तोडी।। माझी....।।

इतर कुणी ते धावान येतील
आस अशी न थोडी।। माझी....।।

बाळ तुझा हा होऊन हतमद 
हाक तुजसि फोडी।। माझी....।।

आजपासुनी तव करि राया
सोपवीन होडी।। माझी....।।

मुरली वाजव सागर शांतव
वादळास मोडी।। माझी....।।

मुरली वाजव, वादळ लाजव
दाव गीतगोडी।। माझी....।।

जीवन तव पदी वाहून बालक
हात तात! जोडी।। माझी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

अति आनंद हृदयी भरला

अति आनंद हृदयी भरला
प्रियकर प्रभु मम हृदयी आला
शोक पळाला
खेद गळाला
पापताप दूरी झाला।।अति....।।

मम तनमनधन
मम हे जीवन
अर्पिन पदकमला।।अति....।।

चिंता सरली
भीती नुरली
त्रास सकळ सरला।।अति....।।

प्रेमरज्जुने
प्रभुला धरणे
जाईन मग कुठला।।अति....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मम जीवन हरिमय होऊ दे!

मम जीवन हरिमय होऊ दे
हरिमय होवो
प्रभुमय होवो
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।

रुसेन हरिशी
हसेन हरिशी
हरिभजनी मज रंगू दे।। मम....।।

गाईन हरिला
ध्याइन हरिला
भवसागर मज लंघू दे।। मम....।।

हरिनामाचा
पावक साचा
अघवन घन मम जळू दे।। मम....।।

हेत हरीचे
बेत हरीचे
सकल कृतींतून दावू दे।। मम....।।

वेड सुखाचे
लागो हरिचे
हरिशी मिळून मज जाऊ दे।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, जून १९३४

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी

मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी।।
अगतिक निशिदीन
मजलागि वाटे
सदा दीन या लोचनी येई पाणी।। मजला....।।

मम कार्य जगी काय
न कळे मला हाय
स्थिती तात ही होत केविलवाणी।। मजला....।।

असेल जिणे भार
वाटे मला फार
जणू देई पाठीवरी कोणी गोणी।। मजला....।।

देवा दयाळा
हतदीन बाळा
घेऊन जा ठेवि निज पूज्य चरणी।। मजला....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

तव अल्प हातून होई न सेवा

तव अल्प हातून होई न सेवा
मम कंठ दाटे
किती खंत वाटे
हुरहूर वाटे अहोरात्र जीवा।। तव....।।

सेवा करावी
सेवा वरावी
मानी नित्य बोले असे फक्त देवा।। तव....।।

किती दु:ख लोकी
किती लोक शोकी
परि काही ये ना करायास देवा।। तव....।।

दिसता समोर
किती सानथोर
झटती, मला वाटतो नित्य हेवा।। तव....।।

हृदयात सेवा
वदनात सेवा
उतरे न हातात करु काय देवा।। तव....।।

खाणेपिणे झोप
मज वाटते पाप
वाटे सदा तात! की जीव द्यावा।। तव....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३

सदयहृदय तू प्रभु मम माता

सदयहृदय तू प्रभु मम माता
घेई कडेवर हासव आता।।सदय....।।

अगतिक बालक
कुणी ना पालक
त्रिभुवनचालक तू दे हाता।।सदय....।।

काही कराया
येई न राया
लाजविती मज मारिती लाथा।।सदय....।।

धावत येऊन
जा घरी घेऊन
वाचव मज तू नाथ अनाथा।।सदय....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

दिसतात सुखी तात! सारेच लोक

दिसतात सुखी तात! सारेच लोक
हसतात जगी तात! सारेच लोक।।
मम अंतरंगात
परि ही निराशा
भरतात डोळे जळे, जाळि शोक।।दिसतात....।।

खाणे पिणे गान
जग सर्व बेभान
असे फक्त माझ्याच हृदयात दु:ख।।दिसतात....।।

फुलतात पुष्पे
गातात पक्षी
रडे एक मच्चित्त हे नित्य देख।।दिसतात....।।

जनमोददुग्धी
मिठाचा खडा मी
कशाला? तुझे जाई घेऊन तोक।।दिसतात....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

देवा! धाव धाव धाव

देवा! धाव धाव धाव
या कठिणसमयी पाव।।देवा....।।

अगणित रस्ते दिसती येथे
पंथ मजसि दाव।।देवा....।।

अपार गोंधळ बघुनी विकळ
देई चरणी ठाव।।देवा....।।

हा मज ओढी तो मज ओढी
करिती कावकाव।।देवा....।।

कुणी मज रडवी कुणी मज चढवी
म्हणू कुणास साव।।देवा....।।

घेऊनी जा मज प्रभु चरणी निज
नुरली कसली हाव।।देवा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

दु:ख मला जे मला ठावे

दु:ख मला जे मला ठावे
मदश्रुचा ना
अर्थ कळे त्या
आत जळून मी सदा जावे।। दु:ख....।।

‘असे भुकेला
हा कीर्तीला’
ऐकून, भरुनी मला यावे।। दु:ख....।।

‘एकांती बसे
अभिमान असे’
वदति असे ते मला चावे।। दु:ख....।।

‘या घरच्यांची
चिंता साची’
ऐकून, खेद न मनी मावे।। दु:ख....।।

नाना तर्क
काढित लोक
नयनी सदा या झरा धावे।। दु:ख....।।

तू एक मला
आधार मुला
बसून तुझ्याशी विलापावे।। दु:ख....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, ऑक्टोबर १९३२

नयनी मुळी नीरच नाही

नयनी मुळी नीरच नाही
करपून किती मम अंतर जाई।। नयनी....।।

रडूनी रडूनी सरले पाणी
वदुनी वदुनी शिणली वाणी
आत जळत परि निशिदिन पाही।। नयनी....।।

रडता मी ना आता दिसतो
लोक सकळही परि हा फसतो
अश्रुविणे रडणे अति दाही।। नयनी....।।

खाई किडा तो आता कळीस
भ्रमर आत पोखरी काष्ठास
शोक तसा हृदयास सदाही।। नयनी....।।

अमृतधारा ये घेऊन तव
शोकानळ हा प्रभु झणि विझव
आस उरे तव केवळ आई।। नयनी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- पुणे, ऑक्टोबर १९३४

वेल

मी प्रभुराया! त्वदंगणांतील वेल
काळजी का न घेशील।।

मी एका या बाजुस पडलो आहे
वाट त्वत्कृपेची पाहे
त्वत्करुणेचे जल थोडे तरि मिळु दे
मज येथे जीव धरू दे
तू लक्ष जरा मधुनमधुन तरि देई
येईल धीर मम हृदयी
मज अंकुर मग फुटतील
मज पल्लव शुभ येतील
मम जीवन हे हासेल
ती येऊ दे मम भाग्याची वेळ
काळजी का न घेशील।। मी....।।

हे बघ किति रे! माझ्याभवती गवत
ते मजसि वाढु ना देत
मज झाकोळी गुदमरवी ते सतत
शिर वरि मुळि करू ना देत
हे खाऊनिया मारून टाकिल माते
उपटशिल जरी ना हाते
हे उपट विषारी गवत
जे मदंकुरा अडवीत
दे मला विकासा पंथ
ये सखया तू, मरण जरि न येशील
काळजी का न घेशील।। मी....।।

मज घालावे निज हातांनी पुरण
मग भरभर मी वाढेन
कधि खत घाली थोडे तरि तू राया
येईल भरारुन काया
कुणी काळजि ना आजवरी मम केली
म्हणून ही विकलता आली
परि पोशिल जरि कुणी मजला
प्रकटेल कला मम विमला
प्रकटेल दिव्यता सकला
मी त्वदंगणी म्हणूनिच झालो वेल
काळजी का न घेशील।। मी....।।

मग फुटतिल रे दिव्य धुमारे माते
मांडवी चढव निज हाते
दे छोटासा मंडप मज घालून
त्यावर प्रभुजि! पसरेन
कधि येतील ती फुले फळे मधु
मजला
लागेल ध्यान मन्मतिला
होईन अतिच उत्कंठ
कळि हळुच होइल प्रकट
तू होशिल बघुनी हृष्ट
मग सुंदरशी कितिक फुले फुलतील
काळजी का न घेशील।। मी....।।

जरि सकळ फुले सखया! ना फळतील
झडतील काहि गळतील
ती काहि तशी वांझ प्रभु! निघतील
कितिकांस किडी खातील
कितिकांस फळे धरतिल परि सडतील
वाढ ना नीट होईल
परि एक दोन तरि दिव्य
रसभरित मधुर तुज सेव्य
येतील फळे प्रभु भव्य
तव पद=-पूजा-कामी ती येतील
काळजी का न घेशील।। मी....।।

यापरि देवा! त्वदंगणी विकसू दे
बहरू दे, मुदे पसरू दे
मजमाजी जे आहे ते वाढवुन
त्वच्चरणकमळि वाहीन
परि वाढाया आहे करुणा-शरण
वाढेन सदय जरि चरण
मद्विकास त्वत्पूजार्थ
ना इतर हेतु हृदयात
हा एकच सखया हेत
फलपुष्पी हा वेल तवार्चन करिल
काळजी का न घेशील।। मी....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- नाशिक तुरुंग, सप्टेंबर १९३२

जीवनतरू

प्रभु! जन्म सफल हा व्हावा
मम जीवनतरु फुलवावा।। प्रभु....।।
सत्संगतिसलिला देई
सद्विचार रविकर देई
वैराग्य बंधना लावी
हे रोप वाढिला लावा।। मम....।।

तू विकार वादळि पाळी
मोहाचे कृमि तू जाळी
श्रद्धेचे खत तू घाली   
टवटवित हरित शोभावा।। मम....।।

धैर्याचा गाभा भरु दे
प्रेमाचे पल्लव फुटु दे
सत्कर्मसुमांनी नटु दे
सच्छील-सुरभि पसरावा।। मम....।।

गुंगोत भक्तिचे भृंग
नांदोत ज्ञान-विहंग
कूजना करुत नवरंग
शांतिच्या फळी बहरावा।। मम....।।

बंधूंस सावली देवो
बंधूंस सौख्यरस देवो
सेवेत सुकोनी जावो
हा हेतु विमल पुरवावा।। मम....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३२

मज माहेराला नेई

येइ ग आई
मज माहेराला नेई।।

तगमग करितो माझा जीव
तडफड करितो माझा जीव
जेवि जळाविण ते राजीव
सुकुनी जाई।। मज....।।

वृक्ष जसा तो मूळावीण
फूल जसे ते वृंतावीण
मीन जसा तो नीरावीण
तसे मज होई।। मज....।।

सदैव येते तव आठवण
भरुन येती दोन्ही नयन
तगमग करिते अंत:करण
सुचेना काही।। मज....।।

शतजन्मांचा मी उपवासी
एक कणहि ना माझ्यापाशी
तू तर औदार्याची राशी
कृपेने पाही।। मज....।।

तुझ्याजवळ मी सदा बसावे
त्वन्मुखकमला सदा बघावे
भक्तिप्रेमे उचंबळावे
हेतु हा राही।। मज....।।

वात्सल्याने मज कवटाळ
तप्त असे मम चुंबी भाळ
प्रेमसुधा सुकल्या मुखि घाल
जवळी घेई।। मज....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३४

येतो का तो दुरून

येतो का तो दुरून
बघा तरि, येतो का तो दुरून।।

येतो का मम जीवनराजा
येतो का मम अंतरराजा
कंठ येइ गहिवरून।। बघा तरि....।।

केवळ त्याच्यासाठी जगलो
केवळ त्याच्यासाठी उरलो
हृदय येतसे भरून।। बघा तरि....।।

वाट बघोनी त्याची सतत
रडुनी रडुनी निशिदिन अविरत
डोळे गेले सुजून।। बघा तरि....।।

येईल केव्हा माझा जिवलग
मम हृदयाची होई तगमग
जीव जातसे झुरून।। बघा तरि....।।

येतांची मम जीवन राणा
ओवाळून मी पंचप्राणा
टाकिन त्याचेवरून।। बघा तरि....।।

जीवनवल्लभ पडता दृष्टी
धावत जाउन घालिन दृढ मिठी
जाइन तत्पदि मरून।। बघा तरि....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, एप्रिल १९३२

पूजा मी करु रे कैशी?

पूजा मी करु रे कैशी?
येशी परि, पूजा मी करु रे कैशी?।।

पडके हे घर माझे
कैसा बोलवू? हृषिकेशी!।। पूजा....।।

अश्रूंचा माझ्या हार
घालू का तो तव कंठासी?।। पूजा....।।

सुटतात जे सुसकारे
तेची संगीत, देवा! तुजसी।। पूजा....।।

जमले अपयश माझे
त्याच्या दाविन नैवेद्यासी।। पूजा....।।

द्याया तुजलागि योग्य
नाही काहिच माझ्यापाशी।। पूजा....।।

गोळा मी केल्या चिंध्या
कैशा दावू त्या मी तुजसी!।। पूजा....।।

मोती फेकुन देवा!
जमवित बसलो मी मातीसी।। पूजा....।।

त्वत्स्पर्श परि दिव्य होता
मृत्कण होतिल माणिकराशी।। पूजा....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३